पोलिसाच्या मुलासह तिघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:35 AM2019-03-01T11:35:11+5:302019-03-01T11:36:35+5:30

जळगावच्या मेहरुण तलावावरील घटना

The police looted and robbed the child | पोलिसाच्या मुलासह तिघांना लुटले

पोलिसाच्या मुलासह तिघांना लुटले

Next
ठळक मुद्देदाखवला चाकूचा धाक


 
जळगाव : मेहरुण तलावावर बिर्याणी पार्टी करायला आलेल्या पोलिसाच्या मुलासह तिघांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून तीन मोबाईल व १४ हजार रुपये लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता मेहरुण तलावाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल दिलीप लोटवाला (१९, रा. जयकिसनवाडी, जळगाव), आदित्य नारायण सूर्यवंशी व प्रसाद भाऊसाहेब पाटील असे तिन्ही मित्र बुधवारी रात्री मेहरुण तलावावर आले होते. प्रसाद याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रसाद भाऊसाहेब पाटील या पोलिसाच्या मुलाचा २३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त पल, आदीत्य व प्रसाद या तिघांनी २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजता मेहरुण तलावावर बिर्याणी पार्टीचे नियोजन केले होते. त्यानुसार तिघं जण दोन दुचाकीने मेहरुण तलावावर गेले होते. पल याच्या दुचाकीवर(क्र.एम.एच.१९ सी.एल.२५७८)प्रसाद होता. तर आदीत्य स्वतंत्र दुचाकीवर होता. बिर्याणी पार्टी झाल्यानंतर प्रसाद याच्या नातेवाईकाकडे बिर्याणीचा दुसरा डबा द्यायचा असल्याने साडे नऊ वाजता तिघं जण तेथून निघाले. त्यावेळी मागून दुचाकीवरुन दोन तरुण समोर आले.
इतक्या रात्री तुम्ही काय करता म्हणून तिघांना धमकावले व एकाने चाकू काढून तुमच्याजवळ जे काही असेल ते द्या नाही तर तुम्हाला मारु म्हणत धमकी देत दुचाकीची चावी काढून घेतली. तेव्हा पल याच्या खिशातून एक मोबाईल व चार हजार रुपये, प्रसाद याच्या खिशातून मोबाईल व १० हजार रुपये रोख तर आदित्यच्या खिशातून एक मोबाईल हिसकावून तिघांनी पळ काढला व जाताना रस्त्यावर दुचाकीच्या चाव्या फेकून दिल्या.
बिर्याणी पडली महागात
प्रसाद, पल व आदीत्य हे तिन्ही विद्यार्थी असून उच्चभु्र घराण्यातील आहेत. या तिघांना बिर्याणी पार्टी महागात पडली आहे. या घटनेमुळे ते प्रचंड घाबरले. त्यांनी लागलीच ही माहिती कुटुंबाला दिली. त्यानुसार रात्री १ वाजता संशयितांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याआधी देखील रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एका उद्योजकाची महागडी कार भर दिवसा लांबविण्यात आली होती तसेच रिक्षातून आलेल्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटमारीची घटना घडली होती. सातत्याने घटना घडत असताना काही जण भीतीपोटी तक्रार देत नाहीत. घडलेल्या गुन्ह्यांचाही तपास अद्याप लागलेला नाही.

Web Title: The police looted and robbed the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.