Bhima Koregaon Violence: Stop the route at Jamnar and Parola while blocking ST at Chalisgaon, Amalner | भीमा कोरेगाव हिंसाचार : जामनेर व पारोळा येथे रास्ता रोको तर चाळीसगाव, अमळनेर येथे एस.टी.वर दगडफेक
भीमा कोरेगाव हिंसाचार : जामनेर व पारोळा येथे रास्ता रोको तर चाळीसगाव, अमळनेर येथे एस.टी.वर दगडफेक

ठळक मुद्देपारोळा व जामनेर येथे रास्तारोकोअमळनेर येथे दगडफेकीत सहा बसेसचे नुकसानरावेर येथे घटनेच्या निषेधार्थ दुपारपर्यंत बंद

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२ : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद मंगळवारी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी उमटले. जामनेर व पारोळा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर अमळनेरला सहा तर चाळीसगावात चार एस.टी.बसेवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.यावल व भडगाव येथे दलित संघटनांनी घटनेचा निषेध करीत तहसीलदारांना निवेदन दिले. तर रावेर येथे दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. चाळीसगाव येथे बसेसच्या काही फेºया रद्द करण्यात आल्या.

पारोळा येथे रास्तारोको
भीमा कोरेगाव येथे जाणाºया दलित बांधवांच्या गाडीवर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पारोळा येथील दलित समाज बांधवांनी रास्ता रोको केला. पोलीस स्टेशनसमोर १५ ते २० मिनिटे पर्यंत रास्ता रोको करण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दगडफेक करणाºया समाजकंटकांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गौतम वानखेडे, प्रवीण निकम, वसंत केदार, हर्षल सूर्यवंशी, विशाल नरवाडे, तेज नरवाडे, पुंजू बिºहाडे, बापू मरसाळे, शांताराम अवचिते, दीपक वानखेडे, किशोर वानखेडे, विजय बागुल, अ‍ॅड.स्वाती शिंदे, भूषण वानखेडे, सुधाकर नेतकर, अशोक कापडणे, सागर नरवडे, भिकन अहिरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन
जामनेर येथील नगरपालिका चौक, भुसावळ चौफुलीवर दलित समाजबांधवांनी एस.टी.अडवित रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी वाकी रस्त्यावरील खाजगी व्यापारी संकुलातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. पालिका चौकात व भुसावळ चौफुलीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. समाजकंटकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार नामदेव टिळेकर यांना देण्यात आले.

भिमा कोरगाव घटनेचा यावल येथे निषेध
भिमा कोरगाव येथील घटनेचा येथील दलित संघटनांनी निषेध केला. मंगळवारी निवासी नायब तहसीलदार विशाल पवार, पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी यांना निवेदन सादर केले. दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजी शहर बंदचा इशारा दिला. निवेदनावर रिपाइं तालुकाध्यक्ष अरूण गजरे, सीताराम पारधे, प्रमोद पारधे, विष्णू पारधे, अनिल जंजाळे, दीपक पारधे, अशोक बोरेकर, आकाश पारधे, हितेश गजरे, नगरसेवक मनोहर सोनवणे यांच्या सह्या आहेत.

रावेर येथे दुपारपर्यंत बंद
भिमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद पाहता निळे निशाण संघटनेतर्फे या घटनेचा व बहूजन समाजात फूट पाडणाºया समाजविघातक शक्तींना पाठीशी घालणाºया सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदन तहसीलदार विजयकुमार ढगे यांना देण्यात आले. यावेळी रिपाइं (आठवले गट ) चे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता अचानक शहर बंदची हाक देण्यात आली. स्टेशन रोड, एम.जे.मार्केट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शहरातील मेन रोड, सावदा रोडवरील दुकाने, पी ई तात्या मार्केट, सराफ बाजार, महात्मा गांधी चौक, कृषी केंद्र मार्केट, बºहाणपूर रोडवरील दुकाने, न.पा.शॉपींग कॉम्प्लेक्स, छोरीया मार्केटमधील दुकानदारांकडे शहर बंदचे आवाहन करण्यात आले. सर्व दुकानदारांनी दुपारी दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.

पाचोरा येथे तहसील कार्यालयासमोर निदर्शने
पाचोरा तहसील कार्यालयासमोर दलित समाजबांधवांनी दुपारी १२ वाजता निदर्शने व घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसीलदार बी.ए.कापसे व पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच बुधवारी पाचोरा बंदची हाक देण्यात आली.


Web Title: Bhima Koregaon Violence: Stop the route at Jamnar and Parola while blocking ST at Chalisgaon, Amalner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.