Small and medium enterprises overtaken Jalna in Jalna | जालन्यात लघु, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला
जालन्यात लघु, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला

ठळक मुद्देगुरांचा पाणी प्रश्न गंभीर : अनेक गावांची तहान भागवणे झाले अवघड, टँकर भरण्यासाठी विहिरींचाच आधार

जालना : जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. फ्रेबु्रवारीच्या मध्यातच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने गुरांसह माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जालना जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात आज घडीला १.२६ तर ५७ लघु प्रकल्पात सध्या केवळ १.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे असून, ३ प्रकल्पांमध्ये पाणीपातळी ही जोत्याच्या पातळीखाली आहे. लघु प्रकल्पांचा विचार केल्यास त्यातील ३७ तलाव हे कोरडे पडले आहेत. १४ तलावांची पाणी पातळी ही जोत्याखाली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून खूपच कमी पाणी शिल्लक असल्याने शेतकरी आणि विशेष करून पशुपालक भयभीत झाले आहेत.
जालना जिल्ह्यात यंदा केवळ ६१ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. त्याचा मोठा परिणाम पिकांसह पाण्याच्या साठवणूकीवर झाला आहे. विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने अनेक शेतकरी उभे-आडवे बोअर त्यात घेऊन जास्तीत जास्त भूगर्भातील पाणीसाठा कसा वापरता येईल याकडे वळले आहेत. अनेक गावांमध्ये हातपंप घेण्यासाठी गाड्या जात आहेत. मात्र ३०० ते ४०० फूट खोलवर जाऊनही पक्के पाणी लागत नसल्याचे दिसून आले. एकूणच जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची अवस्था पुढील काही महिन्यांत आणखी गंभीर होणार आहे.

बाष्पीभवनाचाही परिणाम
जालना जिल्ह्यात पाऊस कमी पडला हे वास्तव आहे. परंतु मध्यंतरी कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने देखील तलावातील पाणीपातळी घटल्याचे सांगण्यात आले. त्यातच मध्यंतरी अनेक शेतकºयांनी आहे, त्या पाण्यातून विद्युत मोटीरींच्या मदतीने पाणीचोरी केल्याचे प्रकारही सर्रासपणे घडले. आता तर हे सर्व प्रकल्प कोरडे पडल्याने गुरांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनला आहे.


Web Title: Small and medium enterprises overtaken Jalna in Jalna
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.