जळगाव येथे पिस्तुलचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:39 PM2018-03-09T12:39:56+5:302018-03-09T12:39:56+5:30

तोंडात बोळा कोंबून सोडले एमआयडीसीत

The truck driver was robbed | जळगाव येथे पिस्तुलचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले

जळगाव येथे पिस्तुलचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले

Next
ठळक मुद्देपाच लाखाचा ऐवज लुटलापाठलाग करुन चौघांना पकडल

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - छतीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास अलिशान कारमधून आलेल्या चौघांनी पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून ४ लाख ८० हजाराचे बिम व १७ हजार रुपये रोख असा ४ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची थराराक घटना उघडकीस आली आहे. लुटल्यानंतर दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या तोंडात कापडी बोळा कोंबून त्याला एमआयडीसीत सोडून पलायन केले.
दरम्यान, घटना समजल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी शेख हसन शेख सलीम (वय ३० रा.भुसावळ), शेख फारुख शेख जमाल (वय ३६ रा.मुक्ताईनगर), शाबीर शहा अमान शहा (वय २८ रा.मलकापूर) व अरीफ शाह सुभान शाह (वय २९ रा.मलकापूर) या चार दरोडेखोरांना सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले. त्यांच्याशी झटापटही झाली. त्यात उपनिरीक्षक रोहन खंडागळे, कर्मचारी मनोज सुरवाडे व रामकृष्ण पाटील हे पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. शेत शिवारात सिनेस्टाईल थरार झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जलेरायकुमार भजनलाल पाल (वय २८ रा.हर्शीतविहार, हिरापूर टाटीबंध, रायपूर (मध्यप्रदेश) टाटीबंध येथील कलकत्ता-हैद्रराबाद रोडवेज या ट्रान्सपोर्टवर चालक म्हणून कामाला आहे. ४ मार्च रोजी रायगड जिंदल (छत्तीसगड) येथून ट्रकने (क्र.सी.जी.०४ एल.यु.५१३९) लोखंडी बीमचे ३९ नग घेऊन जामनगर (गुजरात) येथील एका कंपनीत जाण्यासाठी निघाला. ट्रकमध्ये क्लिनर नसल्याने मालक मनदीपसिंग बलदेवसिंग यांनी डिझेल व टोलसाठी १७ हजार रुपये दिले होते तर पाल याच्याजवळ स्वत:चे पाच हजार रुपये होते. ६ मार्च रोजी खामगावमार्गे गुजरात येथे जात असताना खामगाव ते नांदूरा या दरम्यान कारने (क्र.एम.एच.२२ डी.७०००) १० ते बारा वेळा पाठलाग केला. त्यानंतर नांदुरा सोडल्यावर रस्ता खराब असल्याने ट्रक चालकाने कारला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन दिला असता कार थेट ट्रकच्या पुढे लावली.
पिस्तुल लावून डोळ्यावर पट्टी बांधली
कारमधील आठ पैकी चार जणांनी खाली उतरुन ट्रकच्या कॅबीनमध्ये प्रवेश केला. आम्ही फायनान्सवाले आहोत असे हिंदी व पंजाबी भाषेत बोलत असताना एकाने पिस्तुल लावून ठार मारण्याची धमकी दिली तर दुसºयाने चाकू लावला. एकाने डोळ्याला पट्टी बांधली व चौथ्याने तोंडात कापडी बोळा कोंबला.
याही पुढे जावून त्यांनी हातपाय बांधून ट्रक पुढे नेला. ट्रकमध्ये रात्रभर मारहाण करुन १७ हजार रुपये रोख व ट्रकमधील लोखंडी बीमचे ९ नग घेऊन पसार झाले. आवाज बंद झाल्याने कोणी जवळ नसल्याची खात्री झाल्यानंतर चालकाने डोळ्याची पट्टी उघडली असता तो जळगावच्या एमआयडीसीत आल्याची खात्री चालकाला झाली.
मुक्ताईनगरच्या जंगलात पाठलाग
ट्रक चालकाने कार क्रमांक व दरोडेखोरांचे वर्णन पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपअधीक्षक सचिन सांगळे यांना घटनेची माहिती देऊन दरोडेखोरांच्या शोधासाठी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, रामकृष्ण पाटील, विजय शामराव पाटील, विजय दामोदर पाटील, मनोज सुरवाडे, असीम तडवी, अतुल पाटील व किशोर पाटील यांचे पथक तयार केले. या पथकाने संशयितांची लागलीच माहिती काढली असता ते मुक्ताईनगर परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात झाडाझडती घेतली असता गुन्ह्यातील कार आढळून आली. पोलीस असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी तेथून शेतात धूम ठोकली. यावेळी सिनेस्टाईल पाठलाग झाला. यात मनोज सुरवाडे यांच्या पायाला तर रामकृष्ण पाटील यांनाही किरकोळ दुखापत झाली. उपनिरीक्षक रोहन खंडागळे तर एका गुन्हेगाराच्या छातीवरच बसले. चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांना उपअधीक्षक सांगळे यांच्याकडे हजर करण्यात आले.
दोन दिवसांनी तक्रार
सहा तारखेच्या पहाटे चार वाजता एमआयडीसीत दरोडेखोरांनी सोडल्यानंतर ट्रक चालकाने ही घटना मालकाला कळविली. आपण आल्याशिवाय पोलीस स्टेशनला जाऊ नको असे मालकाने सांगितल्यामुळे चालकाने दोन दिवस तक्रारच दिली नाही. गुरुवारी मालक मनदीपसिंग बलदेवसिंग जळगावात आल्यानंतर चालकाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.े

Web Title: The truck driver was robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.