कल्याणच्या सुभेदारीसाठी महायुतीत तीव्र मतभेदांचा पेच; महायुतीने मेळावा घेणे टाळले

By अनिकेत घमंडी | Published: March 22, 2024 09:33 AM2024-03-22T09:33:25+5:302024-03-22T09:33:53+5:30

गोळीबाराच्या घटनेनंतर मनोमीलन नाही

Embarrassment of sharp differences in the Grand Alliance for Welfare; Mahayuti refrained from holding the meeting | कल्याणच्या सुभेदारीसाठी महायुतीत तीव्र मतभेदांचा पेच; महायुतीने मेळावा घेणे टाळले

कल्याणच्या सुभेदारीसाठी महायुतीत तीव्र मतभेदांचा पेच; महायुतीने मेळावा घेणे टाळले

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने डोंबिवली, उल्हासनगर येथे महायुतीचे मेळावे घेतले. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळेकल्याण पूर्वेत युतीमधून विस्तव जात नसल्याने येथे मेळावा घेणे महायुतीने टाळले आहे. कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा विधानसभा मतदारसंघ अवघड जागेचे दुखणे ठरणार आहे.

कल्याण पूर्वेतील तीव्र मतभेदांचा पेच कसा सोडवायचा हा महायुती पुढील प्रश्न आहे. महेश व आ. गणपत गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुुरू होता. आ. गायकवाड व त्यांच्या मुलावर ॲट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्यात येत होते. त्यातूनच वाद होऊन त्यांनी महेश यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांची पत्नी सुलभा गायकवाड या भाजपच्या वतीने मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. गणपत गायकवाड तुरुंगात गेल्यामुळे शिवसेनेला तेथे मैदान मोकळे मिळू नये यासाठी भाजपने त्यांच्या पत्नीला राजकारणात सक्रिय केले.

महायुतीचे डोंबिवली व उल्हासनगरमध्ये मेळावे झाले. मात्र, कल्याण पूर्वेत गायकवाड यांना डावलून मेळावा घेणे शक्य नाही. गायकवाड हे दोन वेळा अपक्ष आणि मागील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतरही भाजपने अप्रत्यक्षपणे गायकवाड यांची पाठराखण केली. कल्याण पूर्वेतील मतभेद विधानसभा निवडणुकीच्या वेळी अधिक तीव्रतेने उफाळून येण्याची भीती आहे. निवडणुकीच्या तोंडावर गायकवाड यांना जामीन मिळाला तर येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मंत्री चव्हाण यांची मिठाची गुळणी

गोळीबार प्रकरणानंतर गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांसह व शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण हेही कल्याण पूर्वेबाबत मिठाची गुळणी धरून आहेत. कल्याण पूर्वेत महायुतीचा मेळावा का झाला नाही, याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही.

Web Title: Embarrassment of sharp differences in the Grand Alliance for Welfare; Mahayuti refrained from holding the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.