सुसज्ज मैदानांसाठी लोकचळवळ गरजेची-: राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:52 AM2019-03-29T00:52:29+5:302019-03-29T00:56:19+5:30

मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे

Fairs needed for the well-being of the plains - aside from politics, hedging aside and needing to unite | सुसज्ज मैदानांसाठी लोकचळवळ गरजेची-: राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट आवश्यक

लोकसहभागामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने सुसज्ज असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची कसबा बावडा,शास्त्रीनगर रुईकर कॉलनी मैदान मैदाने.

Next
ठळक मुद्देनागरिकांसह खेळाडूंचा पुढाकार हवा

प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे असे नागरिकांनाही वाटणे गरजेचे आहे. मैदाने टिकवायची असतील तर ती वापरणाऱ्या नागरिकांनी, तरुणांनी, खेळाडूंनी पुढे येण्याची गरज आहे. अशी चळवळ प्रत्येक मैदानाच्या भागात सुरू झाल्यास शहरात मैदानांचे रूप बदलणे अवघड नाही. शहरातील लोकचळवळीतून शास्त्रीनगर मैदान, कसबा बावडा पॅव्हेलियन या मैदानांचा होत असलेला कायापालट याचे उत्तम उदाहरण आहे.

दहावी-बारावीची परीक्षा संपल्याने उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांना ओढ लागते ती मैदानाची; पण शहरात खेळाडू जास्त आणि मैदाने कमी अशी स्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. आहेत ती मैदाने भाडेतत्त्वावर मेळावे किंवा अन्य कामांसाठी देण्यात आली आहेत. मोकळ्या जागेवर वाहनांच्या पार्किंगचा विळखा आहे. उपलब्ध मैदानांवर खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने मुलांना विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मैदानांच्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे.
हे खेळाडू आहेत त्या सुविधांमध्येच विविध क्रीडांगणांवर सराव करीत आहेत.

शहरातील महानगरपालिकेच्या गांधी मैदान, मेजर ध्यानचंद स्टेडियम, शास्त्रीनगर मैदान, रुईकर कॉलनी, सासने मैदान, मेरी वेदर मैदान, दुधाळी पॅव्हेलियन, कसबा बावडा पॅव्हेलियन यांसह शिवाजी स्टेडियम, शाहूपुरी जिमखाना, राजाराम कॉलेज, तपोवन मैदान अशी मोठी मैदाने आहेत.
मात्र, येथील बहुतांश मैदानांवर खेळाडूंना आवश्यक सुविधांचा अभाव आहे. मैदानांना संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त वावर असतो. रात्रीच्या वेळी ही मैदाने ओपन बार म्हणून वापरली जातात. काही समारंभ असो किंवा अन्य कामांसाठी येथे पार्किंग नित्याचे झाले आहे; तर काही मैदानांवर दरवर्षी काही मेळावे, प्रदर्शने ही हे नित्याची झाली आहेत.
खासगी समर कॅम्पवाल्यांनी मैदानावर कब्जा केलेला आहे. यामुळे मुलांना खेळण्यासाठी तर ज्येष्ठ नागरिक व नागरिकांना फिरण्यासाठी मोठी समस्या होते.

या समस्येला जशी महानगरपालिका कारणीभूत आहेच; तसेच नागरिकही. किती नागरिक मैदान सुस्थितीत ठेवण्यासाठी तळमळ दाखवतात? याबाबत उदासीनताच दिसून येते. महानगरपालिकेचे तोकडे नियोजनही याला कारणीभूत असले तरी लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधीची साथ मिळाल्यास महानगरपालिकेची शास्त्रीनगर, कसबा बावडा पॅव्हेलियन, रुईकर कॉलनी मैदानाचा झालेला विकास ही तीन ठसठशीत उदाहरणे आहेत.
मैदानांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, मंडळे, खेळाडू आणि नागरिकांनी मैदान सुस्थितीत व निगा राखण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे. विशेष म्हणजे, त्या परिसरातील नागरिकांनी राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून मैदानासाठी एक होऊन चळवळ प्रत्येक भागात सुरू झाल्यास मैदानांवरील सर्व समस्या काही वेळातच सुटतील. अशी चळवळ उभी करणे फार अवघड नाही.
 

ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे मैदान स्वच्छ ठेवल्यास मनपाच्या कर्मचाऱ्यांची गरजही भासणार नाही. प्रत्येक मैदान परिसरातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मैदानातील तळिराम हटविण्यासाठी चळवळ उभी केल्यास, मैदानातील ओपन बारही बंद होईल.

- सुहास साळोखे, माजी खेळाडू

मैदानाच्या प्रश्नी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून खेळाडू म्हणूनच मैदानाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. ही जबाबदारी स्थानिक नागरिकांचीही आहे. तिला शासनाची साथ मिळणे गरजेचे आहे.
- सुरेश ढोणुक्षे, माजी नगरसेवक


 

Web Title: Fairs needed for the well-being of the plains - aside from politics, hedging aside and needing to unite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.