शेतकरी जीवनातील उत्सव तिफन नांदवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:57 PM2018-09-15T14:57:19+5:302018-09-15T14:58:21+5:30

‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे...

Tifan nightspotting in the life of the farmer's life | शेतकरी जीवनातील उत्सव तिफन नांदवण

शेतकरी जीवनातील उत्सव तिफन नांदवण

Next

तिफन भरणे हे जसे कौशल्याचे काम तसेच तिफनवर पेरणी करणे हेसुद्धा कौशल्याचेच काम. तिफन हाकताना दोन तासांमधील अंतर वाढणार नाही (म्हणजे फट पडणार नाही) किंवा दोन तासांमधील अंतर कमी होणार नाही. (म्हणजे दोन तास मिळणर नाही) याची काळजी घ्यावी लागते. फट पडल्यास वा दोन तास मिळाल्यास आंतर मशागत नीट करता येत नाही. म्हणून तिफन हाकण्याचं कौशल्य अवगत असणाऱ्या कमीच असतं. सर्वच शेतकरी, शेतमजुरांना तिफन हाकण्याचं कौशल्य अवगत नसे. त्यामुळे ज्यांना हे कौशल्य अवगत आहे त्यांचा पेरणीच्या काळात भाव वधारलेला असे. इतर मजुरांच्या तुलनेत त्यांना दीड दोनपट मजुरी मिळायची.
मी नांगरणी, वखरणी तर यांत्रिक पद्धतीने होतेच पण आताशा पेरणीसुद्धा यांत्रिक पद्धतीने व्हायला लागली आहे. पूर्वी पेरणी व्हायची ती तिफनवरच. कपाशी पेरायची तर मोघ्यावर आणि ज्वारी पेरायची तर चाड्यावर ‘तिफन’ म्हटलं तर एक शेती अवजार. पण तिफनविषयी किती पवित्र भावना, कृतज्ञ श्रद्धा असायची शेतकºयाच्या मनात. पेरणी करण्यासाठी तिफन शेतात न्यावयाची तर तिला आधी सुताराकडून नांदवून आणत असतं. तिफन नांदवणे हा पेरणीला सुरूवात करायाच्या वेळचा शेतकºयांच्या जीवनातील एक उत्सवी सोहळा. मुळात पेरणी हाच एक उत्सव होता. त्यात तिफन नांदवण्याच्या पवित्र, कृतज्ञ भावनेची भर. पेरणीला सुरुवात करावयाची तर जमिनीत पुरेसी ओल झाल्याशिवाय पेरणी करत नसत. धुळ पेरणी असा काही प्रकार नव्हताच रात्री पुरेसा पाऊस पडून गेलेला. पहाटेच्या वेळी ही आभाळ भरून आलेलं. सर्वदूर आभाळाची आश्वासक वत्सला सावली. वातावरणात सुखावणारा सुखद गारवा. चित्तवृत्ती उल्हासित, प्रसन्न करणारं आल्हाददायक पावसाळी वातावरणं. पेरणीला सुरुवात व्हायची ती बहुधा अशा वातावरणात.
अशा वातावरणातच शेतात पेरणीला सुरुवात करण्याआधी तिफन सुताराकडे नांदवायाला नेत असत. सोबत तिफनची पूजा करायला पुजेचं ताट. त्यात हळद, कुंकू, फुलं, दिवा, प्रसादासाठी गूळ असे. तिफनला नैवैद्य ही दाखवत असत दहीभाताचा. सुरुवातीला सुतार आपल्या गणिती नजरेनं न्याहाळून, दोरी लावून तिफन गुण्यात आहे की नाही याच अवलोकन करायचा. अभियांत्रिकी दृष्टीत ती. समजा तिफन गुण्यात नसेल तर तिला गुण्यात लावून द्यायचा.
ही एक कौशल्याची कारागिरी. गुण्यात तिफन भरणारे तज्ज्ञ सुतार तुलनेने कमीच असत. त्याबाबतीच आमच्या गावच्या शंभु सुताराचा ‘तिफन भरावी तर शंभु मिस्तरीनच’ असा लौकिक होता.
तिफन हाकणं हे जसं कौशल्याच काम तसच चाड्यावर पेरणी करण हे सुद्धा कौशल्याचेच काम. चाड्यावर बियाणं भरली मुड अशी चाळवयाची की, तिफनच्या तीन ही तासात सारखच बियाण पडलं पाहिजे. एखादं तास दाट तर एखाद विरळ असे होता कमा नये. त्यामुळे ही पेरणीची मूठ चाळवण हेदेखील कौशल्याच. चाड्यावर पेरणी करणाºया बायाही मोजक्याच असत. त्यांना ही तुलनेने जास्तच मजुरी मिळायची. त्यामुळेच पेरणीची मूठ हा विशिष्ट वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. पेरणीची मूठला बाणीची मूठ असा लक्षणार्थ प्राप्त झाला आहे. नाही तरी शेतकरी म्हणतातच ‘मढ झाकून ठेवा पण पेरणीची वेळ साधा’ यावरून कृषीजल जीवनात पेरणी या कृषी कार्याला किती महत्त्व होतं याची जाणीव होेते.
आता ट्रॅक्टरवर पेरणी करतात. पेरणीसाठी ट्रॅक्टर शेतात नेताना ट्रॅक्टरला तिफन सारख नांदवताना मी तरी अजून पाहिल नाही. पाऊस पाण्याचा भरवसा नाही.
म्हणून धूळ पेरणी असा एक पेरणीचा प्रकार आता अनुभवाला येतो.
ना खाली जमिनीत ओल, ना वरती आभाळाची वत्सल सावली. रणरणत्या उन्हात घाम पुसतच बियाण धुळीच्या हवाली करायचं. पेरणी हे आता उरलं आहे ते केवळ एक कृषीकर्म, त्यातल पावित्र्य, आत्मियता पार आटून गेलीयं. पेरणीच्या बाबतीत हळवी असणारी मनं आता पार बोथट झाली हेत. यांत्रिकतेमुळे कृषीकर्मातील भावोत्कटता पार हरवून गेलीच हेच खरे.
-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर, जि.जळगा

Web Title: Tifan nightspotting in the life of the farmer's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.