तुलसीदास जयंती विशेष : रामबोला ते गोस्वामी तुलसीदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:26 PM2018-08-17T12:26:40+5:302018-08-17T12:27:22+5:30

Rambola to Goswami Tulsidas | तुलसीदास जयंती विशेष : रामबोला ते गोस्वामी तुलसीदास

तुलसीदास जयंती विशेष : रामबोला ते गोस्वामी तुलसीदास

Next

चुडामण बोरसे
जळगाव - ‘रामचरितमानस’ची आठवण आली तरी आपोआप गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते. बहुप्रतिभेचे धनी असलेल्या तुलसीदासांनी अनेक रचना केल्या आणि त्या अजरामर झाल्या. साक्षात प्रभू रामचंद्राने त्यांना दर्शन दिले आणि विशेष म्हणजे ही भेट प्रत्यक्ष हनुमानाने चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या किनारी घडवून आणली... स्वत: श्रीरामाने तुलसीदासांना तिलक लावला... त्यामुळे
चित्रकूट के घाटपर भई संतन की भीर
तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर... हा दोहा प्रचलित झाला तो या भेटीमुळेच...
प्रयागनजीक चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे तुलसीदासांचा जन्म श्रावण शुद्ध सप्तमीला झाला. बारा महिने आईच्या गर्भात राहिलेल्या या बालकाचा रडण्याचा आवाज न येता ‘राम’ हा शब्द निघाला... तोंडात चक्क ३२ दात आणि हालचाल पाच वर्षाच्या बालकासारखी होती. आईच्या अकाली मृत्यूनंतर दासी चुनिया हिने या बालकाचा सांभाळ केला.
काही काळानंतर नरहरीनंद स्वामी नावाचे गृहस्थ शोध घेत तुुलसीदासांपर्यंत पोहचले. त्यांनी त्यांचे ‘रामबोला’ असे नामकरण करीत अयोध्येला नेले. न शिकविता हा बालक गायत्री मंत्राचा उच्चार करीत होता. त्यामुळे तेही चकीत झाले. पुढे ‘रामबोला’ काशी येथे गेले आणि वेदाचा अभ्यास करु लागले. तिथून ते जन्मभूमी राजापूरला आणि काशीला गेले. तिथे रामकथा सुरुच होती. तिथे त्यांनी साधूवेश धारण केला. या रामभक्ताला प्रत्यक्ष हनुमानाचे दर्शन झाले. पुढे हनुमानानेच चित्रकूटमध्ये तुम्हाला रामाचे दर्शन होईल, असे सांगितले. चित्रकूटला आल्यावर मौनी अमावस्येला तुलसीबाबांना रामाचे दर्शन झाले.
यानंतर ते काशीला आले. तिथे प्रल्हाद घाटावर राहत असताना कवित्वशक्तीची जाणीव झाली आणि ते संस्कृतमध्ये पद्यरचना करु लागले. असे म्हणतात की भगवान शंकराच्या आज्ञेवरुन ते अयोध्येला गेले आणि हिंदी भाषेत रचना सुरु केली.
रामनवमीच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहायला सुरुवात झाली. तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि २६ दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच रामचरितमानस लिहून पूर्ण झाले आणि जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भूत ग्रंथ मिळाला.
‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाल्यावर रात्री तो विश्वनाथ मंदिरात ठेवण्यात आला. सकाळी त्यावर सत्यं, शिवमं, सुंदरम् अशी अक्षरे लिहलेली आढळून आली.. त्यामुळे या ग्रंथावर जणू मान्यतेची मोहोरच उमटली आणि त्यातल्या भाषा सौंदर्यांने हा ग्रंथ उजळून निघाला आणि त्यातले अनेक दोहे हे सहजपणे ओठावर येत असतात...

Web Title: Rambola to Goswami Tulsidas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.