कोल्हापूर: गोकुळच्या सभा ठिकाणावरुन वाद, शौमिका महाडिकांच्या प्रश्नावर अंजना रेडेकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:54 PM2022-08-20T12:54:53+5:302022-08-20T12:55:13+5:30

आमच्यावर टीका करणाऱ्यांनी ‘राजाराम’ कारखान्याची सभा शिरोली पुलाची येथील गॅरेजवर कशी घेतली?

Controversy from Gokul meeting place, Anjana Redekar response to shoumika mahadik question | कोल्हापूर: गोकुळच्या सभा ठिकाणावरुन वाद, शौमिका महाडिकांच्या प्रश्नावर अंजना रेडेकरांचा पलटवार

कोल्हापूर: गोकुळच्या सभा ठिकाणावरुन वाद, शौमिका महाडिकांच्या प्रश्नावर अंजना रेडेकरांचा पलटवार

Next

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे. गोकुळ दूध संघाची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्टला कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याने गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांनी सभासदांवर दबावासाठीच बावड्यातील या हॉलला सभा घेतली आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. या प्रश्नावर ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘गोकुळ’ची ताराबाई पार्क येथील जागा निमुळती आहे, त्यात येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांनी जागा बदलण्याची सूचना दिल्याने महासैनिक दरबार येथे वार्षिक सभा घेत आहोत. टीका करणाऱ्यांच्या सासऱ्यांची सत्ता असताना सप्टेंबर २०१४ ला येथेच सभा झाली होती, हे कदाचित त्यांना माहिती नसावे. सभेच्या जागेवरून जाब विचारणाऱ्यांना राजाराम कारखान्याची सभा शिरोलीच्या गॅरेजवर कशी घेतली? असा पलटवार ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर यांनी केला.

सभासदांवर दबावासाठीच बावड्यातील महासैनिक दरबार हॉल येथे घेतल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला होता. त्यावर, अंजना रेडेकर म्हणाल्या, यापूर्वी २६ सप्टेंबर २०१४ ला महासैनिक दरबार येथे, २९ सप्टेंबर २०१३ ला शाहू सांस्कृतिक भवन येथे संघाची सभा झालेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खुल्या जागेत सभा घेतली तर सभासदांची गैरसोय होऊ शकते. यासाठीच महासैनिक दरबार येथे सभा घेत आहोत, आणि कसबा बावडा हे जिल्ह्यातील ठिकाण आहे, ‘गोकुळ’चे कार्यक्षेत्र जिल्हा आहे. त्यातही महासैनिक दरबार हे माजी सैनिकांचे कार्यालय आहे, कोणाची खासगी मालमत्ता नाही.

आमच्यावर टीका करणाऱ्यांनी ‘राजाराम’ कारखान्याची सभा शिरोली पुलाची येथील गॅरेजवर कशी घेतली? दूध उत्पादक व ‘गोकुळ’चे नाते घट्ट आहे. संघाचा सभासद हा चाणाक्ष आहे, तो कोणत्याही दबावाला बळी पडत नाही, हे निवडणुकीत दाखवून दिले आहे. आज संघ जो यशोशिखरावर आहे, तो दूध उत्पादकांमुळेच, तेच संघाचे मालक आहेत. राजकारणासाठी संघाची बदनामी करू नये, असेही अंजना रेडेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

लिटरला ६ रुपयांची वाढ, हाच सभासदाभिमुख कारभार

आमच्याकडे सत्ता आल्यापासून गेल्या १५ महिन्यांत म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ६ तर गाय दुधात ४ रुपयांची वाढ केली. हाच आमचा सभासदाभिमुख कारभार असून दबावाची आम्हाला गरज नसल्याचे रेडेकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Controversy from Gokul meeting place, Anjana Redekar response to shoumika mahadik question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.