ग्राहकां अभावी जालना मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:21 PM2018-12-24T12:21:57+5:302018-12-24T12:22:26+5:30

बाजारगप्पा : दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते.

The result of the sale of Jalna Mondha affects due to the absence of the customers | ग्राहकां अभावी जालना मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम

ग्राहकां अभावी जालना मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम

Next

- संजय देशमुख (जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि नवीन तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. असे असले तरी बाजारातील चैतन्य लोप पावले आहे. कुक्कुटपालन व्यवसाय आणि स्टार्च उद्योगासाठी लागणारा मका जवळपास ३ हजार पोती बाजारात येत आहे. साखरेला मागणी असली तरी साखरेचे भाव स्थिर आहेत.

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र, दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते. अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन, तूर तसेच मका मोंढ्यातील रस्त्यांवर वाळत घातली असून, चाळणीद्वारे त्यातील काडी- कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे. साखरेचा कोटा संबंधित कारखान्यांना विक्रीसाठी शासनाने ठरवून दिला होता. तो कोटा विक्री झाला आहे. कोटा विक्री होत असल्याने साखरेला मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी आजही साखर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ३ हजार २०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. आता केंद्र सरकार नवीन कोटा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने त्याकडे साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे डोळे लागून आहेत. 

दरम्यान, कुठल्याच मालाला तेजी नसल्याने पूर्वीप्रमाणे व्यापारी हे जेवढा माल लागतो तेवढाच खरेदी करीत आहेत. साठवणूक करून तो दडवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या फंदात आता धान्याचे दलालदेखील पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले. जालना बाजारपेठेत मोसंबीची आवकही नगण्य झाली आहे.  गेल्या आठवड्यात जिल्ह्यात धुके पडल्याने द्राक्ष बागांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मका, सोयाबीन, तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. तुरीचे भाव हे ४५००  ते ४७०० रुपये क्विंटल आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे मालाची खरेदी करण्यासाठी नाफेडने सहा खरेदी केंद्रे सुरू केली होती. मात्र त्या केंद्रांवरील खरेदी आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने रविवारपासून ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदी केंद्रावर २० डिसेंबरपर्यंत केवळ १ हजार ५५५ क्विंटल उडीद, मूग आणि सोयाबीनची आवक झाली होती. कमी पावसाचा फटका मूग, उडीद आणि सोयाबीनलाही बसल्याने ही आवक कमी झाली आहे. दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर ही सहा खरेदी केंदे्र सुरू केली होती. त्यात उडदासाठी ३८३, मूग १ हजार १०७, सोयाबीन ७४८, अशी एकूण २ हजार २१९ क्विंटलची नोंदणी करण्यात आली होती. खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर १३८ शेतकऱ्यांनी उडीद ४४८, मूग ८८६ क्विंटल अशी एकूण ६०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

नवीन गुळाची आवक जालना बाजारपेठेत बऱ्यापैकी असून, तीन ते साडेतीन हजार गुळाच्या भेली येत आहेत. आता फेडरेशनकडून तूर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.

Web Title: The result of the sale of Jalna Mondha affects due to the absence of the customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.