शिवडाव येथील शाळकरी मुलाला जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:20 AM2018-01-08T00:20:16+5:302018-01-08T00:20:53+5:30

Sivadav schoolboy's child alive! | शिवडाव येथील शाळकरी मुलाला जीवदान!

शिवडाव येथील शाळकरी मुलाला जीवदान!

Next


कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नीलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या किडनीचे काम पूर्ववत सुरू झाले असून, तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. रामानंद म्हणाले, शिवडाव येथे दुचाकी अपघातात नीलेश जाधव २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जखमी झाला. यात त्याच्या पोटाला मार बसून उजव्या किडनीला मोठी दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्याचा रक्तदाबही कमी झाला होता. सोनोग्राफी केली असता किडनीभोवती रक्त जमा झाले होते. त्यामुळे त्याला प्रथम कडगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून ‘सीपीआर’मध्ये आणले. सुमारे चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यासाठी रक्ताच्या चार बाटल्या लागल्या. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. मोठ्या प्रमाणात रक्त गोठून राहिल्याने पोटाचा आकार व क्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर पोट टाके घालून बंद करणे शक्य नव्हते; म्हणून ‘अ‍ॅब-थेरा’ (पोट बंद न करता) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एका कृत्रिम आवरणाने झाकण्यात आले. तसेच छातीमध्ये नळी टाकून साठलेले रक्त काढले.
शस्त्रक्रियेनंतर त्याला तीन दिवस जीवरक्षक प्रणालीवर ठेवले. यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करून कृत्रिम आवरण काढून टाकून पोट पूर्णपणे बंद केले. दोन दिवसांनंतर श्वसनाची नळी व १४ व्या दिवशी छातीची नळी काढली व त्याचे खाणे सुरू झाले आणि तो चालू-फिरू लागला. ४० दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज
देण्यात आला. शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कौस्तुभ मेंच, डॉ. मधुर जोशी, डॉ. नीता भुरट यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. दीपाली, डॉ. राहुल पाटील, डॉ. राऊत यांचे सहकार्य मिळाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.
नीलेशसाठी डॉक्टर देवदूतच
नीलेशचे मामा उत्तम भिकाजी यादव म्हणाले, नीलेशची आई शेतकाम, वडील गवंडीकाम करतात. तो तांबाळे हायस्कूल येथे नववीत शिकत आहे. किडनीवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने सीपीआर येथील डॉक्टर नीलेशसाठी देवदूतच ठरले आहेत.

Web Title: Sivadav schoolboy's child alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.