नाथाभाऊ, नववर्षात काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:08 PM2018-12-30T12:08:40+5:302018-12-31T12:35:08+5:30

खान्देशचे राजकारण दोन ‘भाऊं’वर केंद्रित आहे. पहिले नाथाभाऊ अर्थात एकनाथराव खडसे आणि दुसरे गिरीशभाऊ अर्थात गिरीश महाजन. नाथाभाऊंच्या वलयातून बाहेर पडल्यावर आणि मुख्यमंत्र्यांची छत्रछाया लाभल्यावर गिरीशभाऊ विक्रमांची बरसात करीत आहे.

Nathabhau, what will you do in a new year? | नाथाभाऊ, नववर्षात काय करणार?

नाथाभाऊ, नववर्षात काय करणार?

Next

मिलिंद कुलकर्णी
जळगावा : खान्देशातील भाजपासाठी खडसे आणि महाजन या दोन्ही नेत्यांचे मोठे योगदान आहे. खडसे यांनी संघर्ष आणि संघटनकार्यातून भाजपाची उभारणी केली. आक्रमक शैलीमुळे कार्यकर्त्यांचे मोहोळ जमले तशी प्रशासनावर हुकूमत प्रस्थापित केली. महाजन हे ‘टपरीवरचे आमदार’ म्हणून ओळखले जात. सर्वसामान्य माणूस असो की कार्यकर्ता त्याच्या मदतीला धावून जाण्याने गिरीशभाऊ लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि मंत्री ठरले. आरोग्य क्षेत्रातील त्यांचे कार्य तर राज्यभर वाखाणले गेले. त्यांच्या या कार्यातून ‘संकटमोचक’अशी प्रतिमानिर्मिती आणि पुढे यशाची मालिका तयार झाली.
२०१९ चे खान्देशातील राजकीय चित्र कसे असेल, याविषयी मोठी उत्कंठा राजकीय वर्तुळात दिसून येते. महाराष्टÑात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा लागोपाठ विजय मिळवित असताना, देशातील तीन राज्यातील निकाल भाजपाविरोधात गेल्याने आणि तेथे काँग्रेस विजयी झाल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका चुरशीच्या होतील, असे निश्चित म्हणावे लागेल.
वर्षभरापूर्वी भाजपा एकतर्फी निवडणुका जिंकेल, असे जे वातावरण होते, ते राहिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा प्रभावहीन होऊ लागला आहे, हे दिवसेंदिवस जाणवू लागले आहे. राहुल गांधी यांच्यासह विरोधक आक्रमक आणि परिणामकारक टीकाटिप्पणी करु लागले आहेत. त्याला जनसमर्थन मिळू लागल्याने विरोधक जोशात तर भाजपा बचावात्मक भूमिकेत दिसून येत आहे.
खान्देशचा विचार केला तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादी भाजपाच्या तुलनेत प्रभावशाली आहे, मात्र जळगावात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे निर्विवाद वर्चस्व एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे राहणार आहे, हे विसरुन चालणार नाही.
महाजन यांनी जळगाव, धुळे महापालिकेत एकहाती यश मिळविले आणि आता नगरमध्ये बहुमत नसतानाही महापौरपद मिळविले असल्याने उत्तर महाराष्टÑाचे नेते म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. नाशिकचे पालकमंत्री असल्याने महाजन यांचे उत्तर महाराष्टÑात निश्चित वजन वाढले आहे.
दुसरीकडे दोन-अडीच वर्षांपासून मंत्रिपद हुलकावणी देत असलेल्या खडसे यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि सरकारविषयी त्यांनी जाहीर नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. भाजपासाठी ४० वर्षांपासून केलेला संघर्ष, त्याग याची उजळणी करीत सत्तेत आल्यावर विसर पडणे कृतघ्नपणा असल्याची जाणीव ते अधूनमधून करुन देत असतात. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या संघर्ष रथयात्रेनिमित्त आलेल्या नेत्यांचे कोथळीतील निवासस्थानी केलेले स्वागत, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर भाजपाविषयी उघड नाराजीचे बोल, काँग्रेस नेते दीपक पाटील यांच्या शहादा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमात सहभागी होऊन सारंगखेडा व प्रकाशा बंधाऱ्याचे पाणी शेतकºयाच्या बांधापर्यंत जात नसल्याची व्यक्त केलेली खंत...अशा कृतींमधून ते सरकारचे वाभाडे काढीत असतात. त्याचसोबत अंजली दमानीया यांनी केलेले दावे आणि आरोपांमधून त्यांना दिलासा मिळत नसल्याने आणि सरकारपातळीवर मदतीपेक्षा याचगोष्टीचे होत असलेले भांडवल पाहून खडसे उद्विग्न आहेत.
‘मीडिया ट्रायल’चा बळी ठरल्याची खंत ते जाहीरपणे व्यक्त करीत असले तरी याच प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा ‘फोकस’ केले हे कसे विसरता येईल. जळगावचे सेक्सस्कँडल असो की, मुंबईतील बॉम्बस्फोट, खून झालेल्या साधूचे शव रात्री पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी आणण्याचे आंदोलन असो की, मुंबईतील बिल्डरांविषयी केलेला आरोप असो याच प्रसारमाध्यमांनी त्यांना ठळक प्रसिध्दी दिली होती.
एवढा सगळा खटाटोप सुरु असूनही भाजपाचे वरिष्ठ नेते खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी किंवा त्यांच्यावरील कथित अन्यायाविषयी ठोसपणे वक्तव्य करीत नाही. मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असो की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील असो, सगळ्यांचा सूर एकच असतो, खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप होताच त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. योग्यवेळी ते मंत्रिमंडळात परत येतील.
पण ही योग्य वेळ कधी येईल, हे सांगायला कोणीही तयार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर मी भरत आहे, रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून मी जिल्ह्याचा कारभार पाहत आहे, असे केलेले वक्तव्य अजून कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहे, पण बहुदा चंद्रकांतदादा ते विसरले असावेत.
आता लोकसभा निवडणुकीत खडसे यांची भूमिका काय राहील? जळगाव, धुळ्यातील निवडणुकांप्रमाणेच महाजन यांच्याकडे नेतृत्व राहील काय? असे असेल तर खडसे यांच्या स्रुषा खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचे काय? या प्रश्नांचा भाजपाला लवकर निकाल लावावा लागणार आहे.
भाजपाच्या निर्णयाची नाथाभाऊ वाट पाहतील काय? कट्टर समर्थक मो.आमीर हुसेन हे काँग्रेसमध्ये गेल्याने तर्कवितर्क सुरु झाले आहेत. वरणगावच्या कार्यक्रमाने त्यात भर पडली आहे. शिवसेनेचा पर्यायदेखील त्यांच्यासमोर असल्याची चर्चा आहे. ‘गुरुबंधू’ धुळेकर अनिल गोटे यांचे महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी वाढलेली सख्य पाहता त्यामागे जळगावचे समीकरण असू शकते, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. अर्थात भाजपाश्रेष्ठींचे या घडामोडींकडे बारीक लक्ष असणारच आहे.
एकनाथराव खडसे हे १९९० मध्ये तर गिरीश महाजन हे १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खडसे यांचे नेतेपद बहरत गेले. २००९ ते १०१४ या काळातील विरोधी पक्षनेतेपदामुळे ते राज्यस्तरीय नेत्यांच्या पहिल्या रांगेतील नेते झाले. गिरीश महाजन हे नाथाभाऊंचे खंदे समर्थक म्हणूनच ओळखले जात. देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावल, गिरीश महाजन हे भाजपामधील यंग ब्रिगेडचे अग्रणी. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या सहकाºयांचे वजन वाढलेच.
तेच ते लाभार्थी
समुद्रात बोट बुडायला लागली की आधी उंदीर उड्या मारतात असे म्हटले जाते. गुळाभोवती मुंगळे जमा होतात आणि गुळ संपल्यावर लगेच पांगतात. ही दोन्ही उदाहरणे राजकारणात चपखलपणे दिसून येतात. खडसे हे मंत्री नाहीत, म्हटल्यावर त्यांच्या निकटवर्तीयांमधील लाभार्थी लगेच दूर झाले आणि दुसºया भाऊंभोवती पिंगा घालू लागले. नेता बदलला, लाभार्थी तेच असे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Nathabhau, what will you do in a new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.