महावितरणच्या लाईनमन दिनानिमित्त कल्याणच्या तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण

By अनिकेत घमंडी | Published: March 5, 2024 05:15 PM2024-03-05T17:15:00+5:302024-03-05T17:15:56+5:30

महावितरणचा जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे.

janamitra statue unveiled at tejashree building Kalyan on the occasion of mahavitran's lineman's day | महावितरणच्या लाईनमन दिनानिमित्त कल्याणच्या तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण

महावितरणच्या लाईनमन दिनानिमित्त कल्याणच्या तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण

अनिकेत घमंडी,डोंबिवली:महावितरणचा जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती तसेच इतरही अनेक प्रसंगात अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अखंडित सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येते. कल्याण परिमंडलात आयोजित मुख्य कार्यक्रमात त्यानिमित्ताने सोमवारी मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते कल्याण परिमंडल कार्यालयाच्या 'तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले. 

वीज वितरण व्यवस्थेतील महत्वपूर्ण घटक असलेल्या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याच्या सुचना दिल्या होत्या.  त्याअनुषंगाने कल्याण परिमंडलात सलग दुसऱ्या वर्षी कल्याण एक आणि दोन तर पालघर व वसई मंडल कार्यालयात सोमवारी आयोजित लाईनमन दिन जनमित्रांचा  सन्मान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कर्तव्य बजावतांना प्राणांची आहुती देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. तर जनमित्रांनी त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव कथन करुन आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने यांच्यासह अधिकारी, अभियंते, जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसई मंडल कार्यालयातही अधीक्षक अभियंता संजय खंडारे आणि पालघर मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जनमित्रांचा सन्मान करण्यात आला. विविध मंडल आणि विभागीय कार्यालयांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: janamitra statue unveiled at tejashree building Kalyan on the occasion of mahavitran's lineman's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.