कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे नगारे, दोन्ही काँग्रेसच्या संसारात ‘शिरोळ’चा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:19 AM2018-02-09T00:19:56+5:302018-02-09T00:21:35+5:30

In the Kolhapur district, the municipal corporations, both the Congress and the Congress, | कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे नगारे, दोन्ही काँग्रेसच्या संसारात ‘शिरोळ’चा तिढा

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे नगारे, दोन्ही काँग्रेसच्या संसारात ‘शिरोळ’चा तिढा

Next
ठळक मुद्दे सर्व मतदारसंघांत ताकदीचे उमेदवार नसल्याने जिल्ह्यात एकत्रित लढणे सोपे

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहाही विधानसभा मतदारसंघांत लढण्यासारखे ताकदीचे उमेदवार दोन्ही काँग्रेसकडे नसल्याने या दोन पक्षांची आघाडी होण्यास पूरक वातावरण असल्याचे चित्र आहे. आता एकत्र येण्यास फक्त शिरोळ मतदारसंघच अडचणीचा ठरत आहे. तिथे दोन्ही काँग्रेसकडे मातब्बर उमेदवार आहेत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेतले तर त्यांना हा मतदारसंघ सोडावा लागू शकतो. त्यामुळे तिथेच फक्त तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

भाजपकडून राज्य व देशाच्या राजकारणात फसवणूक झाल्यावर स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे भाजपप्रणीत महाआघाडीतून बाहेर पडले आहेत. भाजपविरोधात देशभर आघाडी करण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्यांच्या बैठकांनाही शेट्टी हजर राहत आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र झाल्यास त्यांच्याशी किंवा फक्त काँग्रेससोबत ‘स्वाभिमानी’ची आघाडी होऊ शकते. तसे झाल्यास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आता काँग्रेसकडे असलेली जागा शेट्टी यांच्यासाठी सोडली जाऊ शकते; परंतु शेट्टी तेवढ्यावर समाधान मानणार नाहीत. त्यांना विधानसभेच्याही १०-२० जागा हव्या असतील. त्यातही सगळ्यांत महत्त्वाची म्हणजे संघटनेचे होम ग्राउंड असलेल्या शिरोळच्या जागेसाठी त्यांचा आग्रह असू शकतो.

या मतदारसंघातून काँग्रेसकडून दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ला ही जागा सोडणे अडचणीचे ठरू शकते. गणपतराव पाटील व यड्रावकर गटात गेल्या अनेक वर्षांत समझोत्याचे राजकारण सुरू आहे. त्यातही गणपतराव पाटील हे मृदू स्वभावाचे आहेत. कारखाना, श्रीवर्धन बायोटेक, बँक आणि सेंद्रिय ऊस शेती हे त्यांचे आताचे प्राधान्यक्रमाचे विषय आहेत. त्यामुळे ते कितपत ताकदीने विधानसभेचा विचार करतात हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यड्रावकर यांचीही दावेदारी भक्कम मानली जाते. हा एकच मतदारसंघ वगळता दोन्ही काँग्रेसना आघाडीस फारशी अडचण कुठे नाही. चंदगडमध्ये काँग्रेसकडून माजी मंत्री भरमू पाटील, राजेश व महेश पाटील हे तयारी करीत असले तरी विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने काँग्रेसला ही जागा सुटण्याची शक्यता नाहीच.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. या दोन पक्षांनी एकत्र यावे असा कार्यकर्त्यांचाही आणि दोन्ही पक्षांतील तरुण आमदारांचाही नेतृत्वावर मोठा दबाव आहे. जेव्हा १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादीकडेच मातब्बर नेते होते. त्यामुळे सगळ्या मतदारसंघांत लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडे ताकदीचे उमेदवार होते. परिणामी या दोन पक्षांची आघाडी झाली तर बंडखोरी होत असे; परंतु आता २० वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. दोन्ही पक्षांची संघटनात्मक वीण विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दुसरे महत्त्वाचे असे की, जे या दोन्ही पक्षांत संधी मिळत नाहीत म्हणून अस्वस्थ होते, त्यांना शिवसेना व अलीकडील काही वर्षांत भाजपचा पर्याय मिळाला आहे.

ही स्थिती दोन्ही काँग्रेसना आघाडी करण्यास पूरक ठरली आहे. जिथे काँग्रेसला जागा हवी आहे, तिथे राष्ट्रवादीकडे ताकदीचा उमेदवारच नसल्याने जागा सोडण्यासाठी जो टोकाचा संघर्ष होत असे, तो करावा लागणार नाही.

कोल्हापूर उत्तरसह दक्षिण, करवीर, इचलकरंजी, शिरोळ, शाहूवाडी आणि हातकणंगले या जागांवर काँग्रेस दावा करू शकते. कागल, चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. राधानगरी-भुदरगडमध्ये या पक्षाची ताकद आहे, शिवाय बिद्री कारखान्यात सत्ता आल्याने के. पी. पाटील यांची दावेदारी भक्कम मानली जाते. तिथे के. पी. व ए. वाय. पाटील यांच्यातील वाद मिटवून एकोपा घडविण्यातच कस लागणार आहे.


आवाडे-आवळे गटबाजी
इचलकरंजी मतदारसंघात दोन्ही काँग्रेसमध्ये कायमच टोकाचा संघर्ष राहिला आहे. त्यामुळे जरी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तरी राष्ट्रवादी आवाडे यांच्याशी प्रामाणिक राहण्याची शक्यता फारच अंधुक आहे. हे आवाडे यांनीही स्वीकारले आहे. हातकणंगलेत माजी मंत्री जयवंतराव आवळे किंवा त्यांचा मुलगा राजू हेच सध्या तरी काँग्रेसकडे पर्याय असले तरी नव्या नेतृत्वाला संधी दिली तरच पक्षाला तिथे भवितव्य आहे. सद्य:स्थितीत काँग्रेसमध्ये राहून आवाडे यांना विरोध हेच आवळे गटाचे कार्य बनले आहे.


६-४ फॉर्म्युलाच शक्य
सध्या तरी काँग्रेसला सहा व राष्ट्रवादीला चार जागांचे वाटप होऊ शकते. राष्ट्रवादीने पाच जागांचा आग्रह धरल्यास कोल्हापूर उत्तरची जागा राष्ट्रवादीला दिली जाऊ शकते. मात्र, उमेदवार काँग्रेसमधून उसना घेतला जाऊ शकतो. यापूर्वी मालोजीराजे यांच्याबाबतीत २००४ च्या निवडणुकीत असे घडले आहे.

गायकवाड गटाचे मनोमिलन
शाहूवाडी तालुक्यातील मानसिंगराव गायकवाड व स्व. संजयबाबा गायकवाड यांचे गट एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. मानसिंगराव गायकवाड यांना काँग्रेसने आॅफर दिली असून, ते त्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांच्याही काँग्रेस प्रवेशाच्या हालचाली सुरू आहेत; परंतु या घडामोडी अजून निर्णयापर्यंत आलेल्या नाहीत.

विद्यमान संख्याबळ
जिल्ह्यातील दहापैकी सध्या काँग्रेसकडे विधानसभेची एकही जागा नाही. सतेज पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत. राष्ट्रवादीकडे कागल व चंदगड या जागा आहेत. शिवसेनेकडे कोल्हापूर उत्तरसह
करवीर, शाहूवाडी, हातकणंगले,
शिरोळ आणि राधानगरी-भुदरगड;
तर भाजपकडे कोल्हापूर दक्षिण
आणि इचलकरंजी मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत.

पुन्हा वहिनीच
चंदगड मतदारसंघातून नंदिनी बाभूळकर यांचेही नाव मध्यंतरी स्पर्धेत आले होते. त्या भाजपकडून रिंगणात उतरतील अशी हवा होती; परंतु ही हवा बरीच खाली बसली आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडूनच आमदार संध्यादेवी कुपेकर याच नव्याने रिंगणात उतरतील असे चित्र आहे. त्यांचा संपर्क कमी आहे, कामे होत नाहीत, यंत्रणेवर प्रभाव पडत नाही, अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी असल्या तरी त्यांच्याबाबतीत काही प्रमाणात सहानुभूती आहे.

मतदारसंघ व संभाव्य उमेदवार

काँग्रेस
कोल्हापूर उत्तर :
ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे
कोल्हापूर दक्षिण :
सतेज पाटील
करवीर : पी. एन. पाटील
हातकणंगले : जयवंतराव आवळे
इचलकरंजी : प्रकाश आवाडे
शिरोळ : गणपतराव पाटील
शाहूवाडी : अमर पाटील,
कर्णसिंह गायकवाड,
किंवा डॉ. जयंत पाटील

राष्टÑवादी
कागल : हसन मुश्रीफ
राधानगरी-भुदरगड : के. पी. पाटील किंवा ए. वाय. पाटील
चंदगड : संध्यादेवी कुपेकर किंवा नंदिनी बाभूळकर
शिरोळ : राजेंद्र पाटील-यड्रावकर

 

Web Title: In the Kolhapur district, the municipal corporations, both the Congress and the Congress,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.