Rheumatoid arthritis is increasing in Kolhapur | कोल्हापुरात संधिवात रुग्णांचा टक्का वाढतोय
कोल्हापुरात संधिवात रुग्णांचा टक्का वाढतोय

ठळक मुद्देआमवात हा आजार महिलांमध्ये, तर पुरुषांमध्ये गाउट अथवा पाठीचा संधिवात आजार आढळतो.या आजाराचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहार-विहार असणे आवश्यक आहे.

कोल्हापूर : संधिवाताच्या रुग्णांचा टक्का कोल्हापूरमध्ये वाढत आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिकांना संधिवाताने हैराण केले आहे. या आजाराचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहार-विहार असणे आवश्यक आहे.

‘संधिवात निवारण दिना’निमित या आजाराची लक्षणे, प्रमाण आणि घ्यावयाची दक्षता, आदींचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. वाढते प्रदूषण, बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन, कामाच्या ठिकाणी बसण्याची चुकीची पद्धत आणि व्यायामाचा अभाव, आदींमुळे संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. आनुवांशिकता हेही एक कारण आहे. संधिवाताच्या आजारांमध्ये सूजेचा संधिवात, आमवात, पाठीचा आमवात, चिकनगुणियामुळे होणारा, लुपुस, गाउट, सोरायसिसमुळे होणारी सांधेदुखी, लहान मुलांमधील, रक्तवाहिन्यांची सूज, त्वचा कडक होणे, झिजेचा संधिवात यांचा समावेश आहे. हे आजार कोणालाही होऊ शकतात.

आमवात हा आजार महिलांमध्ये, तर पुरुषांमध्ये गाउट अथवा पाठीचा संधिवात आजार आढळतो. वय वर्षे ३० ते ५० मधील व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये प्रमाण अधिक असून त्याची तीव्रता जादा आहे. संधिवात टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार-विहार असावा. कामाच्या ठिकाणी बसताना शरीराची ठेवण योग्य असावी. वजन नियंत्रणात हवे. नियमितपणे व्यायाम असावा.

लवकर निदान, उपचार आवश्यक

संधिवात हा आजार नसून ताप, सर्दी आणि खोकल्यासारखे एक लक्षण आहे. संधिवातामध्ये १०० हून अधिक आजारांचा समावेश असल्याचे संधिवाततज्ज्ञ डॉ. कुणाल पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये संधिवाताचे सुमारे नऊ लाख रुग्ण आहेत. कोल्हापूरमध्ये  रुग्णांचा टक्का वाढत आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिक संधिवाताच्या आजाराने त्रस्त आहेत. या आजाराकडे  दुर्लक्ष केल्यास अपंगत्व येऊ शकते. ते टाळण्यासाठी या आजाराची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांकडून लवकरात लवकर निदान करून घेण्यासह उपचार घेणे आवश्यक आहे.

 

लक्षणे अशी

सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ सांधे दुखणे आणि त्यांना सूज येणे. सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीनंतर सांधे कडक होणे. सांध्यांमधून करकर असा आवाज येणे. सांधेदुखीसोबत ताप आणि थकवा येणे, कमी वयामध्ये कंबर दुखणे अथवा ताठरणे, त्वचा चामड्यासारखी कडक होणे.


Web Title: Rheumatoid arthritis is increasing in Kolhapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.