संकटांना धैर्याने सामोरे जाणारे जिगरबाज अंध दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:46 AM2019-01-01T00:46:14+5:302019-01-01T00:46:19+5:30

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : त्या अंध शिक्षिका आहेत, त्या मुलांना कसं चांगलं शिकवतील म्हणून जिल्हा ...

Blindly Oppressed Danger | संकटांना धैर्याने सामोरे जाणारे जिगरबाज अंध दाम्पत्य

संकटांना धैर्याने सामोरे जाणारे जिगरबाज अंध दाम्पत्य

Next

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : त्या अंध शिक्षिका आहेत, त्या मुलांना कसं चांगलं शिकवतील म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत रूजू होतानाच जे पालक विरोध करतात तेच पालक त्याच शिक्षिकेची बदली झाल्यावर मात्र आम्हाला याच शिक्षिका हव्यात म्हणून त्यांच्या बदलीस विरोध करतात, असा अनुभव संगीता पुंड-निकम यांना येत आहे. त्यातून त्यांची गुणवत्ताच सिद्ध झाली आहे. संकटे कितीही आली तरी मोडून न पडता त्याला सामोरे जाऊन जीवन कसे सुंदर करता येते याचा वस्तुपाठच भारत व संगीता या शंभर टक्के अंध दाम्पत्याने घालून दिला आहे.
भारत निकम रोज सकाळी सहा वाजता उठून कोल्हापूर ते मिरज असा रेल्वे प्रवास करतात आणि अधीक्षक म्हणूनही त्यांनी कामाची वेगळी छाप पाडली आहे. राज्यात २१ शासकीय अपंग बालगृहे व शाळा आहेत. त्यापैकी पूर्णत: अंध असणारे हे एकमेव अधीक्षक आहेत. त्यांनी मिरज येथील शाळेला ‘आयएसओ मानांकन’ मिळवून दिले आहे. असे मानांकन मिळालेली ही पहिली शासकीय शाळा आहे. शाळेत अर्ली इंटरव्हेंशन केंद्र आहे. पहिले ई- लर्निंग सेंटरही त्यांनी सुरू केले आहे. या शाळेच्या व्हीलचेअर बास्केटबॉल संघाने राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
भारत मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे. संगीता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या. त्यांनाही परिस्थितीशी कायम संघर्ष करावा लागला. त्या जन्माने अंध नाहीत. त्यांचा १९९७ ला अपघात झाला, त्यात त्यांना कायमचे अंधपण आले. त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन डी.एड्. केले. श्रीरामपूरला ‘नॅब’च्या शाळेत पाच वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. भारत यांनी त्यांच्या नोकरीसाठी बरीच खटपट केल्यावर संगीता यांना कोल्हापूर महापालिकेत नोकरी मिळाली. अहिल्याबाई प्राथमिक विद्यामंदिरात २२ विद्यार्थ्यांना त्या शिकवू लागल्या. अपंगांसाठी असलेली योजना बंद झाल्याने त्यांचे समायोजन जिल्हा परिषदेत झाले. त्यांना कबनूर शाळेत नोकरी मिळाली; परंतु त्यांना तिथे हजर करून घेण्यास विरोध झाला. आम्ही त्यांचा वर्ग सांभाळणार नाही, लेखन करणार नाही, असा पवित्रा सहशिक्षकांनी घेतला; परंतु जेव्हा त्यांची पाच वर्षांनंतर बदली झाली तेव्हा मुलींनी आम्हाला याच बाई पाहिजेत; म्हणून हंबरडा फोडला. वाशी (ता. करवीर) येथे बदली झाल्यावर तिथेही त्यांना हजरच करून घेतले नाही. फारच दबाव आल्यावर मग मुख्याध्यापिकेने त्यांना दुसरीचा वर्ग दिला. अशी अंधबाई आमच्या मुलांना काय शिकवणार, पिढी बरबाद होईल, अशा तक्रारी झाल्या. त्यांनी अध्यापनाचे काम सुरूच ठेवले. आता त्याच वर्गातील मुले विविध परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवू लागली आहेत. चौथीच्या मुलांच्या पालकांनी आमच्या मुलांना याच बाई शिकवू देत म्हणून आग्रह धरला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल त्यांचा अंजनाबाई लहाने पुरस्काराने नुकताच गौरव झाला आहे.

Web Title: Blindly Oppressed Danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.