दुष्काळातही अमृतवन फुललेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:20 AM2019-06-05T01:20:05+5:302019-06-05T01:20:28+5:30

नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे.

Amritwan bloom in drought | दुष्काळातही अमृतवन फुललेले

दुष्काळातही अमृतवन फुललेले

Next

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सततच्या अत्यल्प पावसामुळे वृक्षसंगोपनाची गरज निर्माण झाल्याने वृक्ष संवर्धनाची कास धरा, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे वन व महसूल विभागाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यात दररोज हजारो झाडांची तोड होत आहे. याचा दुष्परिणाम म्हणून उष्णतेने सध्या उच्चांक गाठला आहे. यामुळे वृक्षाच्छादित क्षेत्रही घटत चालले आहे. शहरातील वृक्षाच्छादित क्षेत्र वाढावे, तसेच कारखान्याच्या धुरापासून प्रदूषण कमी व्हावे, यासाठी नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन निर्माण होणाऱ्या वसाहती, वाढते रस्ते, औद्योगिक व्यवसाय विविध घटकांमध्ये जिल्ह्याचा विस्तार वाढत चालला आहे. या विस्ताराच्या प्रगतीसाठी आड येणा-या वृक्षांची कुठलीही परवानगी न घेता सर्रास कत्तल केली जात आहे. वृक्षांचे संवर्धन आणि वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभाग आणि महसूल विभागाला करडी नजर ठेवावी लागते. या दोन्ही विभागाला आपआपल्या परीने क्षेत्र वाटुन देण्यात आले आहे. परंतु, या विभागातील अधिकारी, कर्मचारी याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्यामुळे याबाबत साशंकता निर्माण होत आहे. वनक्षेत्र कमी होत असल्याने तापमानही ४३ अंशांवर गेले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरा मशीन आहेत. या मशीनवर कोणत्या प्रकारचे वृक्ष कापणीसाठी येतात. त्या वृक्षांना मान्यता आहे की नाही, याची वनपालांना तपासणी करण्यासाठी जावे लागते. परंतु, बहुतांश वनपाल व नागरिकही वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहात नसल्यामुळे हा व्यवसायही दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.
दरम्यान, जालना शहरातील वनक्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी जालना नगर पालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. शहरात वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी नगर पालिकेने मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये २४० जातीच्या ३० हजार झाडांची २५ एकरमध्ये लागवड केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीतही ही झाडे जगविली जात आहे. यामुळे शहराच्या वैभवात काही प्रमाणात तरी भर पडत आहे.
गुलाबी जालना म्हणून शहराची ओळख व्हावी, या उद्देशाने रेल्वे ट्रकच्या बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत फुलांची झाडे लावण्याचे काम करण्यात आले आहे. या उद्यानाला लागूनच मोती तलाव असल्यामुळे पाण्यासाठी जास्त गैरसोय होत नाही. हा परिसर वनौषधी उद्यानच नाही तर दुर्मिळ पशु-पक्षी या भागात स्थायिक होतील, या अनुषगाने आवश्यक ते वातावरणही तयार करण्यात आले आहे.
शहरात वृक्षांची संख्या वाढावी, यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत असून, येणा-या काळात जालना शहरात ४० हजार झाडे लावण्यात येणार आहे. ही झाडे कुंडलिका नदीच्या बाजूला लावण्यात येणार असून, याचा फायदा शहरवासीयांना होणार आहे. दरम्यान, शहरातील प्रत्येक कुटुंबांनी एक झाड लावले तर शहरात ७५ हजार झाडांची लागवड होऊ शकते, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. प्रत्येक कुटुंबाला झाडे देण्याचा प्रयत्नही नगर पालिकेच्यावतीने करण्यात
येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड
या उद्यानात निंब, पिंपळ, वड, जांभूळ, निलगिरी, बाभूळ, चिकू, बदाम, चंदण, पेरू, आवळा, बोर, सीताफळ, डाळिंब, शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा, साग, सादडा, पळस, करंज, सुबाभूळ, शिरीष, काशीद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम, शेवरी, शेवगा, बांबू, निरगुडी, पांगारा, जाभूळ, रामफळ, आवळा, बोर आदी जातींची झाडे लावण्यात आली आहे.
मोतीतलाव जवळ असल्यामुळे येथे अमृतवन तयार करण्यात आले आहे. तसेच या झाडांना पाणी देण्यासाठी येथे दोन बोअरही आहेत.
सध्या या बोअरमध्ये पाणी नसल्याने ही झाडे जगविण्यासाठी मोतीतलावातील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे.

Web Title: Amritwan bloom in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.