Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:51 PM2024-03-11T12:51:03+5:302024-03-11T12:53:12+5:30

सचिन पायलट यांनी स्वत:च बांधून घेतला फेटा, मान्यवरांनी टाळ्या वाजून दिली दाद 

Ahilya Devi Holkar memorial will become a source of inspiration, Former Deputy Chief Minister of Rajasthan Sachin Pilot expressed the expectation | Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट 

Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट 

कोल्हापूर : पुरुषसत्ताक काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कर्तृत्व गाजवले. संघर्ष करून त्यांनी आपले एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. त्यांच्या स्मारकामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांनी रविवारी व्यक्त केली.

आपटेनगर नवी वाशी नाका येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. स्मारकाचे संकल्पक आमदार सतेज पाटील, डॉ. आण्णासाहेब डांगे, आमदार विश्वजित कदम, आमदार अमित देशमुख, ॲड. रामहरी रूपनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पायलट म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकाळी नारीशक्तीचा प्रत्यय समाजाला दाखवून दिला आहे. समाज एकत्र करून वाईट प्रवृत्तीविरोधात संघर्ष केला. महिला शक्तीची ताकद दाखवून दिली. अशा या कर्तृत्ववान महिलेचे स्मारक उभारण्याचा संकल्प सतेज पाटील यांनी पूर्ण केला. आगामी काळात धनगर समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.

शाहू छत्रपती म्हणाले, अनेक वर्षांपासून मराठा आणि धनगर समाज एकत्र आहे. माझ्या शेतातही मेेंढरे पाळली आहेत. यामुळे मी एका अर्थाने धनगरच आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मला संधी मिळाली, याचा मला निश्चित अभिमान आहे. आता स्मारक उभारण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्या सर्व परवानग्या मिळवून स्मारकाचे काम पूर्ण केले. या स्मारकाच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाला उजाळा मिळाला आहे.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे माझ्या मतदारसंघात अहिल्यादेवींचे स्मारक झाले. मतदारसंघाच्या विकासातही भर पडली. अशाच प्रकारे मतदारसंघात आतापर्यंत ७०० कोटींची विकासकामे केली आहेत.

आमदार कदम म्हणाले, विविध जाती, धर्मात तेढ निर्माण करणे, राजकीय स्वार्थासाठी जातीचा वापर करण्याच्या काळात मराठा आणि धनगर समाज एकत्र येऊन अतिशय चांगले असे स्मारक उभारले आहे.

यावेळी आमदार देशमुख, नगराध्यक्षा मनीषा डांगे, रूपनवर, आण्णासाहेब डांगे यांची भाषणे झाली. बयाजी शेळके यांनी स्वागत केले. बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आमदार जयश्री जाधव, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूूबाबा आवळे, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, विजय देवणे, व्ही. बी. पाटील, संजयबाबा घाटगे, निलोफर आजरेकर, शारंगधर देखमुख, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

स्वत:च फेटा बांधून घेतला..

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पिवळा फेटा बांधला जात होतो. पायलट यांनी मात्र स्वत:च फेटा बांधून घेतला. फेटा बांधण्याचे कौशल्य पाहून आमदार सतेज पाटील यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी टाळ्या वाजून दाद दिली.

आरक्षणात धनगर समाजालाही न्याय मिळेल..

मराठा समाज आरक्षणासाठी न्याय मागत आहे. याप्रमाणे धनगर समाजही आरक्षणाचा न्याय मागत आहे. त्याला मिळेल, असे शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले. मराठासह धनगर आरक्षणासाठी समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असे आश्वासन विश्वजित कदम यांनी दिले. आमदार देशमुख यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आणि मुस्लिम समाज सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Ahilya Devi Holkar memorial will become a source of inspiration, Former Deputy Chief Minister of Rajasthan Sachin Pilot expressed the expectation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.