चाळीसगावात प्लॅस्टीकमुक्त अभियानाला ‘कापडी पिशवी’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:05 PM2017-08-11T13:05:33+5:302017-08-11T13:07:00+5:30

रोटरीचा अभिनव उपक्रम : दिव्यांग भगिनींची प्रेरणादायी साथ

Strength of 'Kapadi Bag' in Plastik-Free Mission in Chalisgaon | चाळीसगावात प्लॅस्टीकमुक्त अभियानाला ‘कापडी पिशवी’चे बळ

चाळीसगावात प्लॅस्टीकमुक्त अभियानाला ‘कापडी पिशवी’चे बळ

Next
ठळक मुद्देमहिलांकडूुन चांगला प्रतिसाद सहभागाचे टाके स्फुर्तीची पिशवीपाच हजार पिशव्या देणार 

ऑनलाईन लोकमत  

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 11 - नगर पालिकेतर्फे संपूर्ण चाळीसगाव शहरात प्लॅस्टीकमुक्त अभियान राबविले जात असून रोटरी क्लबच्या माध्यमातून स्वयंदीप दिव्यांग भगिनींनीही या अभियानामागे त्यांनी तयार केलेल्या कापडी पिशवीचे बळ उभे केले आहे. रोटरीचे सदस्य दररोज प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन विशेषत:  महिला वर्गाकडून जुन्या साडय़ांचे संकलन करीत असून  स्वयंदीपच्या दिव्यांग भगिनी याच साड्यांच्या कापडी पिशव्या बनवित आहेत.रोटरी सदस्यांनी गेल्या तीन दिवसात 382 साडय़ा संकलित केल्या तर दिव्यांग भगिनींनी 50हून अधिक पिशव्या शिवून तयार केल्या.
महिलांकडूुन चांगला प्रतिसाद 
रोटरी क्लबचे अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे यांच्या कल्पक पुढाकारातून या अभियानाला सुरुवात झाली. त्यांच्यासह राजेंद्र कटारिया, बाळासाहेब सोनवणे, हरिश पल्लण, रोशन ताथेड, रोटरॅक्टचे कुलदीप चौधरी, सौरभ गुप्ता, राहुल वाकलकर, आदींनी 8 पासून जुन्या साडय़ा संकलन करण्यास सुरुवात केली. तीन दिवसात महिलांनी स्वयंस्फुतीर्ने 382 जुन्या साडय़ा कापडी पिशव्या तयार करण्यासाठी दिल्या. पवार वाडी परिसरात दोन दिवसात 301 तर विमानतळ परिसरातुन गुरुवारी 81 साडय़ा संकलीत करण्यात आल्या. अंकुर साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्ष साधना निकम, नगरसेवक चिराग शेख, भास्कर पाटील यांच्या उपस्थिती मंगळवारी उपक्रमाला सुरुवात झाली. 
 सहभागाचे टाके स्फुर्तीची पिशवी
स्वयंदीपच्या दिव्यांग भगिनींनी शिवणकाम उद्योग  उभारला आहे. प्लॅस्टीकमुक्त अभियानात आपलाही खारीचा वाटा असावा या प्रामाणिक प्रेरणेतून त्यांनी जुन्या साडय़ांपासून कापडी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दिव्यांग असलो तरी आम्ही देखील समाज घटक आहोत. त्यामुळे आमचेही उत्तरदायित्व आहेच. ते आम्ही पुर्ण करु. नागरिकांनीही प्ल?स्टीकचा वापर टाळून कापडी पिशवीचा अधिकाधिक वापर करावा. असे आवाहन स्वयंदीपच्या प्रमुख मिनाक्षी निकम यांनी लोकमतशी बोलतांना केले. 
पाच हजार पिशव्या देणार 
पर्यावरणाचे रक्षण, नागरिकांचे प्रबोधन आणि दिव्यांग भगिनींना अल्पशी मदत अशा तिहेरी सुञात रोटरीने हा उपक्रम गुंफला आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी प्लॅस्टीकमुक्त चाळीसगाव अभियानाची साद घातली. आम्ही त्याला उपक्रमाव्दारे प्रतिसाद देत आहोत. शहरातील 17 प्रभागात आम्ही घरोघरी जाऊन जुन्या साडय़ांचे संकलन करणार असून पाच हजाराहून अधिक कापडी पिशव्या नागरिकाना देण्याचा संकल्प केला असल्याची प्रतिक्रिया संग्रामसिंग शिंदे व प्रकल्प प्रमुख राजेंद्र कटारिया यांनी लोकमतशी बोलताना नोंदवली.

Web Title: Strength of 'Kapadi Bag' in Plastik-Free Mission in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.