चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:28 PM2018-04-14T13:28:38+5:302018-04-14T13:28:38+5:30

अनेकवेळा दिल्या भेटी

Chalisgaon and Dr. Debt Relations of Dr. Babasaheb Ambedkar | चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध

चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध

googlenewsNext

संजय सोनार / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ -चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध अतुट असे होते. त्यामुळे ते अनेकवेळा चाळीसगावी येऊन गेले. चाळीसगावात टांगा अपघातात बाबासाहेब गंभीर जखमी झाल्यामुळे अनेक दिवस त्यांचे वास्तव्य चाळीसगावात होते. त्यांनी या आठवणी पुस्तकात लिहिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व सहभागाने १९२७ मध्ये चाळीसगावातील दोस्त थिएटरजवळ दिनबंधू आंबेडकर आश्रम या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेची वसतीगृहात अनेक अस्पृश्य विद्यार्थी राहत होते. १९२७ ते १९३८ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या.
२३ आॅक्टोबर १९२९ रोजी डॉ.बाबासाहेब चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर ते वसतीगृहात जाण्यासाठी टांग्यातून जात असताना पुलावर टांगा उलटला. त्यात बाबासाहेबांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे बरेच दिवस या संस्थेच्या वसतीगृहात वास्तव्य होते. या काळात त्यांचा सहवास अनेकांना लाभला. डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद दत्तू यांनी लिहीलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुभव व आठवणी या पुस्तकात चाळीसगाव येथील सत्कार व टांग्यातून पडून झालेल्या अपघाताबद्दल लिहीले आहे.
डॉ.बाबासाहेब यांची प्रेरणा घेऊन दिवाण चव्हाण, अ‍ॅड. डी. आर. झाल्टे, डी.डी. चव्हाण, भगवान बागुल गुरुजी, यशवंत जाधव, पुंडलिक वाघ, सखाराम मोरे यांनी दिनबंधू आंबेडकर आश्रमाची स्थापना केली होती.
दोन वेळा सभा : १७ जून १९३८ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आश्रमशाळेसमोर मोठी सभा झाली होती. त्यानंतर १९५१ मध्ये चाळीसगावच्या राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब यांचा सत्कार करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांना २००१ रुपये थैलीही अर्पण करण्यात आली होती. बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चाळीसगावातील सभा, सत्कार व अनुभव तसेच दिनबंधू आंबेडकर आश्रमाबाबत लिखाण केले होते.आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या अस्थिकलशातील काही अस्थींचे विसर्जन करुन पुतळ्याची पायाभरणी झाली आहे हे विशेष होय. अशा प्रकारे डॉ. आंबेडकर व चाळीसगाव यांचे अतुट असे नाते आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली व पदस्पर्शाने पावन झालेली दिनबंधू आंबेडकर आश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे. या पवित्र स्थळाची स्मारक न करता शिक्षणाचे कार्य सर्वांसाठी खुली करण्यासाठी या स्थळाचा वापर करावा, या मागणीसाठी या संस्थेचे अध्यक्ष प्रा. साहेबराव घोडे, सचिव धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी शासनदरबारी केली आहे.

Web Title: Chalisgaon and Dr. Debt Relations of Dr. Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.