सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण व्यवसाय व ‘रिअल इस्टेट’ला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:48 PM2018-12-10T12:48:32+5:302018-12-10T12:48:57+5:30

बँकांचे घटते व्याज दर व शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Gold business and 'good day' for real estate in Jalgaon | सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण व्यवसाय व ‘रिअल इस्टेट’ला ‘अच्छे दिन’

सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण व्यवसाय व ‘रिअल इस्टेट’ला ‘अच्छे दिन’

Next

जळगाव : बँकांचे घटते व्याजदर व शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुवर्ण व्यवसाय व घर, प्लॉट खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत असल्याने या व्यवसायास चांगले दिवस आले असल्याचे सुखद चित्र आहे. यामुळे नोटाबंदीनंतर आलेली मरगळ दूर होऊन हे व्यवसायात पुन्हा पूर्वीचे दिवस येत आहे.
दोन वर्षांपासून नागरिकांची पाठ
दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि त्यानंतर रिअल इस्टेट व्यवसायात मोठी मंदी आली. अनेकांचे पैसे बँकांमध्ये अडकल्याने सुरुवातीच्या काळात तर हे दोन्ही व्यवसाय संकटात सापडले होते. त्यामुळे घर व मोकळ््या जागांमध्ये गुंतवणूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांची घरे तयार असल्यानंतरही विक्री होत नव्हती. परिणामी या व्यावसायिकांसमोर बँकांचे कर्ज फेड कशी करावी, असाही प्रश्न निर्माण झाला होता.
बँकांमध्ये व्याज मिळेना, शेअर बाजारात अस्थिरता
बँकांमध्ये ठेवी ठेवण्यावर अनेकांचा कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून बँकांकडून मिळणारे व्याजदर कमी होत आहे. त्यामुळे मोठी रक्कम बँकांमध्ये ठेवूनही अपेक्षित परतावा मिळत नाही. या सोबतच गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातही अस्थिरता असल्याने अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे.
घरांची मागणी वाढू लागली
शहरी भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या व वाढते कुटुंब यामुळे अनेकांनी घर खरेदीकडे पुन्हा आपला कल वळविला असल्याचे चित्र दिवाळीनंतर निर्माण झाले आहे. नोटाबंदीनंतर आलेला गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या काळातही मंदीचे वातावरण होते. मात्र यंदाच्या दिवाळीपासून घरांन मागणी वाढू लागली. त्यात दिवाळीनंतर तर अनेक जण घरांची खरेदी करू लागले आहे. परिणामी गेल्या महिन्याभरापासून घर खरेदीसाठी अनेक जण वेगवेगळ््या ठिकाणी चौकशी करून घर खरेदी करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. विशेष म्हणजे १५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतच्या सर्वच घरांची यात विक्री होत असल्याचेही चित्र आहे. बँकांच्या घटलेल्या व्याजदरांचाही फायदा घेत गृहकर्ज घेऊन घर खरेदी वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी
घरांची गरज वाढू लागल्याने घरांची मागणी वाढत असताना त्या सोबतच बँक व शेअर बाजाराची स्थिती पाहता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत. भावात थोडी फार चढ-उतार होत असली तरी सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानत केव्हाही परतावा मिळण्याच्या अपेक्षेने नागरिक पुन्हा सोन्याची खरेदी करीत आहेत.
लग्नसराईमुळे मागणीत भर
सध्या लग्नसराईमुळेदेखील सोन्याला मागणी वाढली आहे. सोन्यास वाढत्या मागणीमुळे भावातही वाढ होत आहे. असे असले तरी ग्राहक सोने खरेदीस पसंती देत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर अनेकांकडे हाती पैसा नसल्याने घर खरेदी मंदावली होती. ही थांबलेली घर खरेदी पुन्हा सुरू झाली असून नागरिकांना गरज असल्याने घरांची मागणी करीत आहे. मोठी उलाढाल सध्या नसली तरी एक चांगली सुरुवात झाली आहे.
- अनिश शाह, सदस्य, राज्यस्तरीय समन्वय समिती, क्रेडाई.

दोन वर्षांपूर्वी सुवर्ण व्यवसायात आलेली मंदी दूर झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण पुन्हा सोने खरेदी करू लागले आहेत.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ असोसिएशन.

Web Title: Gold business and 'good day' for real estate in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.