खर्चात कपात करीत जळगावात चौक सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:24 PM2018-09-17T15:24:21+5:302018-09-17T15:26:06+5:30

फुलेनगरातील (पोलनपेठ) केशव क्रीडा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये मंडळाच्या वतीने लोकसहभाग व गणेशोत्सवातील खर्चात बचत करीत पोलनपेठ चौकाचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Jalgaon Chowk beautification by cutting the cost | खर्चात कपात करीत जळगावात चौक सुशोभिकरण

खर्चात कपात करीत जळगावात चौक सुशोभिकरण

Next
ठळक मुद्देकेशव क्रीडा मंडळाने निर्माण केला आदर्शखर्चात कपात करण्यासाठी लहान मूर्तीलोकसहभागातून कायापालट

जळगाव : गणेशोत्सव साजरा करीत असताना केवळ मंडळापुरताच विचार न करता परिसराचाही विकास झाला पाहिजे व इतरांनाही त्यातून मदत झाली पाहिजे, या उद्देशाने फुलेनगरातील (पोलनपेठ) केशव क्रीडा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये मंडळाच्या वतीने लोकसहभाग व गणेशोत्सवातील खर्चात बचत करीत पोलनपेठ चौकाचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर रुग्णवाहिका उपलब्ध करून देत शहरवासीयांच्या सेवेचाही वसा मंडळाने घेतला आहे.
गणेशोत्सव साजरा करीत असताना विविध सामाजिक उपक्रम विविध मंडळांकडून राबविले जातात. याच्या पुढे एक पाऊल टाकत फुलेनगरातील (पोलनपेठ) केशव क्रीडा मंडळाने रक्तदान, वृक्षारोपण व इतर उपक्रमांवरच मर्यादित न राहता फुलेनगर चौकाच्या सुशोभिकरणाचाच विडा उचलला आहे. त्याच्या कामालाही सुुरुवात झाली असून महिनाभरात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
मंडळाने हाती घेतलेल्या उपक्रमासाठी निधीची गरज असल्याने त्यासाठी मंडळ गणेशोत्सवातील खर्चात कपात करीत आहे. यामध्ये मंडळाची पूर्वी १७ फूट उंच गणरायाची मूर्ती असायची. आता त्यात कपात करीत सहा फुटी मूर्तीची स्थापना केली असून सोबतच रोशणाईतही कपात केली आहे. पूर्वी दाट प्रकाश योजना असायची, आता साध्या पद्धतीने मात्र आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कपात करीत पै-पैची बचत करीत सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा मंडळाने आदर्श उभा केला आहे.
मंडळ खर्चात कपात तर करीतच आहे, सोबतच या भागातील रहिवाशांनीही यात पुढाकार घेतला असून लोकसहभागातून सुशोभिकरण व इतर कामांना आकार दिला जात आहे. रहिवाशांनी पुढाकार घेतल्यास काय होऊ शकते, याचे उदाहरण या भागातील रहिवाशांनी उभे केले आहे.

Web Title: Jalgaon Chowk beautification by cutting the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.