Gudi Padwa 2018: गुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी पन्हाळगडाजवळील गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 07:44 PM2018-03-17T19:44:31+5:302018-03-17T20:40:41+5:30

नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे.

Gudi Padwa 2018 For Gudhi's tallest mess, known in Panchkrithi, Gude village near Panhalgarh. | Gudi Padwa 2018: गुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी पन्हाळगडाजवळील गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्द

Gudi Padwa 2018: गुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी पन्हाळगडाजवळील गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्द

googlenewsNext
ठळक मुद्देगुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्दऐतिहासिक संदर्भ : गुढीपाडव्याला मोठी मागणी

संदीप आडनाईक

कोल्हापूर : नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे (मानगुडे) गावातून पन्हाळगडावर गुढीसाठी लागणाऱ्या मेसकाठ्या किंवा चिवे आणले जाते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात सर्वाधिक चिव्याची बेटे आहेत. शिवाय येथील चिवे हिरवेगार, सरळ आणि सर्वाधिक उंचीचे असतात. साधारण तीस ते ३५ फुट उंच असलेल्या येथील चिवे किंवा मेसकाठ्या गुढीसाठी आजही प्राधान्याने वापरल्या जातात. या गावचा इतिहासही रंजक आहे.




(छाया : नितीन भगवान, पन्हाळा)

 

मानगुडेची लोकसंख्या अवघी सहाशे

पन्हाळ्यावरील तीन दरवाजा मार्गे गडाखाली उतरले की गुढे हे गाव प्रथम लागते. अवघी ६00 लोकसंख्या असलेले हे गाव सोमवारपेठ ग्रुप ग्रामपंचायतीशी जोडलेले आहे. या गावचे खरे नाव मान गुडे असे आहे. या गावात कदम कुटूंबियांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. गायकवाड आणि चिखलकर ही वेगळी आडनावे असलेली दोनच घरे येथे आहेत. परंतु येथील घरे ग्रामस्थांच्या स्वमालकीची नाहीत. दर्गाहसाठी इनाम मिळालेल्या जमिनी येथील ग्रामस्थ कसून उपजिविका करतात.

मानाच्या काठीसाठी मानगुडे प्रसिध्द

मानगुडे गावाला मोठा इतिहास आहे. शिवरायांच्या काळात आणि नंतर छत्रपतींची राजधानी पन्हाळ्यावर असताना याच गावातील मेसकाठ्या गुढीसाठी वापरले जाई. आजही हे गाव याचसाठी पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. शिवाय गावाला इनामजमिनींने वेढलेले आहे. त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. इसवीसन १५५८ मध्ये आदिलशहा याने पन्हाळगडावरील संत हजरत पीर शाहोदोद्दीन कतालवली यांना पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेली ही १0६ एकर जमीन इनाम दिली. म्हणून या गावाला मानगुडे असेही म्हणतात. आजही त्यांच्या नावानेच या गावचा सातबारा आहे. सध्या त्याचा कारभार ट्रस्टमार्फत होतो.


कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यामध्ये गुढीसाठी लागणारे चिवे किंवा मेसकाठ्या मिळतात. प्रामुख्याने पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यातील बहुतेक गावांत ही चिव्यांची बेटे आहेत. या गावातील स्थानिक शेतकरी गुढीसाठी परिपक्व झालेले चिवे किंवा मेसकाठ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी विक्रीसाठी आणतात. ग्रामीण भागात ५0-६0 रुपयांना मिळणारी ही गुढीची मेसकाठी आता ७0-८0 रुपयांपर्यंत मिळते.


असे म्हटले जाते की, पूर्वी छत्रपतींची राजधानी असताना पन्हाळगडावर राहणाऱ्या सरदारांच्या घरी, वाड्यावर मानाची गुढी उभारण्यासाठी लागणारे चिवे किंवा मेसकाठ्या याच मानगुडे गावातून मागविले जात. याशिवाय युध्दकाळात किंवा लढाईच्या वेळी राजांचे सन्मानचिन्ह म्हणून किंवा पताका, झेंडा लावण्यासाठी लागणाऱ्या काठ्या याच गावातून पुरविल्या जात. म्हणून कदाचत या गावाला गुडे (मानगुडे) असे पडले असावे.
अमर आडके, दुर्ग अभ्यासक 

Web Title: Gudi Padwa 2018 For Gudhi's tallest mess, known in Panchkrithi, Gude village near Panhalgarh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.