ठळक मुद्देजागतिक अ‍ॅनिमेशन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उद्योगाची मोठी संधीअ‍ॅनिमेशनची बाजारपेठ पचिम महाराष्ट्रात उभी राहू शकतेदळवीजच्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपनीत संधी

संदीप आडनाईक 


कोल्हापूर , दि. २८ :  फक्त राज्यातच नव्हे, तर देशातील अ‍ॅनिमेशन उद्योगात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील चित्रकलेचे अनेक विद्यार्थी सक्रिय आहेत. यामध्ये कोल्हापुरातील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. यानिमित्ताने अ‍ॅनिमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या  उद्योगांना पश्चिम महाराष्ट्रात मोठी संधी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरवर्षी जगभरात २८ आॅक्टोबरला आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन साजरा होतो. या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील कला क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅनिमेशन क्षेत्रात घेतलेली भरारी ही येथील विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचे आणि कौशल्याचेच प्रतीक आहे. गेल्या चार महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील कला संस्थेतून अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील उद्योगांनी हजारो कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.


कोल्हापूरने आजपर्यंत अनेक दिग्गज चित्रकार देशाला दिले आहेत. आजही सातारा, सांगली, कऱ्हाड , कोल्हापूर, इचलकरंजी येथील अनेक चित्रकार संधीच्या शोधात मुंबई-पुण्याकडे जात असतात. तेथे अ‍ॅनिमेशनचे उद्योग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या उद्योगात कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक चित्रकार मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.

यानिमित्ताने मुंबई-पुणे आणि हैद्राबाद-बंगलोर-चेन्नई व्यतिरिक्त अ‍ॅनिमेशनची बाजारपेठ पचिम महाराष्ट्रात उभी राहू शकते, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दळवीजच्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपनीत संधी

गेल्या चार महिन्यांत आय रिअ‍ॅलिटी, माया डिजिटल्स् आणि फेबस यांसारख्या अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील मोठ्या उद्योगांनी एकट्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट सारख्या कला संस्थेत झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून अनेक नवोदितांना संधी मिळालेली आहे.


आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन

१८९२ मध्ये याच दिवशी पॅरिसमध्ये ग्रेव्हीन म्युझियममध्ये चार्ल्स इमाईल रेनॉडस् यांच्या जगातल्या ऐतिहासिक पहिल्याच अ‍ॅनिमेशनपट निर्मितीचे प्रदर्शन झाले होते. द असोसिएशन आॅफ इंटरनॅशनल फिल्म्स् द अ‍ॅनिमेशन म्हणजेच ‘असिफा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने हा दिन ‘आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन’ म्हणून ५० पेक्षा जास्त देशांत १००० पेक्षा जास्त इव्हेंटस्मधून साजरा केला जातो. अनेक कार्यशाळा, सेमिनार्स, केसस्टडीज, अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शन, मासिक कम्प्युटर ग्राफिक मिटिंग्स, कम्युनिटी अ‍ॅक्टिव्हिटीज, भारतीय अ‍ॅनिमेटर्सकरिता शैक्षणिक कार्यक्रम, चित्रपट महोत्सव यांसारख्या स्वरूपाचे कार्यक्रम या अंतर्गत आयोजित केले जातात.

 


अ‍ॅनिमेशन म्हणजे काय?

अ‍ॅनिमेशन म्हणजे लहान मुलांचेच कार्यक्रम असा गैरसमज आहे. ९0 टक्के कार्टून शैलीतच अ‍ॅनिमेशन फिल्म्स जगभर बनविल्या गेल्यात. कार्टून शैली ही मुळात चित्र रेखाटण्यास सोपी, मूलभूत आकाराचा उपयोग जास्त करता येण्याजोगी, लक्षवेधक, विनोद रसप्रधान व अ‍ॅनिमेशन शैली आणि तंत्रास सहज झेपणारी आहे.

अ‍ॅनिमेशन हे फ्रेम बाय फ्रेम आणि दृष्टीसातत्य या तंत्रावर आधारित असल्यामुळे एका सेकंदाच्या हालचाली पडद्यावर दाखविण्यास २४ फ्रेम्स चित्रित कराव्या लागतात. यासाठी कार्टून म्हणजेच मूलभूत आकाराने प्रत्येक फ्रेममधील पात्राची हालचाल चित्रित करण्यास सोपी जावी म्हणून जगभर मान्यता पावलेली शैली आहे. मुंबईस्थित ग्राफिटी स्टुडिओजने तयार केलेली अभ्यासपूर्ण ‘क्रिश ट्रिश अ‍ॅन्ड बाल्टीबॉय’ ही अ‍ॅनिमेशन फिल्म भारतीय लघुचित्रशैलींवर आधारित आहे.


सन २००० नंतर इंटरनेट हे जास्त लोकाभिमुख झाल्यानंतर आणि २००८ नंतर मोबाईल तंत्रज्ञानामुळे आज सोशल मीडिया हा सर्जनाची संधी आणि उत्पन्नाचेही स्रोत वाढवतोय. मूळ अ‍ॅनिमेशनची निर्मिती अजूनही कथा, कथाकथन, चित्रशैली आणि अ‍ॅनिमेशनचे तंत्र याभोवतीच फिरतेय. आजही उत्तम साहित्य, नवीन विषय, नवीन चित्रशैली विविध वयोगटांतील प्रेक्षकांना हवीहवीशी वाटते. कोल्हापुरातील कला संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राला आवश्यक असणारे निर्मितीमागील सर्जनकौशल्य भरभरून आहे, असे मला वाटते.
- राजेश खेले, संचालक, अ‍ॅनिमेशनवाला डॉट कॉम

कोल्हापूरसारख्या आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये चित्र-शिल्प-कला या क्षेत्रांत आवड उपजतच असते. त्यात आताच्या कुमारवयीन मुलामुलींमध्ये अ‍ॅनिमेशन क्षेत्रात काम करण्याची तीव्र इच्छा अनुभवायला येत आहे. यासाठी हे विद्यार्थी परिसरातील कला महाविद्यालयांमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेऊन आपली बाजू मजबूत करतात. त्यासाठी कोल्हापुरातील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कलानिकेतन महाविद्यालय, कलामंदिर महाविद्यालय यासारख्या कलेचे शिक्षण देणाºया महाविद्यालयांचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
- अजेय दळवी,
प्राचार्य, दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कोल्हापूर