एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:37 PM2019-01-10T12:37:21+5:302019-01-10T12:37:35+5:30

जानेवारीअखेर संपणार अंजनीतील साठा

 Erandol City's water problem will be complicated | एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

Next
ठळक मुद्दे तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्तावच नाहीच


जळगाव : यंदा अंजनी मध्यम प्रकल्पात जिवंत पाणीसाठा झालेलाच नसल्याने व मृतसाठा हा फेब्रुवारी २०१९ अखेर संपत असल्याने एरंडोल शहराचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे. गिरणावरील दहिगाव व लमांजन बंधाऱ्यापासून एरंडोल नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप मजिप्राकडून याबाबतचा प्रस्तावच सादर झालेला नाही.
निधीसाठी गेलाय प्रस्ताव
मार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपयांचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मात्र हा निधी मिळाल्यानंतर या उपाययोजनेचे काम सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी या एरंडोल शहरासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यासंदर्भात सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश कार्यकारी अभियंता, महाराष्टÑ जीवन प्राधीकरण, जळगाव व मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना दिले आहेत. जेणेकरून वित्तीय मर्यादेनुसार प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन जानेवारी २०१९ अ‍ेखर योजना कार्यान्वित होऊ शकेल. मात्र जानेवारीचे दोन आठवडे संपले तरीही योजनेचा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच सादर झालेला नाही.
चोपड्यासाठी पाणी सोडण्यात अडचण
मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांनी चोपडा शहरासाठी गूळ धरणात राखीव पाणीसाठ्यातून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ यांना अभिप्राय मागितला असता धरणगाव नगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी सोडण्यात येणार नाही. चोपडा नगरपरिषदेसाठी पाणी सोडू तेव्हाच धरणगावसाठीही पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, असे कळविले.
तर धरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी मात्र सध्या धरणगाव शहरासाठी तापी नदी धावडा डोहातून पाणी पुरवठा होत असून सध्या हा डोह भरलेला आहे. त्यामुळे सध्या पाणी आवर्तनाची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे चोपडा नगरपालिकेला गूळ धरणातून आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण झाली आहे.
तर टँकरने पाणी पुरवण्याची वेळ
मजिप्राकडून प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडून निधी मंजूर झाला की, त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन नंतर योजनेचे काम केले जाईल. ते पूर्ण होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत किमान दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. अंजनी धरणातील मृतसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीअखेरच संपणार असला तरीही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. मात्र योजनेच्या कामास काही कारणाने विलंब झाल्यास अथवा बाष्पीभवनामुळे पाणी लवकर संपल्यास पूर्ण एरंडोल शहराला टँकरने पाणीपुरवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

 

Web Title:  Erandol City's water problem will be complicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.