शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:36 PM2019-03-14T12:36:23+5:302019-03-14T12:37:23+5:30

घोषणांनी समाज कल्याण कार्यालय दणाणले

Students of Eligar for scholarship | शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

Next
ठळक मुद्दे तीन तास विद्यार्थ्यांचा ठिय्या


जळगाव : तांत्रिक अडचणीमुळे व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाही़ ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही कुणी दखल घेत नसल्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली़ तब्बल तीन तास आंदोलन सुरू होते़
शिष्यवृत्ती ही बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आहे. महागडे उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती एक आधार आहे. परंतू, दोन महिन्यांपासून विद्यापीठासह काही महाविद्यालयातील व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज करीत आहेत़ पण, अर्ज तांत्रिक अडचणीमुळे अर्ज अपलोड होत नसल्यामुळे याबाबत समाज कल्याण विभागाला व विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी कळविले़
या काळातच अर्ज सादर करण्याची मुदत निघून गेली़ मात्र, विद्यापीठ आणि समाज कल्याण विभाग एकमेकांवर बोट दाखवित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढकार घेण्यास तयार नव्हते़
अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता समाज कल्याण कार्यालयात गाठत सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली़ अधिकारी जागेवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली़
घोषणाबाजीने दणाणले दालन
या आंदोलनावेळी शिष्यवृत्ती आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, भारत माता की जय, सहाय्यक आयुक्त एक काम करा खुर्ची खाली करा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही अशा घोषणा देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी अभाविपचे प्रदेश सहमंत्री सिध्देश्वर लटपटे, शुभम अत्रे, ऋतुजा पाटील, कनिष्का विसपुते यांच्यासह विद्यापीठातील अभियांत्रिकीचे अमोल पाटील, वैभव निकुंभ, राकेश बेहरे, आदेश पाटील, गणेश क्षीरसागर, अश्विनी पाटील, धैर्यशील गायकवाड यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते़
समस्येचा विषय जाणार पुण्यापर्यंत...
सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील हे कार्यालयात दाखल झाले़ त्यांच्यासोबत विद्यापीठाचे कुलसचिव बी़बी़पाटील यांनी देखील समाज कल्याण कार्यालयात हजेरी लावली़ विद्यार्थ्यांनी पाटील यांना घेराव घालत संपूर्ण समस्या सांगितली़ तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढ देण्यात यावी आणि जे विषय पोर्टलवर अपलोड नाही ते विषय अपलोड करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली़ त्यावर योगेश पाटील यांनी १६ मार्चला पुणे संचालनालय येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल तसेच मुंबई येथे देखील व्हीजेएनटी व इतर संवर्गाबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले़ सोबतच शिष्यवृत्तीसाठी २७ मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले़ त्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले़
तीन तास चालले आंदोलन
अधिकारी दालनात नसल्यामुळे विद्यार्थींच्या संतापात भर पडल्यानंतर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे घेण्यात आला़ तब्बल तीन तास विद्यार्थ्याृंनी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या दालनात ठिय्या मांडला होता़ कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजुत घातली़ मात्र, विद्यार्थी हे आपल्या पवित्र्यावर ठाम होते़ त्यामुळे संपूर्ण दालन हे घोषणांनी दणाणून गेले होते़

Web Title: Students of Eligar for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.