बहिणीला त्रास देतो म्हणून मेव्हण्याचा केला खून; पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:00 PM2018-04-10T19:00:33+5:302018-04-10T19:00:33+5:30

बहिणीला त्रास देणाऱ्या मेव्हण्याचा साथीदारांच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना जालना पोलिसांनी अटक केली.

brother kills sister's husband due to continuous harassment | बहिणीला त्रास देतो म्हणून मेव्हण्याचा केला खून; पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

बहिणीला त्रास देतो म्हणून मेव्हण्याचा केला खून; पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Next
ठळक मुद्देअरुण खडके याचे चार वर्षांपूर्वी संजयनगर भागात राहणाऱ्या श्याम बाबुराव जोशी (१९) याची बहिणी वंदना हिच्यासोबत लग्न झाले होते. खडके हा वंदनाला वारंवार त्रास देवून पैशाची मागणी करत असे. त्यामुळे ती दोन वर्षांपासून माहेरी राहत होती.

जालना : बहिणीला त्रास देणाऱ्या मेव्हण्याचा साथीदारांच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना जालना पोलिसांनी अटक केली. सोमवारी मध्यरात्री काजळा शिवारात ही घटना घडली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव अरुण दिगंबर खडके (४०, रा. गांधीचमन, जालना) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण खडके याचे चार वर्षांपूर्वी संजयनगर भागात राहणाऱ्या श्याम बाबुराव जोशी (१९) याची बहिणी वंदना हिच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, खडके हा वंदनाला वारंवार त्रास देवून पैशाची मागणी करत असे. त्यामुळे ती दोन वर्षांपासून माहेरी राहत होती. माहेरी आल्यानंतरही खडकेचा बहिणीला त्रास देणे सुरूच असल्याने श्याम याच्या मनात त्याच्या विषयी प्रचंड राग होता. यातूनच त्याने सोमवारी रात्री खडके याला पैसे देण्याच्या बहाण्याने गोलापांगरी शिवारातील बळिराम कावळे याच्या शेताकडे नेले. तिथे कृष्णा कावळे (२७), गजानन काळे (२०), बळिराम कावळे व शामल महापुरे (सर्व.रा. गोलापांगरी) यांच्या मदतीने त्याने खडकेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका टेंपोत (क्र.एमएच, २१.५९४७) टाकून काजळा शिवारात आणला. 

दरम्यान, जालना-अंबड रस्त्यालगत काजळा पाटीजवळ एका शेतात काहीजण एका व्यक्तीस जाळण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती जालना तालुका पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह रात्री साडेअकराच्या सुमारास घटनास्थळ गाठले. कुणीतरी येत असल्याचे पाहून संशयितांनी टेंपोसह व एका दुचाकीवर जालन्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून अंतरवालाजवळ टेंपो अडविला. टेंपोतील कृष्णा कावळे, गजानन काळे तर दुचाकीवरू पळून जाणारे बळीराम कावळे व श्याम जोशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शामल महापुरे हा फरार झाला. 

यावेळी पोलिसांनी टेंपोची झडती घेतली असता, पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये  चेहरा व हातपाय अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. तसेच त्यांच्या चौकशीत श्यामने सर्व हकीगत सांगितली. पोलिसांनी टेंपो ताब्यात घेवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानम, कर्मचारी कल्याण आटोळे, कृष्णा मुंढे, राऊत, सोनवणे, पठाण, आमटे, कापसे यांनी ही कारवाई केली.

सात दिवसांची पोलीस कोठडी
अटक केलेल्या चौघा संशयितांना पोलिसांनी सायंकाळी पाच वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप तपास करत आहेत.

Web Title: brother kills sister's husband due to continuous harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.