कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:46 AM2017-09-24T00:46:33+5:302017-09-24T00:46:44+5:30

कोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता

 Kolhapur-Shirdi railway from Wednesday - Dhananjay Mahadik | कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे बुधवारपासून--धनंजय महाडिक यांची माहिती

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कोल्हापूर ते साईनगर (शिर्डी) रेल्वे सुरू करण्यास रेल्वे खात्याने मान्यता दिली असून, दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता कोल्हापुरातून सुटणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर-शिर्डी रेल्वेस बुधवारी (दि. २७) सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एक वेळच धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेºया वाढविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे येथे मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर-शिर्डी गाडीचा विषय लावून धरल्यानंतर त्याला तत्काळ मान्यता देण्यात आली. कोल्हापूर-नागपूर धावणारी गाडी मिरज येथे ३२ तास थांबते, या वेळेचा उपयोग करून कोल्हापूर-शिर्डी गाडी सुरू केली आहे. सध्या हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून निघणार असून, गुरुवारी पहाटे ५.५५ वाजता ती साईनगर येथे पोहोचेल. सव्वातीन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तीच गाडी सकाळी ८.२५ वाजता तेथून निघून रात्री ९.२५ वाजता कोल्हापुरात पोहोचेल. दीड दिवसात अल्प तिकीट दरात साई दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर या प्रमुख स्थानकांमध्ये रेल्वेचे थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लिपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे १६ डबे राहणार आहेत.

कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे सोडण्यात यावी, कोल्हापूर-जोधपूर मार्गावर नवीन गाडी सुरू करावी, कोल्हापूर-सोलापूर ही रेल्वे सकाळच्या वेळेत सुरू करावी, फुटओव्हर ब्रीजच्या दोन्ही बाजूला यांत्रिकी सरकते जिने पूर्ण करावेत, आदी मागण्या पुण्यातील बैठकीत केल्याचेही त्यांनी सांगितले. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचा सत्कार रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. स्टेशन प्रबंधक सुग्रीव्ह मीणा, शिवनाथ बियाणे, समीर शेठ, मोहन शेटे उपस्थित होते.

...तर गजपती राजूंवर हक्कभंग
कोल्हापूरच्या विमानसेवेबाबत गेले तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी १५ सप्टेंबरपर्यंत विमान सेवा सुरू करण्याचे लोकसभेत सांगितले होते. सध्या तांत्रिक बाबीत ही प्रक्रिया अडकली असून, विमान सेवा लवकर सुरू झाली नाहीतर राजूंवर हक्कभंग आणण्याची तयारीही केल्याचे महाडिक यांनी सांगितले.

महालक्ष्मी-अंबाबाई वाद निरर्थक
महालक्ष्मी की अंबाबाई हा वाद माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. कोणी देवी म्हणेल, आई, लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलणे एवढे सोपे नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.
बुधवारी साई मंदिरात लाडू वाटप
कोल्हापूर-शिर्डी गाडीचा प्रारंभ बुधवारी होत असून, त्यानिमित्त जिल्ह्णातील साई मंदिरात लाडू वाटप केले जाणार आहे. प्रत्येक मंदिरात साधारणत: दोनशे लाडूंचे वाटप केले जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.

सहा महिन्यांत कोकण रेल्वेचे काम
कोल्हापूर-वैभववाडीचा साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प असून, त्याचे उद्घाटन तीन महिन्यांपूर्वीच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाचा विकास आराखडा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी व टेंडर प्रक्रिया यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यानंतरच कामास सुरुवात होईल, असे महाडिक यांनी सांगितले.

जनरल - १७० रुपये, स्लिपर कोच-३३० रुपये,
थ्री टायर ए.सी. - ९०५ रुपये, टू टायर ए. सी.- १२९५ रुपये.

Web Title:  Kolhapur-Shirdi railway from Wednesday - Dhananjay Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.