‘स्वप्न’ घराचे अन् लग्नाचे...दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:03 AM2019-01-08T01:03:15+5:302019-01-08T01:03:52+5:30

घर पहावे बांधून आणि लग्न पाहावे करून; असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तिचा प्रत्यय जो घर बांधायला काढतो किंवा आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न ठरवतो आणि ते पार पडतो त्यालाच येतो. कारण या दोन्ही गोष्टी करणाऱ्याला कर्जबाजारी करून सोडतात

'Dream' house and marriage ... look | ‘स्वप्न’ घराचे अन् लग्नाचे...दृष्टीक्षेप

‘स्वप्न’ घराचे अन् लग्नाचे...दृष्टीक्षेप

Next

- चंद्रकांत कित्तुरे
घर पहावे बांधून आणि लग्न पाहावे करून; असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तिचा प्रत्यय जो घर बांधायला काढतो किंवा आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न ठरवतो आणि ते पार पडतो त्यालाच येतो. कारण या दोन्ही गोष्टी करणाऱ्याला कर्जबाजारी करून सोडतात. आतातर ‘सर्वसामान्य अथवा मध्यमवर्गीयांने घराचे ‘स्वप्न’ द्यावे सोडून,’ असा नवा वाक्प्रचार रूढ करण्याची वेळ आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ म्हणून योजना राबवत आहे. त्यासाठी २ लाख ७० हजारांपर्यंत अनुदानही देत आहे. हे अनुदान कुणाला मिळत ज्यांची कर्जफेडीची ऐपत आहे. ज्यांना बॅँकेने कर्ज मंजूर केले आहे. बॅँका कुणाला कर्ज देतात त्यासाठीची प्रक्रिया काय असते; हे बॅँकेकडे कर्ज मागणीसाठी गेल्यानंतरच कळते. महिन्याला दहा-पंधरा हजार पगार अथवा मजुरी मिळविणाºयांकडे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही गोळा करणे कठीण असते शिवाय येणाºया पगारात कुटुंबाचा चरितार्थ चालवून कर्जाचे हप्ते कसे भागवणार ? शिवाय हे हप्ते एक-दोन वर्षाचे नसतात पंधरा-वीस वर्षे ते भरत राहावे लागतात. त्यामुळे बरेचजण घराचे स्वप्न पाहणेच सोडून देत आहेत. शहरी भागात अख्खे आयुष्य भाड्याच्या घरात काढणारी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात.

परवा एक मित्र भेटला होता. त्याने बोलता-बोलता आपल्या एका नातेवाईकांची कहाणी सांगितली. त्या नातेवाईकाचा मुलगा यंत्रमागावर काम करतो. राहायला घर नाही म्हणून त्याचे लग्न ठरत नाही. या मुलाचे वडील कर्नाटकातून पोट भरण्यासाठी म्हणून इचलकरंजीत आलेले. येथे आल्यानंतर शेतात काही दिवस मजुरी केल्यांनतर यंत्रमाग चालवायला शिकले. यंत्रमागावर काम करू लागले. लग्न झाले. भाड्याच्या घरात संसार थाटला. संसारवेलीवर दोन मुली, दोन मुले अशी चार फुले उमलली. त्यांचे शिक्षण, मुलींची लग्ने करून देण्यात हयात गेली. दोन वर्षांपूर्वीच अचानक एके रात्री हृदयविकाराचा झटका आला अन् ते गेले. अखेरपर्यंत ते भाड्याच्या घरातच होते. घर घेणे त्यांना जमलेच नाही. अजून एक मुलगा लग्नाचा आहे. मुलींचा शोध सुरू आहे. अनेक स्थळे पाहिली पण राहायला घर नाही, यंत्रमागावर काम करतो या कारणावरून लग्न जुळेना झाले आहे. पाहा एखादी गरिबाची मुलगी असेल तर मुलगा खूप चांगला आहे, असे सांगायलाही हा मित्र विसरला नाही. याला प्रातिनिधीक उदाहरण मानायचे झाले तर सर्वांच्याच वाट्याला अशी वेळ येते असे नाही.

कारण ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात;’ असे मानणाराही एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे तरीही या मित्राच्या म्हणण्यात तथ्य आहे. सद्य:स्थितीचा विचार करता जागेच्या आणि घराच्या किमती गगनाला गेल्या आहेत. काही लाख रुपये मोजल्याशिवाय घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही. कारण यंत्रमाग कामगार अथवा एमआयडीसीतील कारखान्यात काम करणाºया कामगाराला मिळणारा पगार किंवा उत्पन्नाचा स्रोत सांगितला तर बॅँका दारातही उभा करून घेत नाहीत. त्यामुळेच घराचा विचार सोडून देऊन अनेकांना भाड्याच्या घरातच आयुष्य कंठावे लागत आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते घराचे स्वप्न द्यावे सोडून!

लग्नासाठी येणारा खर्च लक्षात घेता वधूपित्याला तो कर्जबाजारी करूनच सोडतो. आजकाल मुली मिळत नाहीत. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे वरपक्ष फार काही मागत नाही, असे म्हटले जात असले तरी ते खरे नाही. कितीही साधेपणाने लग्न केले तरी रोजंदार किंवा कामगार असलेल्या बापाला त्या लग्नासाठी कर्ज काढावेच लागते. ज्यांना काढावे लागत नाही ते नशीबवानच. केवळ वधूपितेच कर्जबाजारी होतात असेही नाही. मुलाचे लग्न जोरात झाले पाहिजे म्हणून कर्ज काढणारेही काही कमी नाहीत. शेतकरी कर्जबाजारी होण्याचेही एक कारण लग्नसोहळा हे आहे.

ही चर्चा फक्त सर्वसामान्यांच्या लग्नाची. श्रीमंतांच्या लग्नातील थाटमाट आणि पैशांची केली जाणारी उधळपट्टी, हौसेच्या नावाखाली सर्वमान्य असते. त्याची मोठी चर्चाही होते. गेल्याच महिन्यात प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी, दीपिका पदुकोन यांच्या लग्नाची चर्चा खूप झाली. त्यांचे कौतुकही झाले. सर्वसामान्यांच्या घरातील लग्नसोहळे कर्जाविना पार पडावेत यासाठी कुणी प्रयत्न करणार का? समाजाची मानसिकता बदलणार का?

Web Title: 'Dream' house and marriage ... look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.