ज्ञान माणसाचा तिसरा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:06 AM2019-03-18T00:06:46+5:302019-03-18T00:06:51+5:30

इंद्रजित देशमुख दैवी गुणांच्या बाबतीत विश्लेषण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान या एका देखण्या दैवी गुणाबद्दल खूप देखणे विश्लेषण ...

Knowledge third person's eye | ज्ञान माणसाचा तिसरा डोळा

ज्ञान माणसाचा तिसरा डोळा

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
दैवी गुणांच्या बाबतीत विश्लेषण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान या एका देखण्या दैवी गुणाबद्दल खूप देखणे विश्लेषण केलेले आहे. वास्तविक परमार्थ आणि संसारसंपन्न व्हायचे असेल, तर आवश्यक असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान असल्याशिवाय आपण संसार आणि परमार्थ यामध्ये पारंगत होऊ शकत नाही. प्रावीण्य किंवा पारंगत होण्यासाठी आवश्यक असणारा आंतरिक भाव ज्यामध्ये सामावलेला असतो त्या अफाट संग्रहाला ज्ञान म्हणता येईल. कदाचित याचसाठी आम्ही लहान असताना एक सुविचार वाचला आणि ऐकला होता आणि तो सुविचार असा होता की, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तिसरा याचा अर्थ या दोन डोळ्यांच्यापेक्षा पुढचा प्रगल्भ आणि पक्व असणारा डोळा होय. या ज्ञानाच्या आधारेच सतत जाणिवेत राहणे साधकाला सहज शक्य होतं, म्हणून तो आपल्याजवळ असणे खूप गरजेचे आहे. भक्तांची वर्गवारी सांगत असताना ज्ञानी भक्त आपला आत्मा आहे, हे भगवान श्रीकृष्ण यांनी याचसाठी सांगितले आहे.
ज्ञानाबद्दलच चिंतन वाचून कदाचित आपल्याला असं वाटेल की, ज्ञान नेमकं म्हणायचं कशाला? उदरनिर्वाहद्वारे व्यवस्थित जगता यावं म्हणून एखाद्या विषयातील आत्मसात केलेल्या माहितीलाच ज्ञान म्हणावं का किंवा एखाद्या बाबतीत असामान्यत्व धारण करण्यासाठी त्याच बाबीतील जास्त व दार्शनिक विद्या संपादित करणे याला ज्ञान म्हणावं का? वास्तविक हे सगळे ज्ञानाचे अपुरे ज्ञान प्रकार आहेत. जे ज्ञान माउलींना अपेक्षित आहे ते अशा कुठल्या बाबीतून संपादित करता येण्यासारखे नाही. मर्यादित कक्षा असणाऱ्या मर्यादित प्रांतातील माहिती कधीच ज्ञान होऊ शकत नाही आणि त्या माहितीचा आपल्या आत्मिक शांतीसाठी कुठलाच फायदा होऊ शकत नाही, पण दैवी गुण म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची जी बाजू येऊ शकते, ती आपल्याला खूप शांत बनवते. यासाठी ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात,
‘तें ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।मग शांतीचा अंकुर फुटे।
विस्तार बहु प्रगटे। आत्मबोधाचा।।’
ज्या अनुभूतीमुळे आमच्या वृत्तीचा विस्तार होतो, आमच्या मनाच्या सर्व तºहेच्या संकुचितता लयाला जातात आणि आमच्या आत प्रगाढ शांतता नांदू लागते आणि आम्ही सतत आत्मबोधावर राहू शकतो हे परिवर्तन ज्या रसायनाद्वारे होऊ शकते ते अदृश्य रसायन म्हणजे ज्ञान होय. पुस्तकात वाचून अनुकरण करून ते प्राप्त होईल असे अजिबात नाही. मुळात ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त आणि अप्राप्त असा भेदही होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे आपल्या आत झालेलं प्रत्यंतर आणि त्या प्रत्यंतरामुळे स्वत:च स्वत:ला ओळखून किंवा स्वत:च स्वत:च्या खऱ्या रूपाला ओळखून आपले आतील सगळे व्यवहार त्या खºया रूपाशी बांधील राहून करणे म्हणजे ज्ञान होय.
या ज्ञानाबद्दल सांगत असतानाच माउलीने एका ठिकाणी सांगितले आहे की, सद् वस्तूच्या प्राप्तीची आणि तिच्या प्रचितीच्या जाणिवेची आग्रही भूमिका ज्या वृत्तीतून प्रसवते ती वृत्ती म्हणजे ज्ञान होय. या ज्ञानासाठी जगात दिसणारी भौतिक संपन्नता असली काय किंवा नसली काय फारसा फरक पडत नाही. कारण ही अंत:करणाची अवस्था आहे. बाह्यशरीराची नाही. योगायोगाने याच आठवड्यात जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे. तुकोबारायांच्या जीवनाच्या आत्मिक उंचीचा विचार केला तर त्यांनी ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी बाहेरच्या कुठल्या संसाधनाचा विकास करणे याचा फारसा विचार केला नाही. अगदी तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचं झालं तर
‘अर्थे लोपली पुराने। नाश केला शब्दज्ञाने।।’
आत्मिक उंची वाढवण्यासाठी आणि स्वस्वरूपाची जाणीव किंवा ओळख करून घेण्यासाठी बाकी अर्थ आणि अर्थांतरन असणाºया कोणत्या माहितीची गरज नाही. गरज आहे ती फक्त बोधाची आणि त्या बोधाच्या अविचलतेसाठी आवश्यक असणाºया खºया ज्ञानाची.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)

Web Title: Knowledge third person's eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.