‘मतभेद मिटले...दुरावा कायम...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:19 AM2019-03-16T11:19:21+5:302019-03-16T11:19:29+5:30

भाजपा-सेना युतीची व्यथा: अद्यापही दावे, प्रतिदावे सुरूच

'Dispute dissolve ... Durava prevails ...' | ‘मतभेद मिटले...दुरावा कायम...’

‘मतभेद मिटले...दुरावा कायम...’

Next

जळगाव/धुळे/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला जाण्यापूर्वीच कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसची आघाडी व भाजपा-शिवसेनेच्या युतीत लढत होणार हे निश्चित झाले. मतभेद मिटवून हे राजकीय पक्ष एकत्र आले मात्र अद्याप युतीत तीव्र तर आघाडीत मित्रपक्षांमध्येच किरकोळ धुसफुस होण्याचे प्रकार अद्याप चालूच असल्याचे दिसून येत आहे. खान्देशातील जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघात हे चित्र कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. युती व आघाडीपैकी आघाडीने उमेदवार जाहीर केला.
गुलाबराव देवकर यांना राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. मात्र युतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपाकडून तीन जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेला मिळावी असे मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. एवढेच नव्हे तर युतीचा निर्णय जाहीर होण्याअगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव लोकसभा मतदार संघातून युतीच्या प्रचाराचा नारळ वाढविणार होते. तसा त्यांचा दौराही निश्चित झाला होता. माजी आमदार आर.ओ. पाटील यांना या मतदार संघातून उमेदवारी मिळावी असे प्रयत्न होते.
पाचोरा, चाळीसगाव, धरणगावातून विरोध
लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा ही भाजपाकडे जाणार हे निश्चित झाल्यावर धुसफुस सुरू झाली आहे.
चाळीसगाव येथे भाजपाचा प्रचार आम्ही कसा करावा असा सवाल शिवसेना पदाधिकारी करत आहेत. भाजपावाले आमचा केवळ निवडणुकीसाठी वापर करतात अशी नाराजी चाळीसगाव येथे व्यक्त करण्यात आली. पाचोरा येथे तर आम्ही भाजपाचा प्रचार करणार नाही, असे शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले आहे. हीच री धरणगाव येथे देखील ओढली गेली. अन्य तालुक्यांमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचाच सुर उमटत आहे. त्यामुळे युती झाली तरी अद्याप बेबनाव हा कायम असल्याचेच लक्षात येत आहे.
लवकर हा दुरावा कमी न झाल्यास त्याचा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे.
...पण नेत्यांची मने जुळणे आवश्यक!
धुळे : लोकसभा निवडणुकीत भाजप - सेना युती झाली असली तरी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सेना - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर विरोधात जोरदार आरोप - प्रत्यारोप केले होते. त्यामुळे युती झाली असली तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने जुळणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत एकाही कार्यक्रमात दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आलेले दिसले नाही.
भाजपतर्फे धुळे लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची उमेदवारी निश्चित असून केवळ अधिकृत घोषणा होणे तेवढे बाकी असल्याचे भाजपचे पदाधिकारी म्हणतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने डॉ.सुभाष भामरे यांना शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश देऊन मैदानात उतरविले होते. त्याआधी डॉ.भामरे हे शिवसेनेतच होते. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात डॉ.भामरे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. परंतु महापालिका निवडणुकीच्या वेळी मात्र दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांविरोधात आरोप - प्रत्यारोप केले होते. तसेची शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराथी हे महापालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशिनसंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आमदार अनिल गोटे यांच्या सोबत आहेत. ते आमदारांनी यासंदर्भात बोलविलेल्या बैठकीस देखील उपस्थित होते. त्यामुळे ते मनपात भाजपविरोधात उभे आहेत.याशिवाय अन्य पदाधिकारी व माजी नगरसेवकसुद्धा भाजपशी जुळवून घेण्याच्या मनस्थिती दिसत नाही. परंतु आता शिवसेनेशी युती झाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार भाजपसोबत लोकसभा निवडणुकीत सेनेचे पदाधिकारी व नेते हे प्रचारात एका व्यासपीठावर दिसतील देखील, पण हे सर्व मनाने एकत्र येतील, याबाबत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते साशंक दिसतात. एकूणच सेना - भाजप पदाधिकाऱ्यांचे मने जुळली पाहिजे, तेव्हाच ते उमेदवारासाठी फायद्याचे राहणार आहे. अन्यथा धोका असल्याचे दिसते.
नंदुरबारला मतभेद दूर करण्यात भाजपाची सरशी
नंदुरबार : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे पक्षांतर्गत मतभेद व मित्रपक्ष शिवसेनेशी असलेले मतभेद दूर करण्यात भाजपाची सरशी झाली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यात भाजपा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतभेद होते. विशेषत: जुने कार्यकर्ते व नवे कार्यकर्ते असा सरळ गट पक्षात होते. मात्र निवडणूकपूर्व टप्प्यात जिल्हाध्यक्षा व विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर केले. आता निवडणूक जाहीर होताच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही जवळ करण्यात त्यांना यश आले आहे. गुरुवारी यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे व आमश्या पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आला आहे. अर्थात आज जरी जाहीरपणे दोन्ही पक्षातील नेते युतीचा एकत्र प्रचार करण्याची भाषा करीत असले तरी मतदान होईपर्यंत ही मैत्री टिकून राहील का? याबाबत मात्र कार्यकर्त्यांमध्ये साशंकता आहे.
युती धर्म पाळण्याबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार निश्चित नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून जागेसाठी तिढा सोडविला जात नसल्याने उमेदवारीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आघाडी आणि युती धर्म पाळण्याबाबत दोन्ही बाजूने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका आहे. रावेर लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिकिट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच खडसे परिवारातील सदस्य असल्यास शिवसेनेकडून प्रचार करण्यात येणार नसल्याचा ठराव यापूर्वीच शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला आहे. शिवसेनेकडून असहकाराचे धोरण अवलंबिले जात असताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुक्ताईनगरातील मेळाव्यात शिवसेनेने रावेर लोकसभा मतदार संघात दगफटका केल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद उमटतील असे सांगत इशारा दिला आहे. त्यामुळे एकुणच या मतदार संघात युतीमध्ये ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना...’ अशी स्थिती आहे.

Web Title: 'Dispute dissolve ... Durava prevails ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.