बाप्पा चालले आपल्या गावाला...

By admin | Published: September 15, 2016 12:20 AM2016-09-15T00:20:50+5:302016-09-15T00:29:16+5:30

गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण : सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरची उभारणी, रस्त्याचे पॅचवर्क

Bappa walks to your village ... | बाप्पा चालले आपल्या गावाला...

बाप्पा चालले आपल्या गावाला...

Next

कोल्हापूर : आबालवृद्धांच्या लाडक्या अशा गणपती बाप्पाला आज, गुरुवारी निरोप द्यावा लागणार आहे. यानिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट, इराणी खण, राजाराम बंधारा येथे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गणेशोत्सव देखाव्याचा बुधवार हा अखेरचा दिवस असल्याने पावसाच्या सरींतही नागरिकांनी देखावे पाहण्याचा आनंद लुटला.
विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी नऊ वाजता खासबाग मैदान येथून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांना महापालिकेच्यावतीने पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते श्रीफळ, पानसुपारी देणार आहे.
इराणी खणीवर गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी क्रेन व दोन जेसीबी यंत्रांची व्यवस्था केली आहे. तसेच खणीभोवती संरक्षणासाठी लोखंडी अडथळे उभारण्यात आले असून, वॉच टॉवर व पोलिसांचे शामियाने उभारण्यात आले आहेत. तसेच जाऊळाचा गणपती ते इराणी खण हा रस्ता विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळाच्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली असून, वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. विसर्जन मार्गावरील ४५ धोकादायक इमारतींभोवती लोखंडी अडथळे उभारण्यात येत आहेत. अग्निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षारक्षक आवश्यक त्या साधनसामग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महापालिकेतर्फे पोलिस खात्यास तीन मशीन्स देण्यात आली आहेत. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत

मंडळांची लगबग
गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी एकीकडे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असताना दुसरीकडे मंडळांमध्येही मिरवणुकीची लगबग सुरू होती. यंदा मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्ये व विविध राज्यांतील संस्कृती विशद करणाऱ्या देखाव्यांवर भर दिला आहे. हे देखावे लावणे, त्यांची सजावट, ध्वनी यंत्रणा, कार्यकर्त्यांची वेशभूषा, विजेसाठी लागणारे जनरेटर या सगळ्या बाबींची तयारी करण्यात कार्यकर्त्यांनी रात्र जागविली.


महापालिका यंत्रणा सज्ज
गणपती विसर्जनाकरिता महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिकेचे सुमारे ५०० कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २००, आरोग्य विभागाचे २०० व इतर विभागांचे कर्मचारी, त्याचबरोबर ६० ट्रॅक्टर, १० डंपर, चार जेसीबी अशी यंत्रणा तैनात केली आहे.
मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबंूचे व आवश्यकतेनुसार लोखंडी अडथळे उभारण्यात आले आहेत. प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचगंगा नदीघाट येथे दान करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे.


गणेशमूर्ती विसर्जनासाठी इराणी खण सज्ज
कोल्हापूर : शहरातील मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व जवळील दुसऱ्या खणीत आज, गुरुवारी सुमारे
५०० हून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्ती विसर्जित होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे; तर मंडळांची संख्या लक्षात घेता महापालिकेसह सर्व यंत्रणा या खणीवर सज्ज झाल्या आहेत.


मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन विनाअडथळा होण्यासाठी महापालिकेतर्फे या खणीवर दोन्ही बाजूंना दोन धक्के तयार केले आहेत. खणीमध्ये पाणी खचाखच भरल्याने कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून महापालिकेच्या यंत्रणेने धक्क्यांच्या बाजूला लोखंडी जाळी मारली आहे; तर मंडळाच्या कार्यकर्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अग्निशमन दल व पोलिस कर्मचाऱ्यांना उभारण्यासाठी विशेष बूथ उभारण्यात आला आहे.


याशिवाय शालिनी पॅलेसकडील बाजूस मंडपही उभारण्यात आला आहे. निर्माल्य उचलण्याचीही सोय केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीवनमुक्ती संघटनेचे जवान मदत करणार आहेत.

Web Title: Bappa walks to your village ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.