खाजगी बस उलटून एक ठार, १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:52 AM2019-02-01T00:52:41+5:302019-02-01T00:53:02+5:30

नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली.

One killed, 15 injured in private bus accident | खाजगी बस उलटून एक ठार, १५ जखमी

खाजगी बस उलटून एक ठार, १५ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली. विशेष म्हणजे, या बसने तीन झाडांना धडक देत दोन पलट्या खाल्याने ही बस रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड््यात पडली. हा अपघात गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात एक महिला ठार तर, अन्य १५ प्रवासी जखमी झाले आहेत. सुरेखा जयंत खडतकर ( ४६, रा. हडपसर, पुणे ) असे मयत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून पुण्याकडे २४ प्रवाशांना घेऊन एक ट्रॅव्हल्स (क्रं. एमएच.१४.जीयु. ४३९८) ही बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता निघाली होती. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जालना शहरालगतच्या बायपास रोडने जात होती. यावेळी वन विभागाच्या कार्यालय जवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस तीन झाडांना धडकली. दोन पलट्या खात बस रस्त्याच्या बाजूला पडली. दरम्यान, बसला टेलिफोनचे केबल अडकल्याने बस थांबली असल्याची माहिती प्रवासी नंदकिशोर ठाकूर यांनी दिली.
यात प्रवासी सुरेखा जयंत खडतकर यांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश शहाद मुंजाल, मलकियतसिंग मनिंदरसिंग, बाबूराव अंतराम एखंडे, मंजुळा बाबूराव एखंडे, अमित गोपालराव शहा, सतीश ओमप्रकाश बजाज, रूची संतोष बजाज, नंदिनी चंद्रकांत तळवतकर, मुस्तफा शब्बीर बोहरा, नंदकिशोर दादारावजी ठाकरे, अशिका नंदकिशोर ठाकरे, सुरभि शरद बोस, श्रेया संजय चोपकर, स्नेहल अनिल सियाले, गजानन भागवत शिंदे हे प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गाडी चालक महिंद्र दौलतराव सावरकर (३३, रा. अमरावती ) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बस ही ६० ते ६५ च्या स्पीडने होती. परंतु, वळण रस्ता अचानक आल्याने मी बसचे ब्रेक लावले.
परंतु, बसचे ब्रेक न लागल्यामुळे माझे नियंत्रण सुटल्याचे बसचालक महिंद्र सावरकर यांनी सांगितले.
‘त्या’ तिघांनीच जखमींना काढले बाहेर : दिशादर्शक फलकच नाही
बसमधील नंदकिशोर ठाकूर (रा. नागपूर) मुस्ताफा बोहरा (वर्धा) आणि मुलकेत सिंग (जुम्म) या तिघांनी बसच्या खडकीची काच फोडून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर प्रवाशांना रुग्णवाहिकेने शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात नेण्या येऊन उपचार करण्यात आले.
सिंदखेडराजा चौफुली ते देऊळगावराजा चौफुली दरम्यान वन विभागाच्या कार्यालयाजवळ मोठे वळण आहे. येथून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. परंतु, या वळणावर दिशादर्शक फलकच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनधारकांना वळण आलेलेच समजत नाही.
या रस्त्यावरुन दररोज वेगाने वाहने धावतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे व वळण असल्याने वाहन चालकांना समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होतात. आठ दिवसांपूर्वीच जनावरे घेऊन जाणारे एक ट्रक या ठिकाणी उलटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूणच हा रस्ता अपघताचे स्थळ झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वळण रस्त्यावर कुठेच गतीरोधक नसल्याने देखील अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: One killed, 15 injured in private bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.