करवीर, राधानगरीत उत्स्फूर्त मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:06 AM2019-04-24T01:06:58+5:302019-04-24T01:07:03+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा, करवीर, राधानगरी तालुक्यांतील अनेक गावांत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. सकाळी सातपासूनच मतदान केंद्राबाहेर रांगा ...

Spontaneous voting in Karveer, Radhanagar | करवीर, राधानगरीत उत्स्फूर्त मतदान

करवीर, राधानगरीत उत्स्फूर्त मतदान

Next

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा, करवीर, राधानगरी तालुक्यांतील अनेक गावांत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. सकाळी सातपासूनच मतदान केंद्राबाहेर रांगा होत्या. दुपारी एकपर्यंत रांगा कायम राहिल्या. दुपारनंतर ओघ कमी झाला तरी मतदानात खंड पडला नाही.
सकाळ सात वाजल्यापासूनच करवीर तालुक्यातील साबळेवाडी, खुपिरे या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या मिळाल्या. साबळेवाडीतील एका मतदान केंद्रावर सुरुवातीलाच मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. ते दुरुस्त करीपर्यंत केंद्राबाहेर रांग वाढत गेली. सांगरूळमध्ये सकाळी आठ वाजता सर्वच केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे महिलांची गर्दी लक्षवेधी होती. पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथे सकाळी पावणेनऊ वाजेपर्यंत १२ टक्के मतदान झाले होते. मतदार स्वत:हून मतदान केंद्रावर येत होतेच; पण त्यांच्यामध्ये उत्साहही दिसत होता. वाघुर्डे येथे थोडे मतदान झाल्यानंतर मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया रेंगाळली. या केंद्रात सकाळी नऊपर्यंत केवळ १५ मतदान झाले होते. तेथून पुढे ‘धामणी’ प्रकल्पासाठी सुळे, पणुत्रेपासून पन्हाळा तालुक्यातील तेरा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. येथील मतदान केंद्रांवर सामसूम होती.
राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथे मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पाहावयास मिळाला. सकाळी पावणेअकरा वाजता रांगा दिसत होत्या. येथे ग्रामपंचायतीप्रमाणे मतदानासाठी ईर्षा पाहावयास मिळाली. सकाळी अकरा वाजता धामोड येथील केंद्रांवर सरासरी २५ टक्के मतदान झाले होते. राशिवडे बुद्रुक येथे दुपारी बारा वाजता ३२ टक्के मतदान झाले. येथील एका मतदान केंद्रावर महिलांची मोठी रांग लागली होती. मतदानासाठी वेळ लागत असल्याने रांगेतच महिलांनी ठिय्या मारला. येळवडे, शिरगावात मतदारांमध्ये उत्साह होता. सरवडे येथे दुपारी बारापर्यंत रांगा लागल्या होत्या.

व्होटर स्लिपचा गोंधळ
व्होटर स्लिप व मतदान ओळखपत्रावरील फोटो वेगळे, ओळखपत्र आहे; पण मतदान यादीतच नाव नाही, अशा तक्रारी अनेक ठिकाणी पाहावयास मिळाल्या. खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतमजूर साऊबाई अशोक ºहायकर यांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मतदानापासून वंचित राहावे लागले.
केंद्रप्रमुखांना घाम फुटला
अगोदरच मतदान यंत्रणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना त्यात यंत्रात अचानक बिघाड झाल्याने अनेक ठिकाणी केंद्रप्रमुखांना घाम फुटला होता. उमेदवारांच्या प्रतिनिधींसह मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांची दमछाक उडताना दिसत होती.

Web Title: Spontaneous voting in Karveer, Radhanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.