भाजपसाठी महाडिकांच्या जोडण्या! : पाच आमदारांचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:14 AM2018-03-07T01:14:34+5:302018-03-07T01:14:34+5:30

 Mahadik connections for BJP! : Five MLAs Target | भाजपसाठी महाडिकांच्या जोडण्या! : पाच आमदारांचे टार्गेट

भाजपसाठी महाडिकांच्या जोडण्या! : पाच आमदारांचे टार्गेट

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना म्हणे दिला शब्द; कागलमध्ये दोन्ही घाटगेंच्या मनोमिलनासाठी प्रयत्न

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात जागा भाजप पूर्ण ताकदीनिशी लढविणार असून, त्यातील भाजपचे किमान पाच आमदार निवडून आणण्याचे शिवधनुष्य माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उचलले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाडिक यांनी तसे आश्वासित केल्याचे समजते. या पाच जागांमध्ये ‘कोल्हापूर दक्षिण’सह कागल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गंमत म्हणजे १९९५ च्या निवडणुकीत याच महाडिक यांनी जिल्हा भगवा करून दाखविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता.

भाजपची सन २०१४ पासूनची देशभरातील वाटचाल व नुकत्याच झालेल्या ईशान्यकडील राज्यांचा कल पाहता भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांचा आत्मविश्वाच दुणावला आहे. जिल्ह्यातही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष मजबुतीच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या जोडीला आमदार सुरेश हाळवणकर हे जरी असले तरी दहा विधानसभा मतदारसंघांत ताकद असणारा नेता म्हणून महाडिक यांची भूमिका महत्त्वाची आहे. आठवड्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांच्यासह महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे समजते.

राज्यात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत काहीही निर्णय झाला तरी कोल्हापुरात मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ते एकत्रित राहणार हे निश्चित आहे. त्यानुसार कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी तयारी सुरू केली आहे. त्यात जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार असल्याने त्यांची ताकद आहे. दोन्ही कॉँग्रेस व शिवसेनेशी सामना करण्यासाठी भाजपची रणनीती काय असावी, याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाल्याचे समजते.

महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाडिक यांनी बाहेर राहून भाजपला ताकद दिली. तीच खेळी ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत खेळू शकतात. त्याची सुरुवात त्यांनी केली असून, त्यांच्या हिटलिस्टवर ‘कागल’ व ‘कोल्हापूर दक्षिण’ हे दोन मतदारसंघ आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांना रोखण्यासाठी त्यांनी माजी आमदार संजय घाटगे व ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे दोन ‘घाटगे’ कसे एकत्र येतील, असे प्रयत्न सुरू केले आहेत.

दोन्ही घाटगेंनी अद्याप सावध भूमिका घेतली असली तरी प्रा. संजय मंडलिक यांची मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढल्याने संजय घाटगेंची गोची झाली आहे. लोकसभेला शिवसेनेतूनच आपण लढणार, अशी घोषणा जरी मंडलिक यांनी केली असली तरी अजून वर्ष आहे, बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणार आहे. दोन्ही घाटगेंना एकत्र करून विधानसभेला मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान देण्याची खेळी भाजप पर्यायाने महाडिक खेळणार आहेत. या पार्श्वभूमीवर समरजितसिंह घाटगे व महाडिक यांच्यात सोमवारी झालेल्या भेटीला महत्त्व आले आहे.
‘गोकुळ’च्या सत्तेचा वापर
समरजित घाटगे यांचे कार्यकर्ते बॉबी माने यांच्या गोकुळमधील टँकरला मुदतवाढ देण्यासाठी घाटगे-महाडिक भेट झाल्याचे सांगण्यात येते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घाटगे गटाने गोकुळ शिरगाव मतदारसंघात शशिकांत खोत यांच्या पत्नीला सहकार्य केल्याचे समजल्यावर त्यावेळीही घाटगे गटाचे टँकर महाडिक यांनी ‘वेटिंग’वर ठेवले होते.


खासदारकीचेही राजकारण
मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांना थेट आव्हान दिले आहे; त्यामुळे मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे पुढच्या राजकीय वाटचालीत त्रास देणार हे महाडिक यांना माहीत असल्याने त्यांनी पर्यायी रणनीती सुरू केली आहे. त्याचा केंद्रबिंदू कागल आहे. कागलमध्ये मुश्रीफ यांना आव्हान निर्माण केले तर लोकसभेला खासदार महाडिक यांची डोकेदुखी कमी होऊ शकते, अशी ही राजकीय खेळी आहे.


खरा गुंता उमेदवारीचा
कागलमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत आता समरजित घाटगे फारच पुढे गेले आहेत. त्या तुलनेत संजय घाटगे अजूनही शांत आहेत. काही झाले तर ते विधानसभा लढणार व ती मुश्रीफ यांच्याविरोधात लढवावी लागणार हे त्यांनी पक्के केले आहे. फक्त त्यांचा अजून झेंडा ठरलेला नाही. आतापर्यंत त्यांनी सहा विधानसभा लढविल्या. त्यात तीनवेळा शिवसेना व प्रत्येकी एकदा जनता दल, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा त्यांनी घेतला. आता शिल्लक राहिला आहे तो फक्त भाजपचाच. तो त्यांच्या हातात द्यायचा की नाही हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ठरविणार आहेत. सहा वेळा लढले व पाचवेळा पडले तरी घाटगे यांनी प्रत्येक वेळी अटीतटीची लढत दिली आहे.


संजय घाटगेेंशीही चर्चा : शनिवारी (दि.३) माजी आमदार संजय घाटगे यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी शाहू स्मारक भवनमध्ये भेट झाली. तिथे दादा त्यांना ‘बाबा, मी तुम्हांला भरपूर देणार आहे.’ असे म्हणाल्याचे सांगण्यात येते. यानंतर संजयबाबा घाटगे राजाराम कारखान्यांवर जाऊन महाडिक यांना भेटले. तिथे महाडिकांनी जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आणणार असून, त्यांतील एक कागलचा असल्याचे सांगितले. त्यासाठी दोन्ही घाटगे एकत्र यावे लागतात तसेच ही जागा निवडून आणायची असेल तर समरजितसिंह घाटगेंना उमेदवारी देऊन हे घडत नाही, असेही स्पष्ट केल्याचे समजते.

महाडिक यांचा अजेंडा
मुश्रीफ यांना कागलमध्ये रोखणे
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात समरजित यांचा पाठिंबा मिळवून मुलगा अमल महाडिक यांची लढत सोपी करणे.
लोकसभेसाठी पुतण्या धनंजय महाडिक यांना कागलमधून पाठबळ मिळेल अशी जोडणी करणे.

Web Title:  Mahadik connections for BJP! : Five MLAs Target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.