यंत्राद्वारे कामांना प्राधान्य; रोजगाराची हमी दिसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:47 AM2019-01-16T00:47:30+5:302019-01-16T00:48:01+5:30

तालुक्यात भीषण दुष्काळ असुन, अनेक गावातील शेतकरी, शेतमजूर व अन्य मजुरांच्या हातांना काम नाही.

Priority to work by machine; Looks for job guarantee | यंत्राद्वारे कामांना प्राधान्य; रोजगाराची हमी दिसेना

यंत्राद्वारे कामांना प्राधान्य; रोजगाराची हमी दिसेना

Next

दिलीप सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यात भीषण दुष्काळ असुन, अनेक गावातील शेतकरी, शेतमजूर व अन्य मजुरांच्या हातांना काम नाही. तालुक्यात मग्रारोहयो ऐवजी यंत्राद्वारे काम करण्यावर प्रशासनाचा भर दिसत आहे. तालुक्यात कोट्यवधी रूपयांची बांधबंदिस्तीची कामे यंत्राने करण्यात येणार आहेत.
यावर्षी पाऊस नसल्यामुळे शेतीचा खरीप व रबी हंगाम वाया गेला आहे. तालुक्यातील पैसेवारी ४० पैशाच्या आत असून तालुक्यातील सर्वच गावे दुष्काळग्रस्त असल्याचे शासनाकडून जाहीर झाले आहे़ दोन्ही हंगामातील पिके हातून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून कवडीचेही उत्पन्न झाले नाही. उलट घरात असलेले व कर्ज काढून घेतलेले पैसे शेतीच्या पेरणी, मशागतीला लावल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ शेतात जनावरांना चारा व पाणी नसल्यामुळे शेतकरी आपले पशुधनही कवडीमोल भावात विकत आहेत़ शेतात काम नसल्यामुळे हजारो शेतमजुरांच्या हाताला काम नाही. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाणी नसल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक बांधकामे ठप्प झालेली आहेत. या कामांवर आपली उपजीविका भागविणारे मजूर व कारागीर यांचाही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आपल्या येथील मजूर व कामांची मागणी याकडे दुष्काळात प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे़
दुष्काळात मजुरांना रोजगाराची हमी दिसत नसताना या तालुक्यात मात्र लाखो रूपयांचे कामे यंत्राद्वारे करण्याचा प्रशासनाचा घाट आहे़ तालुक्यातील सायगाव, गेवराई बाजार, भाकरवाडी, कस्तुरवाडी, डोंगरगाव, दाभाडी, नांदखेडा, तळणी, लोधेवाडी, राजेवाडी, (पान दोनवर)
बदनापूर तालुक्यातील ११ गावात ३६ कोटी ५४ लाख ५८०१ रुपयांच्या बांधबंधिस्तीच्या २३ कामांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निघालेली आहे. ही सर्व कामे यंत्राद्वारे करण्यात येणार आहेत. तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान सन १८-१९ मधे निवडलेल्या गावातून मृद व जलसंधारणाची कामे यंत्रांद्वारे उपविभागीय कृषि अधिकारी जालना यांच्या कार्यालयाकडून होणार आहे. यामधे या तालुक्यातील सायगाव येथे ६७ लाख ५९ हजार २१५ रुपयांची चार कंपार्टमेंट बंडीगची कामे, भाकरवाडी येथे ३५ लाख ७७ हजार १८१ रुपयांची दोन कंपार्टमेंट बंडींगची कामे, नांदखेडा येथे २५ लाख ७८ हजार ९५० रुपयांची दोन कामे, तळणी येथे ३४ लाख ८ हजार ९२ रुपयांची दोन कामे, खडकवाडी / उज्जैनपुरी येथे १४ लाख ९६ हजार ३७४ रुपयांचे एक काम, लोधेवाडी येथे १५ लाख ३५ हजार ८४८ रुपयांचे एक काम, राजेवाडी येथे १० लाख ४२ हजार १४ रुपयांचे एक काम, कस्तुरवाडी येथे ३५ लाख ९८ हजार ६३५ रुपयांची दोन कामे, दुधनवाडी येथे १३ लाख १९३ रुपयांचे एक काम, डोंगरगाव दाभाडी येथे ५३ लााख ४५ हजार ८३४ रुपयांची तीन कामे, गेवराई बाजार येथे ७२ लाख तिन हजार ६५८ रुपयांची चार कामे असे एकूण ११ गावात ३६ कोटी ५४ लाख ५८०१ रुपयांच्या बांधबंदिस्तीच्या २३ कामांचा समावेश आहे़ही सर्व कामे या गावांमधील शिवारातील विविध गटांमधील शेतांमधे होणार आहेत. यापैकी अनेक गावांमधे मजुरांना रोजगार नसल्यामुळे अनेक मजुरांनी कामांची मागणी केलेली असुन ही कामे जर मग्रारोहयोतून केली तर हजारो मजुरांना रोजगार मिळू शकतो़
केवळ दोनच सामूहिक मग्रारोहयोची कामे
तालुक्यात केवळ दोनच सामूहिक रोजगाराची मग्रारोहयोची कामे सुरू असून यामधे केवळ एक चर खोदण्याचे काम व एक क्रीडांगणाचे काम सुरू आहे. उर्वरित कामे वैयक्तिक लाभाची सुरू आहेत़ तालुक्यातील खामगाव, ढोकसाळ, चिखली, बुटेगाव, कंडारी बु., वंजारवाडी, आन्वी राळा, पठार देऊळगाव, काजळा, धामणगाव, तुपेवाडी, मानदेऊळगाव आदी १२ ग्रा.पं.मध्ये पं.स. कार्यालयामार्फ त २५ मग्रारोहयोची कामे सुरू आहेत. यावर ३१९ मजुरांची उपस्थिती आहे.तसेच येथील कृषि विभाग, वनविभाग, रेशीम विभाग, तहसील अंतर्गत दहा गावांमधे एकूण ८० मग्रारोहयोची कामे सुरू आहे. त्यामधे एकूण ५८० मजूर काम करीत आहेत़ यामधील सर्व कामे वैयक्तिक लाभाची असून, एकही काम सामूहिक रोजगार उपलब्धतेचे नाही़

Web Title: Priority to work by machine; Looks for job guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.