शाब्बास! मंळणी यंत्रात एक हात गमावला, हार न मानता डाव्या हाताने पेंटिंग करत जीवनात भरले रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 05:47 PM2024-04-29T17:47:15+5:302024-04-29T21:01:58+5:30

दहावीमध्ये शिक्षण घेत असताना आई-वडिलांसोबत मळणी यंत्राच्या साह्याने रानोरानी फिरून शेतकऱ्यांचे धान्य काढून देत असताना झाला होता अपघात

Well done brother! Losing an arm to the churning machine; man not giving up, doing left-handed painting work and filled life with colors | शाब्बास! मंळणी यंत्रात एक हात गमावला, हार न मानता डाव्या हाताने पेंटिंग करत जीवनात भरले रंग

शाब्बास! मंळणी यंत्रात एक हात गमावला, हार न मानता डाव्या हाताने पेंटिंग करत जीवनात भरले रंग

- बाळकृष्ण रासने
हसनाबाद :
इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना वयाच्या १७ व्या वर्षी उमद्या तरुणाचा उजवा हात मळणी यंत्रात अडकून तुटून पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं अन् उजवी चित्रे तो डाव्या हाताने हुबेहूब साकारू लागला. या मूर्तिमंत जिद्दीचं नाव आहे नारायण नामदेव जाधव.

भोकरदन तालुक्यातील सावखेडा येथे वास्तव्यास असून, घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना आई-वडिलांसोबत मळणी यंत्राच्या साह्याने रानोरानी फिरून शेतकऱ्यांचे धान्य काढून देत असत. परंतु, काळ कोपल्याने एके दिवशी मळणी यंत्रात मक्याची कणसे टाकत असताना नारायण यांचा हात अडकला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने मळणी यंत्र बंद केले. मात्र, तोपर्यंत उजवा हात निकामी झाला होता. तरीदेखील त्यांनी हार न मानता छत्रपती संभाजीनगर येथील आर्ट महाविद्यालयातून १९९१ मध्ये एटीडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भोकरदन तालुक्यातील विटा आणि सावखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रत्येकी तीन वर्षे कलाशिक्षक म्हणून काम केले.

जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून भोकरदन येथील तहसीलदारांनी नेमणूक केली. त्यावेळी त्यांना तीनशे रुपये पगार होता. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांची एटीडी परीक्षा घेऊन कायमस्वरूपी नोकरीचे स्वप्न दाखवले होते. परंतु, एकही जागा भरली नाही. त्यानंतर सात वर्षे सरकारी नोकरची प्रतीक्षा केली. मात्र, यश मिळाले नाही. शेवटी एका हाताने जीवनचक्र चालविण्यास सुरुवात केली अन् हार न मानता आई-वडील, दोन मुले, पत्नी यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी स्वत:जवळील कलेचा उपयोग करून सुंदर कलाकृती साकारणे सुरू केले.

नारायण जाधव सांगतात की, अपंगत्वाचा कधीही कमीपणा न मानता एका हाताने पेंटिंग करीत आहे. फुलंब्री, भोकरदन, हसनाबाद, तळेगाव, टाकळी, राजूर परिसरातील शाळा, शासकीय कार्यालये, खासगी कामे, भिंती रंगवण्याचे काम करीत आहेत. त्यापासून महिन्याला आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळते. मी अपंग असताना शिक्षण घेतले होते. मात्र, शासनाने परीक्षा पास असतानाही नोकरी दिली नाही. त्याचा थोडाही मनात राग न धरता मोठ्या जोमाने पेंटिगचा व्यवसाय करून कुटुंब चालवत आहे. पाच एकर शेती असूनही, पत्नी इतरांच्या शेतात मजुरी काम करून उदरनिर्वाह चालवते. अनेकदा एका हाताने शिडी चढून मालकांनी सांगितल्याप्रमाणे हुबेहूब पेंटिंग काढण्याचा प्रयत्न करतो. डिजिटल फ्लेक्स बोर्ड आल्यापासून ७० टक्के पेंटिंग व्यवसायावर परिणाम झाला आहे. तरीदेखील खचून न जाता पेंटिंगबरोबर इतर कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सात वर्षांपासून सरकारी नोकरीची प्रतीक्षा
एका हाताने अपंगत्व असतानाही उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर सात वर्षे शासकीय नोकरीची प्रतीक्षा केली. परंतु, शासनाने आश्वासन देऊनही नोकरी दिली नाही. शेवटी हार न मानता आता गावोगावी जाऊन पेटिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे.
- नारायण जाधव, पेंटर, सावखेडा

Web Title: Well done brother! Losing an arm to the churning machine; man not giving up, doing left-handed painting work and filled life with colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.