पेन्शन बंद केल्यास कार्यालयाला टाळे : कोल्हापुरात पेन्शनरांचा इशारा भर उन्हात विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:27 AM2017-11-17T01:27:20+5:302017-11-17T01:33:53+5:30

कोल्हापूर : किमान तीन हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ करावी

The office closed on pension after the pension was closed | पेन्शन बंद केल्यास कार्यालयाला टाळे : कोल्हापुरात पेन्शनरांचा इशारा भर उन्हात विराट मोर्चा

पेन्शन बंद केल्यास कार्यालयाला टाळे : कोल्हापुरात पेन्शनरांचा इशारा भर उन्हात विराट मोर्चा

Next
ठळक मुद्दे‘पी. एफ.’चे अधिकारी धारेवर; सरकारवर सडकून टीकाअनेकांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली

कोल्हापूर : किमान तीन हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी सर्व श्रमिक संघातर्फे ई.पी.एस. १९९५ च्या पेन्शनरांनी कोल्हापुरात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चा काढला. हातात लाल निशाण, दंडावर निषेधाच्या काळ्या रिबीन बांधून उतरत्या वयाकडे झुकलेल्या पेन्शनरांनी रखरखत्या उन्हाचीही तमा न बाळगता विराट शक्तिप्रदर्शन केले.

भविष्य निर्वाह निधी (पीएफ)च्या सहायक आयुक्त एन. बी. मुल्या यांच्याशी चर्चा करताना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, राष्टÑीयीकृत बँकेत बायोमेट्रिकची सोय करा, अन्यथा पेन्शन बंद झाल्यास या उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला. अनेकांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोर्चात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनर सहभागी होते.

मोर्चाचे नेतृत्व अतुल दिघे यांनी केले. मोर्चाला शिवाजी पार्कमधील विक्रम हायस्कूलच्या मैदानावरून प्रारंभ झाला. यावेळी ‘कामगार एकजुटीचा विजय असो’, ‘पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. मैदानावर मोर्चाचे निमंत्रक अतुल दिघे यांचे भाषण झाल्यानंतर मोर्चा प्रथम मध्यवर्ती बसस्थानकाच्या कार्यालयावर काढला. तेथे निदर्शने करून शिष्टमंडळाद्वारे एस. टी.च्या विभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. हा मोर्चा दाभोळकर चौक, आदित्य कॉर्नर मार्गे ताराबाई पार्कमधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर पोहोचला. आंदोलकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला.

यावेळी द्वारसभेत निमंत्रक अतुल दिघे, आप्पा कुलकर्णी, गोपाळराव पाटील (सांगली), निवास पाटील (वाळवा), पतंगराव मुळीक, एन. एस. पाटील, आदींची भाषणे झाली. मोर्चात अशोक खोत, अशोक कुलकर्णी, भानुदास फारणे, दत्ता सावंत, नाना जगताप, इमाम राऊत, आदी सहभागी झाले होते.


काळा दिवस
वृद्धापकाळाकडे झुकलेल्या, दूरचे दिसणेही बंद झालेल्या अनेक पेन्शनरांनी मोर्चात सहभागी होताना खांद्यावर लाल निशाण व हाताच्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभाग घेतला व हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला.
महाराष्टÑाचा पैसा गुजरातला
सत्ता आहे तोपर्यंत ओरबडून घेण्याची प्रवृत्ती या सरकारची सुरू असून गुजरात ते मुंबई बुलेट ट्रेन सुरू करून महाराष्ट्रातील सर्व पैसा गुजरातला नेण्याचे पंतप्रधान मोदी यांचे षड्यंत्र आहे. गुजरात-मुंबई ऐवजी पुणे-मुंबई, नागपूर-मुंबई, हैदराबाद-मुंबई अशी बुलेट ट्रेन का सुरू केली नाही? असा प्रश्न पतंगराव मुळीक यांनी सभेत विचारला.

कार्यालय विस्कटणार
अतुल दिघे म्हणाले, पेन्शनरांना बायोमेट्रिक करण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही कोल्हापुरात यावे लागत आहे. म्हातारपणी ही पायपीट न झेपणारी असल्याने, तसेच खिशाला न परवडणारी असल्यामुळे ही बायोमेट्रिकची सोय त्या-त्या जिल्ह्यातील तालुक्यात करावी, अशी मागणी केली. तसेच आतापासून पेन्शनर येथे येणार नाहीत, तरीही पेन्शन देणे बंद केल्यास पुन्हा या उपविभागीय कार्यालयावर येऊन हे कार्यालय विस्कटणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘म्हाताºयां’ची कदर करा, ‘मोगलाई’चे फतवे बंद करा
शिष्टमंडळासोबत चर्चा करताना पी. एफ. कार्यालयातील सहायक आयुक्त एन. बी. मुल्या यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने अतुल दिघे संतापले. म्हाताºयांची कदर तुम्हाला आहे की नाही, कसले फतवे काढता. तुमची मोगलाई येथे खपवून घेणार नाही. आमच्या पैशातून तुमचे पगार होतात, त्यामुळे तुम्ही आमचे कामगार आहात. आम्ही बायोमेट्रिक करणार नाही; पण पेन्शन बंद झाल्यास पुन्हा तुमच्या दारात येऊन तुम्हाला कार्यालयात येणे बंद करीन, असा इशारा दिला.
पेन्शनरांच्या मागण्या
किमान तीन हजार रुपयांची वाढ करावी
उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ६५०० रुपयांवरील पगारावर वर्गणी भरणाºया आस्थापनातील पेन्शनरांना विना अट वाढीव पेन्शनचा लाभ द्यावा
रेल्वे व बस प्रवासात सवलत मिळावी

विधिमंडळावर पेन्शनरांना प्रतिनिधित्व मिळावे.
ई.एस.आय.चा लाभ मिळावा.
बायोमेट्रिक सिस्टीम भविष्य निर्वाह निधीच्या कोल्हापुरातील उपविभागीय कार्यालयात न ठेवता त्या-त्या जिल्ह्यातील तालुकास्तरावर अगर बँकेतील शाखेत करावे.

Web Title: The office closed on pension after the pension was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.