दूध उत्पादन घटल्यानंतर सरकारकडून अनुदानाचे गाजर : सरकारची मखलाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:59 AM2018-05-09T00:59:58+5:302018-05-09T00:59:58+5:30

Government subsidy of carrot after subsidization of milk after production decreases | दूध उत्पादन घटल्यानंतर सरकारकडून अनुदानाचे गाजर : सरकारची मखलाशी

दूध उत्पादन घटल्यानंतर सरकारकडून अनुदानाचे गाजर : सरकारची मखलाशी

Next
ठळक मुद्देपावडर उत्पादनाच्या अटीमुळे दूध संघ अनुदानापासून वंचित राहणार; फायद्याची शक्यता कमी

राजाराम लोंढे।
कोल्हापूर : दूध पावडर उत्पादनांवर राज्य सरकारने प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी त्याचा फायदा दूध संघांना सध्या तरी होण्याची शक्यता कमी आहे. कडक उन्हाळा व दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमुळे पावडर उत्पादन कमी झाले आहे. गेल्या महिन्यापेक्षा २० टक्के जादा पावडर उत्पादन केले तरच अनुदान देण्याची अट घालण्याची मखलाशी सरकारने केली आहे.
दूध व्यवसाय अडचणीत आल्याने जून २०१७ मध्ये राज्य सरकारने गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली. सरकारच्या आदेशानुसार दूध संघांनी म्हैस दुधाला मागणी असल्याने दरवाढ दिली; पण गाईच्या दुधाबरोबर पावडरलाही मागणी नसल्याने गाय दूध खरेदीत वाढ दिलीच नाही.
‘गोकुळ’, ‘वारणा’ दूध संघांनी गाईच्या ३.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर दिला; पण राज्यातील अनेक दूध संघांचे विशेषत: खासगी संघांचे दर १८ रुपयांपर्यंत खाली आले. दरावरून साऱ्या महाराष्टÑातील दूध चांगलेच तापले असून, त्याची दखल घेऊन सरकारने मंगळवारी पावडर उत्पादनावर अनुदान देण्याची घोषणा केली; पण त्यात मार्च २०१८ पेक्षा २० टक्के जादा उत्पादन झाले तरच प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याची मेख मारली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून महाराष्टÑ कडक उन्हाने होरपळून निघाला आहे.
अनेक ठिकाणी ओल्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याने दूध उत्पादन घटले आहे. दरवर्षी मार्चनंतर हळूहळू दूध उत्पादन कमी होत जातेच; पण यंंदा कडक उन्हामुळे त्यात अधिकच घट झाली आहे. सप्टेंबर-आॅक्टोेबरपासून ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघ रोज अनुक्रमे पाच व दोन लाख लिटरची पावडर करीत होते. अलीकडे दुधाचे उत्पादन कमी झाल्याने ‘गोकुळ’ दोन, तर ‘वारणा’ दीड लाख लिटरची पावडर करीत आहे. सध्या तरी पावडरचे त्यापेक्षाही कमी उत्पादन होत आहे.
सरकारच्या अटीनुसार मार्चपेक्षा २० टक्के जादा उत्पादन झाले तरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अनुदानाचा फायदा ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांना होण्याची शक्यता फारच कमी आहे.

दूध दरवाढ अशक्यच
सरकारने दूध उत्पादकाला दरवाढ मिळावी म्हणून अनुदान जाहीर केले असले तरी त्याचा फायदा होणार नाही. उत्पादनाच्या अटीबरोबरच पावडरचा दर व उत्पादन खर्चात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांची तफावत असल्याने संघ दूध दरवाढ करण्याची शक्यता फारच धूसर आहे.


सरकारने यापेक्षा इतर राज्यांप्रमाणे थेट दूध उत्पादकाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची गरज होती. पावडर अनुदानाचा संघांना सध्या तरी फायदा होईल, असे वाटत नाही.
- बी. बी. भंडारी
(सरव्यवस्थापक, वारणा दूध संघ)


पावडरचे दर व उत्पादन खर्च यांमध्ये प्रतिलिटर १०.६९ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यात पावडर अनुदान देताना सरकारने अट घातल्याने सध्या तरी अनुदानाचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.
- विश्वास पाटील
(अध्यक्ष, गोकुळ)

Web Title: Government subsidy of carrot after subsidization of milk after production decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.