‘सिद्धाळा गार्डन’मध्ये दीड डझन उमेदवार रिंगणात (फायनल न्यूज)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:38+5:302021-02-18T04:40:38+5:30

विनोद सावंत- लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४६, सिद्धाळा गार्डन हा सर्वसाधारण (खुला) झाल्यामुळे येथून ...

One and a half dozen candidates in Siddhala Garden (Final News) | ‘सिद्धाळा गार्डन’मध्ये दीड डझन उमेदवार रिंगणात (फायनल न्यूज)

‘सिद्धाळा गार्डन’मध्ये दीड डझन उमेदवार रिंगणात (फायनल न्यूज)

Next

विनोद सावंत- लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४६, सिद्धाळा गार्डन हा सर्वसाधारण (खुला) झाल्यामुळे येथून दीड डझन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये आजी, माजी नगरसेवकांसह नवख्यांमध्ये लढत होणार आहे. सध्या इच्छुकांकडून मतदारांसाठी सहल, गाठीभेटी, हळदी-कुंकूच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. ताराराणी आघाडीच्या प्रभागावर कब्जा मिळविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.

शहराच्या मध्यवस्तीमध्ये आणि चार ते पाच मोठ्या तालमी, १५ ते २० प्रमुख तरुण मंडळे असणारा सिद्धाळा गार्डन हा प्रभाग आहे. यंदा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने येथून १५ पेक्षा जास्त जणांनी फिल्डिंग लावली आहे. अंतिम टप्प्यात कोणाची तलवार म्यान होणार आणि कोण रिंगणात असणार, पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार यानंतर येथील चित्र स्पष्ट होणार आहे.

गत निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगला होता. यामध्ये ताराराणी आघाडीच्या सुनंदा मोहिते यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली होती. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीत सुनंदा मोहिते यांचे पती सुनील मोहिते रिंगणात आहेत.

स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण यांनीही या प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, गाठीभेटी सुरू केल्या आहेत. चव्हाण कुटुंबीयांनी महापालिकेत आठ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये प्रल्हाद चव्हाण पाच वेळा, सागर चव्हाण एक, सचिन चव्हाण एक आणि जयश्री चव्हाण एक वेळा विजयी झाल्या आहेत. प्रल्हाद चव्हाण आणि सागर चव्हाण यांनी महापौरपद भूषविले आहे. सचिन चव्हाण २०१० ते यांनी २०१५ मध्ये या प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. गतवेळी महिला आरक्षणामुळे त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. परिसरातील २५ ते ३० महिला बचत गटांची स्थापना करून सिद्धाळा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. प्रभागात जन्मलेल्या प्रत्येक मुलगीच्या नावे ठेव ठेवण्याचा अनोखा उपक्रमही सुरू आहे. सिद्धाळा गार्डन येथे शाळांची संख्या जास्त असल्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्काय वॉक मंजूर केला. फिरंगाई हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशी रक्त विघटन रक्त पेढी उभारण्यासाठी निधी खेचून आणला. सिद्धाळा गार्डनसाठीची जागा महापालिकेला विनामोबदला दिली आहे. सचिन चव्हाण हे २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध असणारे नगरसेवक म्हणून प्रभागात परिचित आहेत.

माजी परिवहन समिती सभापती बाबा पार्टे हेही पुन्हा रिंगणात उतरले आहेत. २००० ते २००५ मध्ये त्यांनी या प्रभागातून शिवसेनेतून प्रतिनिधित्व केले आहे. बजापराव माने तालीम हॉल, दत्ताजीराव काशीद हॉल, सणगर गल्ली तालीम हॉल, बोडके गल्ली तालीम हॉलची उभारणी केली. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. टोल, हद्दवाड, शिवाजी पूल, खंडपीठ, वीज बिल यांसंदर्भात त्यांनी आंदोलने केली.

प्रसाद जाधव यांनीही जोमाने प्राचाराला सुरुवात केली आहे. ते खंडपीठ आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असतात. त्यांनी अलमट्टी हटाव आंदोलन उभे केले. महापूर, कोरोनामध्ये त्यांनी मदत केली.

उद्योजक अशोक पाटील यांनीही जोमाने प्रचार सुरू केला आहे. ते दत्ताजीराव काशीद महाराज चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष असून, या माध्यमातून ते सामाजिक काम करीत आहेत. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे ते संचालक आहेत. कोरोनात सीपीआरमध्ये पाण्याच्या बॉक्सचे वाटप, नंदवाळ पायी दिंडीवेळी ते खिचडी वाटप उपक्रम राबवितात. प्रभागातील मंडळांना त्यांचे नेहमी सहकार्य असते. ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत. अक्षय बाळासाहेब पोवार हे जयशिवराय तरुण मंडळाच्या माध्यमातून सक्रिय असून, शिवसेनेतून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपचे दिवंगत नेते रामभाऊ चव्हाण यांची पुतणी आणि शिवाजीराव चव्हाण यांची कन्या सिद्धी गणेश रांगणेकर यांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतली असून, त्यांनीही शिवसेनेतून उमेदवारी मागितली आहे. भाजपचे मंगळवार पेठ मंडल उपाध्यक्ष वीरेंद्र मोहिते यांनीही सहा वर्षांतील सामाजिक कामाच्या जोरावर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासह माजी नगरसेवक चंदू चिले, गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या मंदा पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य पाटील, मिथुन गिरवे, गणेश चिले, चंद्रमोहन पाटील, राजू भोसले, शिवाजी ढवण, सचिन मांगलेकर, राजू पार्टे, शिवाजीराव ढवण यांच्या नावांचीही चर्चा आहे.

प्रतिक्रिया

विरोधी आघाडीत असतानाही सुमारे अडीच कोटींचा निधी खेचून आणला. सिद्धाळा गार्डनमध्ये पावसामध्ये सांडपाणी येत असल्यामुळे २३ लाखांच्या निधीतून नवीन चॅनेल केले. येथे ओपन जिम, पाथवे केले. महाराणी ताराबाई विद्यालयाच्या इमारतीचे २२ लाखांच्या निधीतून नूतनीकरण, प्रयोगशाळा उभारली. याच शाळेतील विद्यार्थ्यांना सहल आणि आरोग्य तपासणी केली. येथेच टर्फ मैदानासाठी पाठपुरावा केला.

सुनंदा मोहिते, नगरसेविका

चौकट

पाच वर्षांतील कामे

डाकवे गल्ली, जासूद गल्ली, चाणक्य गल्ली, बामणी बोळ येथील ड्रेनेज लाईन, पिण्याची पाईपलाईन

लाड चौक ते बजापराव माने तालीम रस्ता

डाकवे गल्ली, खुपिरेकर गल्ली, जरग गल्ली येथील रस्ता

कॅसेट ग्रुप ते सोमेश्वर चौक रस्ता

संपूर्ण प्रभागात एलईडी दिवे

सिद्धाळा गार्डन येथील विहिरीतील गाळ काढला.

चौकट

शिल्लक कामे

गुलाब गल्लीतील रस्त्याची दुरवस्था

कचरा कोंडाळा फाटले, चुकीच्या ठिकाणी बसवले.

पाण्याचा खजिना, पोवार गल्लीत ४० वर्षांपासूनच्या जुन्या ड्रेनेज लाईनमुळे रस्त्यावर सांडपाणी

सणगर गल्लीत ड्रेनेज लाईन टाकली; मात्र रस्ता रखडला.

औषध, धूर फवाणीकडे दुर्लक्ष

चौक़ट

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

सुनंदा मोहिते (ताराराणी आघाडी) १४६५

मंदा पाटील (शिवसेना) ७२६

कल्पना पाटील (राष्ट्रवादी) ६७९

वैशाली पाटील (अपक्ष) ६८२

फोटो : १६०२२०२१ कोल सिद्धाळा गार्डन प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन प्रभाग क्रमांक ४६ मधील सोमेश्वर मित्रमंडळ परिसरातील कोंडाळा फाटला असून, रस्त्यावर कचरा पसरत आहे.

Web Title: One and a half dozen candidates in Siddhala Garden (Final News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.