गडहिंग्लजसाठी नवीन अग्निशमन वाहनाची गरज जुने झाले कालबाह्य : तीन तालुक्यांत एकच वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:29 AM2018-05-11T00:29:41+5:302018-05-11T00:29:41+5:30

New fire brigade requirement for Gadhingjale was old: Expiration: One vehicle in three talukas | गडहिंग्लजसाठी नवीन अग्निशमन वाहनाची गरज जुने झाले कालबाह्य : तीन तालुक्यांत एकच वाहन

गडहिंग्लजसाठी नवीन अग्निशमन वाहनाची गरज जुने झाले कालबाह्य : तीन तालुक्यांत एकच वाहन

googlenewsNext
ठळक मुद्दे ३५० खेड्यांची होतेय कुचंबणा

राम मगदूम ।
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडील अग्निशमन वाहन कालबाह्य झाल्यामुळे अग्निमशन यंत्रणेसाठी नव्या वाहनाची गरज आहे. गडहिंग्लज शहरासह परिसरातील तीन तालुक्यांत आगीसह अन्य आपत्तीच्या काळात धावून जाणारी पालिकेच्या ‘बंबा’ची गाडी आता वयोमानानुसार निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील सुमारे ३५० खेड्यांची कुचंबणा होत आहे.

२०१४ मध्ये नगरपालिकेने अग्निशमन सेवेसाठी सुसज्ज फायर स्टेशन बांधले आहे. त्यासाठी सुमारे ५६ लाखांचा निधी खर्ची पडला असून कर्मचाऱ्यांना आधुनिक साधनेही देण्यात आली आहेत. मात्र, या विभागाकडील वाहन जुने असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीची कामे वारंवार निघत आहेत.

त्यामुळे अग्निशमन सेवा दुरुस्तीसाठी खंडित करावी लागते, म्हणूनच जनतेची मोठी गैरसोय होत आहे.
२१ आॅक्टोबर २००३ रोजी घेतलेली ही गाडी परिवहन खात्याच्या नियमानुसार आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदीला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार वाहन खरेदीसाठी नगरपालिका प्रशासन विभागाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

वर्षाला सरासरी ५५-६० घटना
गडहिंग्लज विभागात दरवर्षी आगीच्या सरासरी ५५ ते ६० घटना घडतात. त्याशिवाय वनविभागाच्या राखीव जंगलातील गवत व झुडपांना आगी लावण्याच्या घटनाही उन्हाळ्यात वारंवार घडतात. त्यामुळे विविध शासकीय योजनेतून लावण्यात आलेली झाडे वाचविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा नेहमीच सज्ज असावी लागते. अलीकडे गडहिंग्लज परिसरातील गवत गंज्यांना आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेही अग्निशमन यंत्रणेची निकड भासत आहे.

तीन तालुक्यांत एकमेव यंत्रणा
गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यांत गडहिंग्लज नगरपालिकेचे एकमेव अग्निशमन वाहन आहे. नजीकच्या कागल व भुदरगडसह सीमाभागातील आपत्तीच्यावेळीही सेवा द्यावी लागते. त्यामुळे नवीन अग्निशमन वाहन खरेदीच्या प्रस्तावास शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.
 

जुन्या वाहनाच्या वापराची मुदत संपत आल्यामुळे नवीन अग्निशमन वाहन खरेदीसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. नवीन वाहनासाठी सुमारे ६० लाखांची आवश्यकता असून अनुदानासह परवानगी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहोत. वाहनाअभावी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेकडील आग सुरक्षा निधीतून नवीन अग्निशमन वाहन खरेदीची तयारी ठेवली आहे. परवानगी मिळताच तातडीने कार्यवाही केली जाईल.
- प्रा. स्वाती कोरी, नगराध्यक्षा गडहिंग्लज.

Web Title: New fire brigade requirement for Gadhingjale was old: Expiration: One vehicle in three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.