आसमंतात दुमदुमला शिव जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:31 AM2019-02-20T00:31:05+5:302019-02-20T00:31:10+5:30

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्टÑाचे दैवत शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजन्मकाळ ...

Dum Dumumba Shiva Jayajyakar | आसमंतात दुमदुमला शिव जयजयकार

आसमंतात दुमदुमला शिव जयजयकार

Next

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्टÑाचे दैवत शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजन्मकाळ सोहळा, मिरवणुकीमुळे रस्ते शिवभक्तांनी व्यापून गेले. जयंतीनिमित्ताने अवघे शहर भगवे आणि शिवमय झाले होते. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने पारंपरिक बाज राखत, तसेच अत्याधुनिकतेची झालर जोडत काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
कोल्हापूर शहर परिसरात शिवजयंतीचा कमालीचा उत्साह दिसून आला. सकाळपासून चौकाचौकांत शिवप्रतिमांचे, पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. फुलांनी, केळीच्या पानांनी सजवलेले मंडप, भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. पेठापेठांत, गल्लीबोळांत ऐतिहासिक पोवाडे, तसेच स्फुल्लिंग चेतवणारी गाणी ऐकवली जात होती. सायंकाळी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ, तसेच मुस्लिम ब्रिगेड यांच्या मिरवणुकीने शहरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले. मिरजकर तिकटी येथील मावळा ग्रुप तर्फे सकाळी १०० वादकांच्या रणांगण ढोलपथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी दिली.
शिवज्योतींची दौड, कार्यकर्त्यांचा उत्साह
सोमवारी रात्रभर शिवज्योत नेण्याची धांदल सुरूहोती. शिवज्योतींची ही दौड मंगळवारी सकाळपर्यंत सुरूहोती. ज्योत प्रज्वलित करणे आणि तिचे स्वागत धुमधडाक्यात सुरूहोते. सकाळी १0 वाजून १0 मिनिटांनी मोठ्या उत्साहात शिवजन्मकाळ पार पडला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. अनेक स्त्री-पुरुष शिवभक्तांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा करून भगवे फेटे बांधले होते.
येथील मध्यवर्ती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौक, महानगरपालिकेचे शाहू सभागृह येथील छत्रपतींच्या पुतळ्याभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय अनेक मंडळांनीही विद्युत रोषणाई साकारली होती. शहरात सर्वत्र शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाची महती सांगणारे फलक उभारण्यात आले होते; त्यामुळे शहरातील वातावरण भगवे आणि शिवमय होऊन गेले.

Web Title: Dum Dumumba Shiva Jayajyakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.