कोल्हापूर : आपल्यापुढे शेती टिकविण्याच्या आव्हानासोबतच आई-बाबा टिकविण्याचे मुख्य आव्हान आहे. वाढत्या शहरीकरणात माणसे दुरावत चालली आहेत. एकमेकांमधील दुरावा वाढत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
कृषी महाविद्यालयातील सभागृहात गुरुवारी चैतन्य डोंगरे व विनायक हेगाणा या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अवकाळ’ लघुपट प्रदर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. जी. जी. खोत होते.
लवटे म्हणाले, आपल्या देशात फक्त निसर्गाचाच अवकाळ नसून संस्कृतीचा अवकाळ आहे, वागणुकीचा अवकाळ आहे. अजूनही या ठिकाणी गरीब-श्रीमंत असा भेद केला जातो. शेतकऱ्यांना फक्त आर्थिकदृष्ट्या पाठबळ देऊन उपयोग नाही, तर त्यांना मानसिकदृष्ट्या पाठबळ दिले पाहिजे.
खोत म्हणाले, अवकाळी संकट आल्यानंतर शेतकऱ्याला लढ म्हणायची ताकद या लघुपटातून मिळणार आहे. संकटातून मार्ग कसा काढायचा, याचा संदेश यातून नक्कीच मिळतो.
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांच्यासह कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कोमल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनायक हेगाणा यांनी आभार मानले.


५‘अवकाळ’बाबत
या लघुपटाद्वारे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी गारपीट या संकटावर भाष्य केले आहे. शेतकऱ्यांनीही यामध्ये काहीतरी घेण्यासारखा व शासनाला, समाजाला यातील वास्तव दाखविले आहे. कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विनायक हेगाणा याने या लघुपटाची कथा लिहिली आहे; तर शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशनचा प्रथम वर्षातील चैतन्य डोंगरे याने दिग्दर्शन केले आहे. यामध्ये शेतकऱ्याची भूमिका विनायकने, तर त्याच्या बहिणीची भूमिका कोमल पाटील यांनी साकारली आहे.