नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:34 AM2018-05-14T00:34:22+5:302018-05-14T00:34:22+5:30

Student accident plan from new academic year | नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

Next


नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.
नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन वास्तू उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, श्री भगवानगिरी महाराज, सरपंच बाजीराव चव्हाण, कल्लाप्पाण्णा नडगदल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नूल गावच्या विकासकामांची यादी करून वर्षभरात कामे मार्गी लावली जातील. गावासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधून देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. संपादक जाधव, अ‍ॅड. शिंदे, आमदार कुपेकर यांचीही भाषणे झाली.
मंत्री तावडे यांच्याहस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन तर संजय थोरात लिखीत ‘विद्या दानीश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. मंत्री तावडे यांचा संस्था सचिव नानाप्पा माळगी यांच्याहस्ते सत्कार झाला. जयसिंग चव्हाण, विनोद नाईकवाडी, अभिजित चौगुले, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, संजय थोरात आदींसह संचालकांचा मंत्र्यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, किसनराव कुराडे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, योगेश जाधव, जि. प. सदस्या अनिता चौगुले, सभापती जयश्री तेली, प्रांताधिकारी संगीता चौगुले, आदी उपस्थित होते.
अपघाती मृत्यू झाल्यास मोफत शिक्षण
नव्या अपघात योजनेत प्रती विद्यार्थी दहा रुपये शासन विमा कंपनीकडे भरेल. विद्यार्थी अपघातात जखमी झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्च तर पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याची माहितीही तावडेंनी यावेळी दिली.

Web Title: Student accident plan from new academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.