ठोस आश्वासनाअभावीच कोतवालांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:05 PM2019-02-28T13:05:25+5:302019-02-28T13:06:59+5:30

आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे गेले अडीच महिने गावपातळीवर खोळंबलेली कामे सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Prostate the movement of the Kotwala in the absence of concrete assurance | ठोस आश्वासनाअभावीच कोतवालांचे आंदोलन स्थगित

आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाल्याने कोतवालांनी आपल्या सामानासह कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून आपला मुक्काम हलविला.

Next
ठळक मुद्देठोस आश्वासनाअभावीच कोतवालांचे आंदोलन स्थगित८४ दिवसांनी हलला मुक्काम : आजपासून होणार कामावर रुजू

कोल्हापूर : आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे गेले अडीच महिने गावपातळीवर खोळंबलेली कामे सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील १४ हजारांहून अधिक कोतवालांनी ६ डिसेंबरपासून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात शासनाने दोन वेळा मानधन वाढ केली; तथापि साडेसात हजार आणि पंधरा हजार रुपये अशी सेवाकाळानुसार केलेली वाढ ही कोतवालांमध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून वाढ नाकारत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. पण आता कोणतेही ठोस आश्वासन न मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले.

सध्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आणि शेतकरी सन्मान योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने गावपातळीवर कोतवालांची गरज निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार होऊन अखेर बुधवारी दुपारी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेने जाहीर केले. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता या सर्वांनी सामानसुमानासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मांडव सोडला.

यावेळी संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील, महादेव पोवार, नामदेव चौगले, दीपक शिंदे, पांडुरंग डवरी, महादेव भोसले, उमेश कांबळे यांच्यासह कोतवाल सहभागी झाले.

बंद काळातील पगार द्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८४ दिवस आंदोलनासाठी बसावे लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिने २४ दिवस काम बंद असल्याने या आंदोलन काळातील पगार द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज शासनाकडे पाठविला असून, त्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती कोतवालांनी केली आहे.

सर्वाधिक दिवसांचे आंदोलन

कोतवालांचे हे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्वाधिक दिवसांचे ठरले आहे. यापूर्वी ५१ दिवसांचे प्रदीर्घ आंदोलन केवळ धरणग्रस्तांनीच केले होते. कोतवालांनी सर्वाधिक दिवसांचे आंदोलनाचे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे.

 

 

Web Title: Prostate the movement of the Kotwala in the absence of concrete assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.