Youth commits suicide due to piracy | चोरीच्या पश्चातापाने तरुणाची आत्महत्या
चोरीच्या पश्चातापाने तरुणाची आत्महत्या

ठळक मुद्देहातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप

जळगाव : चोरीच्या घटनेत अटक होऊन दोन दिवसांपूर्वीच जामीन झाल्यानंतर आपल्या हातून घडलेल्या घटनेच्या नैराश्यातून एका तरुणाने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी असोदा रेल्वेगेटनजीक डाऊन मार्गावर घडली. दुपारी ४ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.
संघर्ष उर्फ राजेश संजय ठाकरे (२२, रा. वाल्मीक नगर, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.
दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रेल्वे डाऊन लाईनवर असोदा रेल्वे गेटजवळ एका युवकाने आत्महत्या केली असल्याची माहिती तालुका पोलिसांना रेल्वेचे उप स्टेशन प्रबंधक आर. के. पलरेजा यांनी तालुका पोलिसांना दिली. या प्रकारानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. यातील काही युवकांनी संघर्षला ओळखले.
लहान भावाने दिली वडिलांना माहिती
संघर्ष हा दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर गेला असल्याची माहिती त्याचा भाऊ अर्जुन याने वडिल संजय माधव ठाकरे यांना कळविली होती. यावरून त्याच्या वडिलांनी संघर्षच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र तो बंद आला. १२.४० वाजेच्या दरम्यान त्याने आत्महत्या केल्याची बातमी वडिलांना कळाली व त्यांनी घराकडे धाव घेतली.
सागरपार्कवरून घेतली धाव
संघर्षचे वडिल विवेकानंद प्रतिष्ठान शाळेच्या स्कूल बसचे चालक आहेत. सागर पार्कवर सुरू असलेल्या ‘पुलोत्सव’ कार्यक्रमस्थळी ते होते. मुलाने आत्महत्या केल्याचे कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. ते घरी आले त्यावेळी घराजवळ प्रचंड गर्दी होती. घटनेचे वृत्त कळताच तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा आटोपून मयत संघर्षचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला.
सुन्न होऊन बसले वडील
संघर्षच्या खिशात जळगाव ते भुसावळ असे रेल्वेचे तिकीट पोलिसांना आढळून आले. सकाळी १० वाजेच्या दरम्यान हे तिकीट काढले असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. त्याच्या घरी वडिल, दोन लहान भाऊ यात अर्जुन हा दहावीत शिकतो व त्याच्यापेक्षा लहान हितेश हा सहावीत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात संघर्षचे वडिल सुन्न होऊन बसले होते. ४ वाजेच्या दरम्यात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप
२३ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका चोरीच्या घटनेत चार दिवसांपूर्वी संघर्षला पोलिसांनी अटक केली होती. त्यात त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. ९ रोजी त्याचा जामीनही झाला होता. या घटनेत त्याच्याकडून १२ हजाराची रोकडही जप्त करण्यात आली होती, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी सांगितले. तर या मुलाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तो चांगल्या कुटुंबातील असल्याचे लक्षात आल्याने असे प्रकार भविष्यात त्याने करू नये म्हणून पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनीही त्याची समजूत घातली. घटनेबाबत त्यालाही पश्चाताप झाल्याचे त्याच्या बोलण्यातून लक्षात येत होते व त्यामुळे तो निराशही झाला होता असे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी सांगितले. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तपासणी केली असता मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी वा कुणालाही काहीही सांगितले नव्हत्त, असेही पोलिसांनी सांगिलते. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Web Title: Youth commits suicide due to piracy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.