नरके, महाडिक, सरुडकरांची प्रतिष्ठा पणाला-- ग्रामपंचायतीचे रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:55 AM2017-09-03T00:55:18+5:302017-09-03T00:56:18+5:30

 Hell, Mahadik, Sarudkar's reputation - Gram Panchayat Battlefield | नरके, महाडिक, सरुडकरांची प्रतिष्ठा पणाला-- ग्रामपंचायतीचे रणांगण

नरके, महाडिक, सरुडकरांची प्रतिष्ठा पणाला-- ग्रामपंचायतीचे रणांगण

Next
ठळक मुद्दे: संजय घाटगे, निवेदिता माने, ‘के. पी.’, दिनकरराव जाधवांचा कस लागणारसदस्यांना स्वत:च्या ताकदीवरच निवडून यावे लागणार आहे.जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या आजी-माजी संचालकांचाही गाव ताब्यात ठेवण्यासाठी कस लागणार

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण गतिमान झाले आहे. विधानसभेसाठी अजून दोन वर्र्षांचा कालावधी असला तरी, ही निवडणूक जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदारांचा कस लावणारी आहे. आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, दिनकरराव जाधव व माजी खासदार निवेदिता माने यांची आपले गाव ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा विकासाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या पातळीवर येतो. स्थानिक पातळीवर विकासात्मक कामांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविण्याची संधी मिळत असल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात थेट सरपंच निवडीबरोबरच गावचा विकास आराखडा तयार करणे व त्यानुसार खर्च करण्याचे अधिकार सरपंचाला मिळाल्याने यावेळची निवडणूक प्रतिष्ठेची व चुरशीची होणार आहे.

गणेशोत्सवाची धामधूम संपत असतानाच ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाल्याने इच्छुकांसह स्थानिक नेत्यांची तारांबळ उडाली आहे. उमेदवारी निश्चितीबरोबरच राखीव गटातील उमेदवारांचे जातीच्या दाखल्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. प्रभागातील इच्छुकांशी चर्चा सुरू झाल्या असून ,एकापेक्षा अधिक इच्छुक असणाºया प्रभागात समझोता कसा करायचा, याचे डावपेच आखले जात आहेत. नाराज होऊन चांगला उमेदवार विरोधकांच्या हाताला लागू नये, यासाठी सुरुवातीपासूनच नेत्यांनी सावध भूमिका घेत उमेदवारीबाबत ‘बघूया, फॉर्म तरी भरा’ असा सूर लावला आहे.
विधानसभेसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वांत मोठा टप्पा आता होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबरच आमदार व माजी आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्याकडे सर्वाधिक सदस्य संख्या त्याला घराघरांपर्यंत प्रचार यंत्रणा राबविण्यास सोपे जाते.

मतदारसंघातील ग्रामपंचायतीबरोबरच आमदार व माजी आमदारांना स्वत:चे ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखावे लागणार आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या कसबा बोरगाव, आमदार सत्यजित पाटील यांच्या सरूड, आमदार अमल महाडिक यांच्या शिरोली, माजी आमदार के. पी. पाटील यांची मुदाळ, संजयबाबा घाटगे यांची व्हनाळी, दिनकरराव जाधव यांची तिरवडे व माजी खासदार निवेदिता माने यांची रुकडी येथे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या आजी-माजी संचालकांचाही गाव ताब्यात ठेवण्यासाठी कस लागणार आहे.


इच्छुकांची गणेशोत्सवातच ‘ब्रँडिंग’!
ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झाल्याने इच्छुक चाचपणी करीत कामाला लागले होते. गणेशोत्सवात तर इच्छुकांनी तरुण मंडळाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत स्वत:चे ब्रॅँडिंग करण्याची संधी सोडली नाही.एकगठ्ठा मतांवरच उमेदवारी!
उमेदवारीबाबत कोणी कितीही दावे प्रतिदावे केले तरी प्रभागात कोणत्या समाजाची किती मते आहेत, त्यातील सर्वाधिक मते खेचण्याची क्षमता कोणाकडे आहे, भावकी कोणाची मोठी, यावरच उमेदवारीची गणिते अवलंबून राहणार आहेत.
‘खुल्या सरपंच’ गावात संघर्षपूर्ण लढत
संवेदनशील गावाबरोबरच ज्या ठिकाणी सरपंच पद खुले आहे, त्याठिकाणी संघर्षपूर्ण लढती पाहावयास मिळणार आहेत. बहुतेक ठिकाणी नेत्यांच्या घरातीलच उमेदवार असल्याने येथे मोठ्या अर्थपूर्ण व काटा लढती होणार हे मात्र निश्चित आहे.
सदस्यांचे महत्त्व कमीनगरपालिका निवडणुकीत सगळी ताकद नगराध्यक्षपदासाठी लावली होती. त्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते सगळी ताकद सरपंचपदासाठी लावणार हे मात्र निश्चित आहे. सदस्यांना फारसे अधिकार राहिले नाहीत, त्यात नेते लक्ष देणार नसल्याने सदस्यांना स्वत:च्या ताकदीवरच निवडून यावे लागणार आहे.

Web Title:  Hell, Mahadik, Sarudkar's reputation - Gram Panchayat Battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.