पासपोर्ट सेवेमुळे टपाल कार्यालयास संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:55 AM2018-03-27T00:55:32+5:302018-03-27T00:55:32+5:30

संवाद क्रांतीमुळे टपाल सेवा सुरू राहील की नाही, अशी स्थिती असताना टपाल कार्यालयात पासपोर्टसारखी महत्त्वाची सेवा सुरू झाल्याने या कार्यालयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. लवकरच टपाल कार्यालयात बँकींग सेवाही सुरू होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केले.

The post office gets new life due to the passport service | पासपोर्ट सेवेमुळे टपाल कार्यालयास संजीवनी

पासपोर्ट सेवेमुळे टपाल कार्यालयास संजीवनी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संवाद क्रांतीमुळे टपाल सेवा सुरू राहील की नाही, अशी स्थिती असताना टपाल कार्यालयात पासपोर्टसारखी महत्त्वाची सेवा सुरू झाल्याने या कार्यालयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. लवकरच टपाल कार्यालयात बँकींग सेवाही सुरू होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सोमवारी केले.
येथील मुख्य टपाल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उघाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, पुणे पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी अनंत ताकवाले, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, औरंगाबाद विभागाचे मुख्य पोस्टमास्टर प्रणवकुमार, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. विलास खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. दानवे म्हणाले, की सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सरकार विविध सोयी-सुविधा निर्माण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत आहे. जालना येथील पासपोर्ट केंद्राप्रमाणे राज्यात इतर जिल्ह्यातही टप्प्याटप्प्याने पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात येणार आहे. देशातील बंद असलेली विमानतळे सुरू करण्यावर केंद्र शासन भर देत आहे. याचा फायदा देशांतर्गत विमान वाहतुकीस होणार असल्याने देशातील उद्योजकांचे ९०० विमाने खरेदी करण्याचे नियोजन आहे. या पासपोर्ट सेवा केंद्राचा सर्वसामान्यांसह व्यापारी, उद्योजक व हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना फायदा होईल, असे खा. दानवे यांनी सांगितले.
नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी पासपोर्ट सेवा सुरू केल्याबद्दल खा. दानवे यांचे आभार मानत, या कार्यालयास आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, की जालन्यात रसायन तंत्रज्ञान संस्था, समृद्धी महामार्ग, ड्रायपोर्ट आदींमुळे दळणवळण अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे येथील पासपोर्ट कार्यालयाचा प्रत्येकाला फायदा होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या परिसरात उद्योजकांनी सीएसआर फंडातून सुशोभीकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य पोस्टमास्टर प्रवणकुमार यांनी टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेल्या या पासपोर्ट कार्यालयात आवश्यक सुविधा देण्याची ग्वाही दिली. औरंगाबादमध्ये सुरू केलेले पासपोर्ट कार्यालय सध्या देशातील सर्वाधिक अर्ज प्राप्त होणारे कार्यालय ठरले असून, येथे दिवसाकाठी २०० अर्ज प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले. जालना येथील या सेवा केंद्रास असाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टपाल कार्यालयात सर्वसामान्य व दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी खा. दानवे यांच्या हस्ते फित कापून पासपोर्ट केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विविध पक्ष, संघटना, व्यापारी व मुस्लीम बांधवांच्यावतीने खा. दानवे यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत नटके यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास माजी आ.अरविंद चव्हाण, भाजपा उपाध्यक्ष भास्कर दानवे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, रितेश मिश्रा, घनश्याम गोयल, किशोर अग्रवाल, अर्जुुन गेही, विलास नाईक, देविदास देशमुख, राजेश जोशी यांच्यासह शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नगराध्यक्षा : आता पासपोर्टचे नूतनीकरण करून घेईन...!
जालन्यात सुरू झालेल्या टपाल कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी प्रयत्न केले जातील. परिसरात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी दिली. पासपोर्ट सेवा केंद्राचा प्रत्येकालाच फायदा होणार आहे. ‘माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण अनेक दिवसांपासून करायचे आहे. मात्र, कधी मला वेळ नसतो तर कधी गोरंट्याल साहेबांना वेळ नसतो. मात्र, आता जालन्यातच पासपोर्ट केंद्र झाल्याने आपण स्वत: येथे येऊन नूतनीकरण करून घेऊ’, असेही नगराध्यक्षा म्हणल्या. खा. दानवे यांनीही हाच धागा पकडत ग्रीन व रेड पासपोर्टबद्दल परदेशात आलेला अनुभव कथन केला.

Web Title: The post office gets new life due to the passport service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.