ठळक मुद्देइंदेवाडी येथील मारोती मंदिरात ३५ ते ४० गायी आहेत. सकाळी शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २२ गायी मृत आढळून आल्या.

जालना : इंदेवाडी शिवारात २२ गायींचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. गावातीलच मारोती मंदिर देवस्थानाच्या या गायी आहेत. घटनेची माहिती कळताच पोलीस व पशु वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाली आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी कि, इंदेवाडी येथील मारोती मंदिरात ३५ ते ४० गायी आहेत. या गायी रात्री गाव शिवारात चरण्यासाठी जात व सकाळी मंदिर परिसरात परत येत. काल रात्री नेहमीप्रमाणे या गायी चरण्यासाठी गाव शिवारात गेल्या होत्या. परंतु, आज सकाळी यातील दोन ते तीन गायी मंदिरासमोर मृत अवस्थेत आढळून आल्या. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी शिवारात इतर गायींचा शोध घेतला असता आणखी शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २२ गायी मृत आढळून आल्या. तसेच सात ते आठ गायी या अत्यवस्थ होत्या.  

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक गावात दाखल झाले. पशु वैद्यकीय पथकाने लागलीच अत्यवस्थ असलेया ८ गायीवर उपचार सुटू केले आहेत. यावेळी प्राथमिक तपासणी करून पोलिसांनी गायीवर विष प्रयोग करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.  पशु वैद्यकीय अधिका-यांनी सर्व मृत गायींची उत्तरीय तपासणी करून त्याचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठवणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी जालना-अंबड रस्त्यावर दोन मृत गायी टाकून रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. दरम्यान, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी इंदेवाडी इथं जाऊन या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.