'Gokul' milk price hike is a reflection of granulated milk producers: Demand for grant of cow milk | ‘गोकुळ’ दूध दरवाढीचा संघर्ष पेटला दूध उत्पादकांचा प्रतिमोर्च : गाय दूधास अनुदान देण्याची मागणी

कोल्हापूर :जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गाईच्या दुधास दोन रुपये दरवाढी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चास आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील सत्तारूढ गटाने विराट प्रतिमोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘गोकुळ’हा देशात नावाजलेला दूध संघ असून, अशा संस्थेची बदनामी यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने गाईच्या दुधास लिटरमागे प्रत्येकी पाच रुपयांचे अनुदान थेट उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली व तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

गेल्या आठवड्यात आमदार पाटील यांनी मोर्चा काढून ‘गोकुळ’च्या कारभारावर व संचालकांच्या उधळपट्टीवर टीकेची झोड उठविली होती. या संस्थेचा वापर महाडिक यांच्या खासगी मालमत्तेसारखा होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तो जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेऊन हा निषेध मोर्चा व जागृती मेळावा काढला. त्यामध्ये महिलांसह गावोगावचे उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

माजी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘महाडिक व पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकारणात ‘गोकुळ’चे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. ही चांगली चाललेली संस्था राजकीय आरोप-प्रत्यारोप करून बदनाम होणार नाही याची दक्षता घ्या.’महादेवराव महाडिक म्हणाले,‘ गोकुळ हे महाडिक कुटुंबांचे शक्तिस्थान आहे. त्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहू लागले तर उत्पादकच त्यांना पुरून उरतील.’

महाडिक यांच्या टँकरची यादीच जाहीर
हा मोर्चा संपल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक यांच्या २३ टँकरची यादीच जाहीर केली. खासदार महाडिक हे आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांचे हे टँकर आहेत असे सांगत असतील तर मग ४५ लाखांचा टँकर घेणारे कोण गरीब कार्यकर्ते आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हानही पाटील यांनी दिले.